मुंबई : राहूल गांधी मुंबईमध्ये दाखल झाले असून इथे त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर रविवारी शिवाजी पार्क येथे त्यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेकरिता महाविकास आघाडीतील अनेक नेते उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.
उबाठा गट आणि शरदचंद्र पवार पक्ष या सभेत सहभागी होणार आहेत. याशिवाय तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हेदेखील या सभेत उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवार, १६ मार्च रोजी दादर येथील चैत्यभूमीवर भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप पार पडेल. त्यानंतर रविवार, १७ मार्च रोजी शिवाजी पार्कवर राहूल गांधींची भव्य सभा होणार आहे. या सभेतून इंडी आघाडीचे शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे वाचलंत का? - ठाकरे गटात आणखी एक भुकंप होणार? 'हा' बडा नेता नाराज
दरम्यान, राहूल गांधींनी स्वातंत्रवीर सावरकरांचा अपमान केल्यास त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. याविषयी बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, "लोकशाहीत प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. परंतू, राहूल गांधींना एकच सांगतो की, शिवाजी पार्क मैदान हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं घरही शिवाजी पार्क मैदानाजवळच आहे. तुम्ही महाराष्ट्रात येऊन तुमचं म्हणणं मांडावं. याला आमची काहीही हरकत नाही. पण इथे येऊन जर मागच्यासारखं स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल कुठलंही अपमानजनक वक्तव्य केलं तर महाराष्ट्रातील १४ कोटी जनता राहूल गांधींना महाराष्ट्रात फिरु देणार नाही. सावरकरांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही," असा थेट इशारा त्यांनी राहूल गांधींना दिला आहे.