'एसएफआय'च्या गुंडगिरी विरोधात देशभरात आंदोलने

13 Mar 2024 20:23:19

ABVP Protest
(ABVP Protest all over India)

नवी दिल्ली : केरळच्या वायनाड येथील पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठाचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी जे.एस.सिद्धार्थच्या आत्महत्येप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मंगळवारी (१२ मार्च) देशभरात आंदोलने केली. जेएनयू, काशी हिंदू विद्यापीठ, अलाहाबाद विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ, राजस्थान विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ अशा विविध विद्यापीठ-कॉलेज कॅम्पसमध्ये निदर्शने करण्यात आली. यावेळी एसएफआयच्या गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी अभाविपकडून करण्यात आली आहे.

अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल म्हणाले की, "केरळ सरकारच्या आश्रयाखाली असलेल्या एसएफआयने गेल्या काही महिन्यांत सतत हिंसाचार, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीने केरळच्या शैक्षणिक संस्थांना कलंकित केले आहे. सिद्धार्थच्या आत्महत्येने संपूर्ण देश हादरला असून केरळमधील शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू असलेल्या रॅगिंगचा पर्दाफाश झाला आहे. देशभरातील विद्यापीठांमधील निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या अभाविपच्या विद्यार्थ्यांनी एकमताने सिद्धार्थच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आणि शैक्षणिक संस्थांना डाव्या हिंसाचाराचे आखाडे बनण्यापासून रोखण्यात केरळ सरकारच्या अपयशाचा निषेध केला."

राष्ट्रीय मंत्री श्रवण बी राज यांनी सांगितले की, "सिद्धार्थ आत्महत्या प्रकरणात विद्यार्थी परिषदेने वायनाड कॅम्पसच्या बाहेर आंदोलन आणि उपोषण केले होते. त्यानंतर योग्य तपास आणि कारवाईची मागणी करत केरळ सचिवालय गाठले होते. सिद्धार्थचे पालक ही घटना आत्महत्या नसून हत्या असल्याचे सांगत आहेत. विद्यार्थी परिषद डाव्यांच्या हुकूमशाही आणि हिंसेचा तीव्र निषेध करत राहील."


Powered By Sangraha 9.0