राज्यातील महाविद्यालयांत ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’

13 Mar 2024 14:29:09
Aacharya Chanakya Skill Development Centre
 
 
मुंबई :   "राज्यातील १ हजार महाविद्यालयात ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ स्थापन केले जाणार आहे", अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात प्रभावशाली होण्यासाठी, युवा पिढीने शिक्षणाबरोबरच कौशल्य प्राप्त करणे, ही काळाची गरज असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.
 
दरम्यान, सध्या १०० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांना 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' असे नाव देण्यात येत असून, आणखी १ हजार महाविद्यालयांमध्ये अशी केंद्रे सुरू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

फडणवीस यांच्या 'मेघदूत' या शासकीय निवासस्थानी, कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यातील १०० महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्राच्या 'ऑनलाईन' उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त आयुक्त अनिल सोनवणे यावेळी उपस्थित होते. दृकश्राव्य प्रणालीद्वारे १०० महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राचार्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले आहे. हे धोरण राबवल्यामुळे देशात आमूलाग्र बदल घडतील. भारत हा जगातील तिसरी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहे. देशात प्रथम स्थानी येऊन जगाचे नेतृत्व करण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी मानव संसाधन विकासावर शासनाने भर दिलेला आहे.

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, राज्यातील १ हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील पात्र महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. ही गोष्ट अत्यंत आनंदाची आहे. अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणी करून महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु केल्याबद्दल मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले.


पारंपरिक शिक्षणासह रोजगारासाठी आवश्यक कौशल्य मिळणार - लोढा
 
"पारंपारिक महाविद्यालयीन शिक्षणासह विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्याचे देखील प्रशिक्षण मिळायला हवे. आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्या युवक युवतींना सक्षम बनवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये सुरु केलेले कौशल्य विकास केंद्र अतिशय महत्वाची भूमिका बजावतील. या मार्फत राज्यात किमान २० हजार युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात १०० महाविद्यालयांमध्ये हे केंद्र सुरु होत आहे. लवकरच १ हजार महाविद्यालयांमध्ये हे केंद्र सुरू करण्याचे ध्येय आम्ही पूर्ण करू. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४.० अंतर्गत जाहिर केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून महाविद्यालयामध्ये हे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहेत", असे प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी केले.
 
 
कौशल्य प्रशिक्षणासाठी सुसंगत अभ्यासक्रम

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीकोनातून महाविद्यालयीन शिक्षणासह व्यावसायिक कौशल्य विकसित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात ३ हजार ५०० महाविद्यालयांमधून १०० महाविद्यालयांना निवडले आहे. टप्प्याटप्प्याने यामध्ये महाविद्यालय अधिकाधिक सहभाग वाढवला जाईल. प्रत्येक कौशल्य विकास केंद्रातून किमान १५० युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून राज्यात किमान २० हजार युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. या कौशल्य विकास केंद्रातून २०० ते ६०० तासांपर्यंतचे सुसंगत अभ्यासक्रमांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी यांनी दिली.

 

 
Powered By Sangraha 9.0