प्रभू श्रीरामांच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरच्या निवडीबद्दल अभिनेते अरुण गोविल यांचे मोठे वक्तव्य
मुंबई : नितीश तिवारी दिग्दर्शित रामायण चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. विशेष म्हणजे ‘रामायण’ (Ramayan) चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत झळकणार आहे. यावर सुप्रसिदध ‘रामायण’ (Ramayan) मालिकेत प्रभू राम साकारलेले अभिनेते अरुण गोविल यांनी महत्वपुर्ण विधान केले आहे. ज्यावेळी रणबीरची प्रभू श्रीराम (Ramayan) यांच्या भूमिकेत निवड करण्यात आली होती त्यावेळी लोकांच्या भूमिका भुवया उंचावल्या होत्या. आता अरुण गोविल यांनीही यावर भाष्य केले आहे.
दरम्यान, अरुण गोविल यांनी ‘बॉलिवूड स्पाय’शी संवाद साधताना रामायण चित्रपटात प्रभू राम यांच्या भूमिकेसाठी रणबीरची निवड ही योग्य आहे असे म्हटले आहे. अरुण गोविल म्हणाले, “रणबीर ही भूमिका निभावू शकेल की नाही ते येणारी वेळच ठरवेल. आधीपासूनच आपण काही सांगू शकत नाही, पण रणबीरबद्दल बोलायचं झालं तर तो एक उत्कृष्ट कलाकार आहे. मी जितकं त्याला ओळखतो तो फार मेहनत घेऊन एखादी भूमिका साकारतो. तो एक संस्कारी मुलगा आहे. नैतिकता, संस्कृतीसारख्या बऱ्याच गोष्टी त्याच्या व्यक्तीमत्त्वात आढळून येतात. मला खात्री आहे की तो या चित्रपटात त्याचा सर्वश्रेष्ठ परफॉर्मन्स देईल.”
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी माता सीता आमि ‘केजीएफ’स्टार यश ‘रावण’ यांच्या भूमिका साकारणार आहेत. दरम्यान, हा चित्रपट २०२५ च्या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याचा अंदाज निर्मात्यांनी वर्तवला आहे.