उत्सव स्त्रीशक्तीचा महिला कला महोत्सवाला उदंड प्रतिसाद!

    11-Mar-2024
Total Views |

pu la deshpande 
 
मुंबई : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि अमरहिंद मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३ दिवसीय "महिला महोत्सव २०२४ - उत्सव स्त्रीशक्तीचा" महोत्सवाचे उद्घाटन जल्लोषात झाले. यावेळी उद्घाटन सोहळ्याला खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, मीनाक्षी खारगे, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, अकादमीच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष दीपक करंजीकर, सदस्य श्वेता परळकर, अमर हिंद मंडळाच्या कार्याध्यक्ष सीमा कोल्हटकर उपस्थित होत्या.
 
सरकारकडून महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आणि त्याचा लाभ घेऊन महिलावर्ग करत असलेली प्रगती, याचा खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या भाषणातून आढावा घेतला. आपल्या संस्कृतीतील स्त्रीचे महत्त्व आणि समाजातील स्त्रियांचे योगदान याबद्दल प्रधान सचिव विकास खारगे यांनी आपल्या भाषणातून गौरवोद्गार काढले तसेच कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व अमरहिंद मंडळाचे अभिनंदन केले. कार्यक्रमानंतर एका प्रकट मुलाखतीनंतर सम्यक कलांश प्रतिष्ठान यांनी शेतकऱ्यांच्या विषयावर भाष्य करणारे "दादला नको गं बाई" हे विनोदी लोकनाट्य सादर केले.
 
दि. 9 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता मिशन विश्व ममत्व फाऊंडेशन, नागपूर या संस्थेचे तृतीयपंथी कलाकार ‘तू है शक्ति’ हा बहारदार नृत्याविष्कार सादर झाला. त्यानंतर सायंकाळी 6:45 ते 9.30 या कालावधीदरम्यान प्रसिद्ध यूट्युबर आणि शेफ मधुरा बाचल, वित्तीय सल्लागार रचना रानडे आणि वन्यजीव छायाचित्रकार ॠता कळमणकर यांची मुलाखत अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोले यांनी घेतली. या कार्यक्रमांतर्गत धनश्री देशपांडे आणि श्रावणी वागळे यांच्या सुमधुर गाण्यांचा कार्यक्रमही झाला. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळित यांचे होते.
 
कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी दि. 10 मार्च रोजी सायंकाळी 6 ते 7.15 या कालावधीत अभिराम भडकमकर लिखित ‘सीता’ या कादंबरीवर चर्चा आणि अभिवाचन लेखिका रोहिणी निनावे, अभिनेत्री व लेखिका मधुरा वेलणकर आणि लेखिका स्वरा मोकाशी यांच्या उपस्थितीत पार पडले. सायंकाळी 7.30 ते 9.30 या कालावधीत विदुषी देवकी पंडित यांचा ‘देवी - दिव्य शक्तींचे प्रतीक’ या संकल्पनेवरील रचना सादर झाल्या. अमर हिंद मंडळ, दादर येथे आयोजित हा महोत्सव उदंड प्रतिसादात संपन्न झाला.