'सिंगल यूज प्लास्टिक' बाळगणाऱ्यांनो, खरबदार..!

12 Mar 2024 19:06:45
Single Use Plastics news


मुंबई
: 'सिंगल यूज प्लास्टिक' (एकल वापर) बाळगणाऱ्यांविरोधात राज्य शासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी विशेष पथके तयार करून शहरातील बसस्थानके, रेल्वेस्थानके, बाजारपेठ, भाजी आणि फूल मंडई यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी धाडी टाकून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने मंगळवार, दि. १२ मार्च रोजी दिले आहेत.

याविषयी माहिती देताना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम म्हणाले, एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन, उपयोग, वितरण, विक्री आणि साठवणूक यांवर वर्ष २०१८ च्या अधिनियमाद्वारे बंदी घालण्यात येऊनही त्याचा उपयोग पुन्हा चालू झाला आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे 'सिंगल यूज प्लास्टिक' वापरणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करावी आणि या कार्यवाहीचा अहवाल १० दिवसांत सादर करावा. शहरातील बसस्थानके, रेल्वेस्थानके, बाजारपेठ, महत्त्वाचे रस्ते या ठिकाणी एकल वापर प्लास्टिकची सूचना लावण्याचे निर्देश दिले आहेत.

२०१८ च्या अधिनियमाद्वारे एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या अधिसूचनेच्या अंमलबजावणीची तीव्रता कमी झाली आहे. ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे भरारी पथके नेमूक कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. या कार्यवाहीचा अहवाल १० दिवसांत सादर करण्यास सांगितले आहे. - सिद्धेश कदम, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ


 
Powered By Sangraha 9.0