शरीरसौष्ठवपटू मर्दानी ‘रेखा’

15 Mar 2024 21:21:44
Rekha Shinde

लहानपणी पाहिलेले ‘खाकी’चे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून शरीरसौष्ठवातील अनेक किताब पटकावणार्‍या अहिल्यादेवी नगरच्या ‘मर्दानी रेखा’ यांचा हा जीवनपट...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी गावी शेतकरी कुटुंबात रेखा बापुराव शिंदे यांचा जन्म झाला.त्यांचे बालपण खडतर गेले. लहानपणीच पितृछत्र हरपल्याने आई मंगल शिंदे यांनी कष्ट उपसून संगोपन केले. आई, छोटा भाऊ आणि मोठी बहीण अशा चौकोनी कुटुंबात वाढलेल्या रेखा यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण सोनवडी, दौंड येथील आश्रमशाळेत पार पडले. श्रीगोंदा तालुक्यात अकरावीचे शिक्षण घेतल्यानंतर रेखा यांचा विवाह झाला. रेखाचे पती सुनील खंडागळे हे गावी फळांचा व्यवसाय करतात. मुळातच शिकण्याची जिद्द होती. लग्नानंतर एका छोट्याशा दुकानात नोकरी तसेच लहान मुलांना सांभाळण्याचे काम करून शिक्षण सुरू ठेवत कला शाखेतून त्यांनी पदवी मिळवली.समाजात महिलांना दिल्या जाणार्‍या दुय्यम स्थानाचा रेखा यांना मनस्वी राग होता. एका महिलेने कसे असावे, याबाबत समाजामध्ये अनेक समज-गैरसमज दृढ असले तरी, बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या महिलांनी प्रबळ असावे. आज कोणतेही क्षेत्र असो, पुरुषांपेक्षा महिला कमी नाहीत. या अट्टहासाने महाविद्यालयामध्ये असताना रेखा मातीतील कुस्ती खेळायला लागल्या. हा मर्दानी खेळ खेळताना त्यांनी मनोमन ठरवले की, आपण शरीरयष्टी कमवली पाहिजे.

आईने तर लहानपणापासूनच ‘तू पोलीस होणार, तुला पोलीस व्हायचंय!’ असं त्यांच्या मनावर बिंबवलं होतं. पोलीस म्हणजे काय, हे माहीत नसतानादेखील आईला वाटलं की, आपल्या लेकीने पोलीस बनावं, त्यामुळे पोलीस बनायचेच, हा ध्यास मनी बाळगून पोलीस बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रेखा यांनी कसून तयारी सुरू केली. मैदानी खेळांची आवड होतीच. किंबहुना, कुस्ती, ज्युडो आणि बॉडी बिल्डींग (शरीरसौष्ठव) मध्ये विशेष रूची होती. आपण वर्दीमध्ये एक दबंग महिला पोलीस दिसले पाहिजे, या जिद्दीतून त्यांनी शरीरसौष्ठवाला प्राधान्य दिले. शरीरसौष्ठव हे क्षेत्र सामान्यतः पुरुषांचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. फारच कमी महिला या क्षेत्रात करिअर घडवताना दिसतात. या शरीरसौष्ठवामुळेच एक वेगळी ओळख मिळून २०१४ साली रेखा पोलीस खात्यामध्ये भरती झाल्या. प्रशिक्षणासाठी नागपूरला जाऊन वर्षभरानंतर ठाणे शहर पोलीस दलात त्या रुजू झाल्या. सुरुवातीला ठाणे पोलीस मुख्यालयात सेवा बजावल्यानंतर सध्या त्या मुंब्रा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. कर्तव्य आणि खेळाबरोबरच रेखा कुटुंबवत्सलदेखील आहेत. पतीचेही त्यांना याकामी नेहमीच प्रोत्साहन मिळते. ठाण्यात दिघा येथे त्या वास्तव्यास असून त्यांचा मुलगा यंदा दहावीत आहे.

पोलीस खात्यात रुजू झाल्यानंतर सर्वप्रथम २०१९-२० मध्ये पोलीस खात्याअंतर्गत होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्यांनी कुस्ती आणि ज्युडोत तिसरा क्रमांक पटकावला. २०२३ मध्ये त्यांना माहिती मिळाली की, पोलीस खात्यामध्ये शरीरसौष्ठव हा खेळ समाविष्ट केलेला आहे. त्यानंतर या खेळामध्ये उतरण्याचे ठरवून २०२३ पासून त्यांनी शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. ठाण्यातील कळवा नाका येथे असलेल्या बॉडी फिट जिममध्ये रोशन खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्यास सुरुवात केली. मात्र, शरीरसौष्ठवाची प्रेरणा किरण टेबला यांच्याकडून मिळाल्याचे रेखा सांगतात.त्यानंतर पुणे येथे महाराष्ट्र राज्य पोलीस स्पर्धेत शरीरसौष्ठव स्पर्धेत पहिले सुवर्णपदक त्यांनी पटकावले. २०२३ मध्येच हरियाणा येथे झालेल्या ‘ऑल इंडिया पोलीस गेम’मध्ये सुवर्णपदक व महिला बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशीप मिळवली. त्यानंतर ‘महाराष्ट्र पोलीस गेम २०२४’ नाशिक येथे झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये ५५ किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक व ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ महिला म्हणून सुवर्णपदक व ट्रॉफी जिंकली, तर भिवंडी येथे झालेल्या स्पर्धेतप्रथम क्रमांक मिळवला. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या ‘मुंबई श्री’ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, तर मुंबईतच झालेल्या ‘महाराष्ट्र श्री’ महिला खुल्या शरीरसौष्ठव स्पर्धेतदेखील प्रथम क्रमांकाचा किताब पटकावला. २०२४ मध्ये झालेल्या पॉवर लिफ्टिंगमध्ये ‘ठाणे शहर स्ट्राँग वुमन’ हे टायटल मिळवून ठाण्याच्या शिरपेचात त्यांनी मानाचा तुरा खोवला.

“सध्याच्या काळात महिलांनी बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्यादेखील शक्तिशाली असणे खूप गरजेचे आहे. त्याकरिता आपले शरीर तंदुरुस्त ठेवायला हवे. म्हणजे समाजामध्ये येणार्‍या अडचणींना स्वतः सामोरे जाऊ शकतात. आपल्या समाजात महिला शरीरसौष्ठवपटूंकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. समाजात म्हणावा तसा मान दिला जात नाही. ’शरीरसौष्ठव’ म्हणजे ’अंगप्रदर्शन’ अशीही काही जणांची मानसिकता बनलीय. तेव्हा, अढळ स्थान निर्माण करण्याची जिद्द ठेवून वाटचाल केल्यास यश नक्की मिळेल,” असा सल्ला त्या देतात.मीतभाषी असलेल्या रेखा, प्रसिद्धीपासून काहीशा अलिप्त असल्या तरी, शरीरसौष्ठव क्षेत्रात त्यांचा चांगलाच दरारा आहे. भविष्यात ‘भारत श्री’ तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून ‘विजयश्री’ मिळवण्याची त्यांची इच्छा आहे. अशा या पोलीस विभागात कामगिरीचा आलेख उंचावत शरीरसौष्ठव क्षेत्रात शिखर गाठण्याचा मनोदय बाळगणार्‍या मर्दानी रेखा यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!

दीपक शेलार


Powered By Sangraha 9.0