यवतमाळ : केंद्र सरकारने देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे. या कायद्याच्या विरोधात आता उद्धव ठाकरेंनी गरळ ओकली. यवतमाळमधील सभेत बोलत असताना त्यांनी CAA कायद्यावर टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, "आता देशात सीएए हा नवीन कायदा आणत आहेत. आपल्या देशाच्या बाहेर भयभीत झालेले हिंदू, जैन, पारसी, शीख यांना आपल्या देशात येऊ द्या, असं या कायद्यात आहे. पण हा सुद्धा एक निवडणुकीचा जुमला आहे. दोन-तीन दिवसांत आचारसंहिता जाहीर होईल," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - "...तर राहूल गांधींना महाराष्ट्रात फिरु देणार नाही"; मनसेचा इशारा
ते पुढे म्हणाले की, "नोव्हेंबरमध्ये मी मुख्यमंत्री झालो आणि डिसेंबरमध्ये त्यांनी सीएए आणि एनआरसीचं भूत देशात नाचवलं होतं. त्यावेळी सगळ्यांच्या मनात एक भीती निर्माण झाली होती. आमच्या राहण्याचं प्रमाणपत्र नसेल तर आमचं काय होणार अशी भीती आसामच्या जनतेमध्ये निर्माण झाली होती. त्याचवेळी या कायद्याच्या विरोधात कोर्टात काही याचिका दाखल झाल्या. या याचिकांचा अजून निकाल लागलेला नसताना सीएएची अधिसुचना जाहीर केली आहे. म्हणजेच हा निवडणूकीचा जुमला आहे. यांना फक्त धर्माधर्मात भेद करुन दंगली करायच्या आहेत," असे ते म्हणाले.
"ते सांगतात की, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे. पण मी हिंदुत्व न सोडताही मोठ्या प्रमाणावर मुस्लीम समाज माझ्यासोबत येत आहे. मी भाजपला सोडलं हिंदुत्व सोडलेलं नाही. जे हिंदुत्व मला माझ्या आजोबांनी आणि शिवसेना प्रमुखांनी शिकवलं ते हिंदुत्व घरातली चूल पेटवणारं आहे तर भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं आहे," असेही ते म्हणाले आहेत.