आव्हाडांनी पवार कुटूंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नये - आनंद परांजपे

18 Mar 2024 19:26:21
NCP Spokesperson Anand Paranjpe

 
ठाणे :   रक्ताची नाती म्हणजेच कुटूंब नव्हे, २ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपली वेगळी राजकीय भूमिका जाहीर केली तेव्हा आमच्यासारखे लाखो राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एक कुटुंब म्हणून अजितदादांबरोबर उभे राहिले आहेत.

बारामतीतील जनताही ठामपणे अजितदादांच्या मागे उभी आहे..जितेंद्र आव्हाड यांनी पवार कुटूंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नये. असे मत राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर, महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्या भूमिकेशी संलग्न होऊन कुटूंब म्हणून अजितदादांबरोबर उभे राहिले. बारामतीची जनता देखील अजितदादांचे कुटूंब आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे कुटूंब संपूर्णपणे अजितदादांच्या मागे उभे राहिलेले दिसेल.


हे वाचलंत का? -    बिहारमध्ये रालोआच्या जागावाटपावर मोहोर!
 

अजितदादांनी बारामतीमध्ये ही शंका उपस्थित केली होती की, मी आणि माझ्या परिवाराला पवार कुटूंबामध्ये एकटे पाडले जाईल, आमच्यावर टीका होईल. पण महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे अजितदादांचे कुटूंब आहे. हे त्यांच्यामागे खंबीरपणे उभे आहे. तेव्हा जितेंद्र आव्हाडांनी, पवार कुटूंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नये. आपल्या कुटूंबामधील आपले कौटुंबिक संबंध अधिक वृद्धिंगत कसे होतील याच्याकडे त्यांनी अधिक लक्ष द्यावे.

शरद पवारांची चुक काढण्याएवढे आव्हाड मोठे झाले असावेत,याचा प्रत्यय भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने नुकताच आला. एकीकडे म्हणायचे पवारसाहेब माझा बाप आहे आणि त्याच बापाचा फोटो त्या यात्रेच्या बॅनरवर नव्हता तर या बॅनरवर राहूल गांधी व आव्हाडांचा स्वतःचा फोटो होता.

विजय शिवतारे प्रकरणी मी कालच आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क केला असता मुख्यमंत्र्यांनी त्यांची नाराजी दूर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवतारे यांना योग्य समज देतील. विजय शिवतारे यांना फार महत्त्व देऊ नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिली आहे. शिवतारे हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही त्या विषयावर पडदा टाकलेला आहे. शिवसेना या पक्षाचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांना समजूत दिल्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण बारामती लोकसभा मतदारसंघात येणार नाही.





Powered By Sangraha 9.0