सांगली : सांगली जिल्ह्यात तुमचे किती सरपंच आहेत? असा सवाल करत काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला आहे. सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद असून काँग्रेस आणि उबाठा गटाकडून या जागेवर दावा सांगण्यात येत आहे. यातच आता विश्वजित कदम यांनी ही जागा काँग्रेसकडे राहावी अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना विश्वजित कदम म्हणाले की, "देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा अशी सांगली जिल्ह्यातील नेत्यांची ईच्छा आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे लोकसभेची निवडणूक लढत आहे याचा आनंद आहे. परंतू, सांगली जिल्हाच्या जागेवर मविआतील इतर कुठल्याही घटक पक्षाने अधिकार सांगण्याचे काहीही कारण नाही. हा मतदारसंघ काँग्रेसकडेच ठेवावा अशी मागणी आम्ही काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केलेली आहे."
हे वाचलंत का? - अजितदादांचे आमदार परत येण्यास तयार : रोहित पवार
"चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी असून पैलवान म्हणून ते प्रसिद्ध आहेत. परंतू, राजकारण आणि समाजकारण करत असताना एखाद्या विचारधारेचं पाठबळ लागतं. लोकांचे प्रश्न सोडवण्याची भूमिका ठेवावी लागते. चंद्रहार पाटलांनी सुद्धा अलिकडेच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे या सगळ्याचा विचार करता त्यांनी ही जागा मागणं चुकीचं आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "शिवसेना पक्षाने सांगलीच्या जागेची मागणी करु नये. सांगली जिल्ह्यात जवळपास ६०० गावं आहेत. यातल्या १० टक्के ग्रामपंचायतींवरसुद्धा त्यांचे सरपंच आहेत का? हे शिवसेनेच्या नेतृत्वाने सांगावं. याठिकाणी काँग्रेसचेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडेच राहायला हवं अशी आमची मागणी आहे," असेही ते म्हणाले.