स्त्रीरोग आणि हॉमियोपॅथीचे योगदान (भाग-०४)

11 Mar 2024 21:04:00
 Dysmenorrhea


सर्वसाधारपणे नेहमी दिसून येणार्‍या स्त्री रोगांमध्ये वेदनादायक मासिक पाळी, पोट दाह (Dysmenorrhea) हा एक महत्त्वाचा घटक प्रकार आहे. यात मासिक पाळी सुरू होण्याच्या काही काळ अगोदर व सुरू झाल्यानंतर ओटीपोटाचा भाग किंवा कधीकधी संपूर्ण पोटामध्ये वेदना सुरू होतात.आतडी पिळवटल्याप्रमाणे मुरडा आल्याप्रमाणे या वेदना असतात. हा पोटदाह प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळा असू शकतो. काही स्त्रियांमध्ये ही वेदना सहन करण्याइतपत असते, तर काहींमध्ये सहनशीलतेच्या पलीकडे जाते व त्यामुळे संपूर्ण दिवस या वेदनांमध्येच जातो व त्याचा परिणाम हा कामावर होऊ शकतो.
 
मासिक पाळीदरम्यान होणार्‍या पोटदाहाची अनेक कारणे असू शकतात. परंतु, ज्या स्त्रियांमध्ये कुठलेही विशेष कारण आढळून येत नाही, अशा स्त्रियांना वयोमानापरत्वे यातून आराम मिळतो, प्रसूतीनंतरही या दाहातून सुटका होते, असे दिसून आले आहे. परंतु, ज्या स्त्रियांमध्ये काहीना काही विशेष कारण आढळून येते, अशावेळी ते कारण जाणून घेऊन उपचार करणे फार गरजेचे असते.मासिक पाळीच्या दरम्यान, गर्भाशय आकुंचन पावत असते. आकुंचन-प्रसरणाची ही क्रिया गर्भाशयांतील आतील स्तर बाहेर टाकण्यासाठी असते. संप्रेरके सदृश्य काही द्रव्य यात सहभागी होतात याना ‘प्रोस्टाग्लँडीन्स’ असे म्हणतात. जेवढी या द्रव्याची मात्रा अधिक तेवढे गर्भाशयाचे आकुंचन-प्रसरण जोरात होते व पर्यायाने वेदना सुरू होतात. साधारणपणे या वेदनांची लक्षणे व चिन्हे आपण पाहूया. १) पोटात मुरडा येणे - ज्याप्रमाणे पायात गोळा येतो, त्याप्रमाणे पोटात अचानकपणे पिळवटल्यासारखे होते. दर काही मिनिटांना हे पिळवटणे चालू राहते, ओटीपोट दुखत राहाते.

- वेदना या नुसत्या पोटापुरत्या न राहता पाठीत व पायांकडे पसरल्या जातात.

- काही स्त्रियांमध्ये जुलाब, मस्तकदाह, घेरी येणे तसेच मळमळ होणे अशी लक्षणे दिसून येतात. आता आपण या पोटदाहाची कारणे पाहूया.
 
१) ‘एन्डोमेट्रीओसिस’ या आजारात स्त्रीला वेदना खूप होतात. ज्या पेशींनी गर्भाशयातील आतला स्तर बनत असतो, अशा पेशी या गर्भाशयाच्या बाहेरील आवरणावर तसेच बाजूच्या अवयवांवर येऊ लागतात, ज्यात गर्भाशय नलिका, अंडाशय यांचा समावेश असतो. या आजारामुळे मासिक पाळीदरम्यान खूप वेदना होतात.

२) गर्भाशयांतील गाठी - गर्भाशयाच्या आवरणामध्ये तयार होणार्‍या या गाठी वेदनचे कारण असू शकतात. बहुतेक वेळा या गाठी साध्याच असतात, कर्करोगाच्या नसतात.

 
३) अ‍ॅडीनोमायोसिस - या प्रकारात ज्या पेशी गर्भाशयाच्या आवरणामध्ये असतात, त्यांची वाढ गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये होते व स्नायूंवर या पेशींचे घट्ट आवरण बनू लागते. या प्रकारामुळे गर्भाशय अजून जास्ती आकुंचन पावते व त्यामुळे वेदना होतात.

४) स्त्रीच्या गुप्तांगात होणारा जीवाणूंचा संसर्ग हेसुद्धा वेदनेचे कारण असू शकते. बर्‍याचदा हा त्रास लैंगिक संबंधांनंतर होतो. यालाच Pelvic Inflamatory Disease' (PID) असे म्हणतात.

५) काही स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे मुख्य द्वार हे अतिशय लहान असते किंवा आकुंचन पावलेले असते. अशावेळी मासिक स्राव होण्यास अडथळा येतो व वेदना होतात. पुढील भागात आपण याचा आजारांबद्दल अजून माहिती घेऊया.


- डॉ.मंदार पाटकर



Powered By Sangraha 9.0