बांगलादेशातील भारतद्वेष्टी पिलावळ

    12-Mar-2024   
Total Views |
 Bangladesh puts Indian influence in focus


जागतिक राजकारणात आपला प्रभाव वाढवण्यासाठी सर्वच देश आपल्या कुटनीतिक क्षमतेचा वापर करतात. ही कुटनीतीक क्षमता निर्माण होते, त्या देशाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक ताकदीतून. भारताची सांस्कृतिक ताकद नेहमीच निर्विवाद राहिली आहे. त्या जोडीला आता भारताची आर्थिक ताकदसुद्धा तितक्याच झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच मागच्या एक दशकात भारताने जगभरातील देशांसोबत आपले संबंध वृद्धिंगत केले.भारताने इतर देशांसोबत आपले द्विपक्षीय संबंध ठेवताना कायम मानवी मूल्यांना प्राधान्य दिले. त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे, आजचा बांगलादेश.

पाकिस्तान सैन्याच्या अमानुष अत्याचारांपासून बांगलादेशला भारताने मुक्ती दिली. भारतीय लष्कराच्या सैन्य कारवाईमुळेच बांगलादेशचा जन्म झाला. पण, त्याचं बांगलादेशमध्ये आज काही पाकिस्तानधार्जिणी पिलावळ भारताला हाकलून देण्यासाठी मोहीम राबवत आहेत. मालदीवप्रमाणेच बांगलादेशमध्येसुद्धा ‘इंडिया आऊट’ ही मोहीम सुरू झाली आहे. ‘इंडिया आऊट’ या मोहिमेमुळे काय नुकसान होऊ शकते, हे मालदीवच्या उदाहरणावरुन जगासमोर आहेच. पण, तरीही बांगलादेश-भारताच्या मैत्रिपूर्ण संबंधात मिठाचा खडा टाकण्याचे काम हे धर्मांध करीत आहेत.बांगलादेशात यावर्षी जानेवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भारताच्या निकटवर्तीय मानल्या जाणार्‍या शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने तीन चतुर्थांश जागा जिंकल्या. या विजयानंतर शेख हसीना सलग चौथ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान बनल्या. शेख हसीना पंतप्रधान झाल्यानंतर भारताने या निवडणूक निकालाचे स्वागत केले. पण, बांगलादेशमधील विरोधक आणि कट्टरवादी इस्लामिक गटांनी या निवडणूक निकालांना मान्यता देण्यास नकार दिला. या लोकांना पाश्चिमात्य देशातील तथाकथित लोकशाही रक्षक देशांचीसुद्धा फूस आहे.बांगलादेशच्या जनतेने नाकारल्यानंतर आता या गटांनी आपला मोर्चा भारताकडे वळवला आहे.

भारताने बांगलादेशच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप ही मंडळी करत आहेत. या मोहिमेला बांगलादेशात सोशल मीडियावर पाठिंबा मिळत आहे. बांगलादेशमध्ये ‘जमात-ए-इस्लामी’सारख्या कट्टरपंथी संघटनांचा भारताला कायमच विरोध राहिला आहे. भारतालाच नाही, तर बांगलादेशच्या स्वातंत्र्यालासुद्धा त्यांनी विरोध केला. या संघटनेचे कार्यकर्ते ही मोहीम चालवत आहेत. या संघटनेला सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा नसला, तरी या संघटनेचे जाळे देशभर पसरलेले आहे. शेख हसीना यांनी या इस्लामिक कट्टरवादाला आळा घालण्यासाठी पावले उचलली. पण, अद्याप यांचा पूर्णपणे बीमोड करणे त्यांना जमलेले नाही.‘जमात-ए-इस्लामी’सारख्या संघटनांच्या भारतविरोधी मोहिमेचा दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर फारसा परिणाम होणार नाही. दोन्ही देशांचे संबंध प्रगाढ आहेत. बांगलादेश आर्थिकदृष्ट्या भारतावर पूर्णपणे अवलंबून आहेत. २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारत आणि बांगलादेशचा द्विपक्षीय व्यापार १८ अब्ज डॉलर इतका होता.

भारत बांगलादेशचा दुसरा सर्वांत मोठा भागीदार. बांगलादेशसोबतच्या व्यापाराला चालना देण्यासाठी भारताने बांगलादेशला ’सर्वांत कमी विकसित देशा’चा दर्जा दिलेला आहे. या दर्जामुळे बांगलादेशच्या वस्तूंना भारतीय बाजारपेठेमध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना प्रवेश मिळतो.द्विपक्षीय व्यापाराव्यतिरीक्त भारताने बांगलादेशमध्ये अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. भविष्यातील अनेक योजनांवर भारत आणि बांगलादेश एकत्र काम करत आहेत. त्यामुळे बांगलादेशमधील पाकिस्तानधार्जिणे इस्लामिक कट्टरवाद्यांनी भारताच्या विरोधात कितीही गरळ ओकली तरी भारत आणि बांगलादेशचे संबंध असेच वृद्धिंगत होत राहतील. भारत कोणत्याही देशाच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप करत नाही. तरीही भारतावर अशा प्रकारचे आरोप लावण्यात येत असतील, तर ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे.याआधी मालदीवमध्ये भारतविरोधी मोइज्जू सत्तेत आले. त्यानंतर भारत-मालदीव संबंधात ज्या प्रकारचा तणाव निर्माण झाला. पण, तो तणाव आपल्याला बांगलादेशच्या बाबतीत परवडणारा नसेल. त्यामुळे शेख हसीना यांनी अशा भारतविरोधी धर्मांध पिलावळींना वेळीच आवर घालण्याची आज नितांत आवश्यकता आहे.





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

श्रेयश खरात

वाणिज्य शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC), अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यासक. इतिहास, अर्थकारण, राजकारण आणि क्रिकेट इत्यादी विषयांची आवड.