नवी दिल्ली : 'कोणी देणगी दिली माहीत नाही, ऑफिस बॉक्समध्ये टाकले', असे उत्तर निवडणूक रोख्यांबाबत तृणमूल काँग्रेसने दिले आहे. इलेक्टोरल बाँडच्या मिळविण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानी तृणमूल काँग्रेस पक्ष असल्याचे माहितीतून उघड झाले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाकडून इलेक्टोरल बाँड योजना रद्द करत सर्व राजकीय पक्षांना त्यासंबंधित डेटा सार्वजनिक करण्यास सांगितले होते.
दरम्यान, जेडीयू प्रमुख नितीश कुमार यांच्या पक्षाला निनावी लिफाफे इलेक्टोरल बाँड म्हणून मिळाले आहेत. तसेच, टीएमसीकडून त्यांच्या एकाही देणगीदाराची माहिती उघड करण्यात आली नसून त्यांना कुणी देणगी दिली हेच माहित नसल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे जेडीयू पक्षाला पाटणा येथील कार्यालयात कुणीतरी एक सीलबंद लिफाफा दिला होता त्यात प्रत्येकी १ कोटी रुपयांचे १० निवडणूक रोखे होते, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखे योजना रद्द ठरवत एसबीआयला सर्वच माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर एसबीआयकडून सदर माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली. त्यानंतर सत्ताधारी भाजपसह टीएमसी, काँग्रेस व अन्य पक्षांच्या निवडणूक रोख्यांची माहिती समोर आली.
आता तृणमूल काँग्रेस आणि जेडीयूने आपल्या देणगीदारांची नावे लपवून ठेवण्याची नवी युक्ती शोधून काढली आहे. या पक्षांनी आपल्या पक्षांना कोट्यवधी रुपयांची देणगी कुणी दिली, याची माहिती नसल्याचे म्हटले आहे. कुणीतरी ते आपल्या कार्यालयाबाहेर पाकिटात टाकून दिल्याचे सांगितले, तर कुणीतरी आपल्या दानपेटीत गुपचूप करोडो रूपये दान केल्याचे सांगितले. असे म्हणत निवडणूक रोख्यांबद्दल माहिती देणे टाळले आहे.