मुंबई : उद्धव ठाकरेंच्या 'युझ ॲण्ड थ्रो' पॉलीसीमुळे सगळे निष्ठावान त्यांना सोडून चालले आहेत, अशी टीका भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर केली आहे. रविवारी उबाठा गटाचे नेते रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावर आता राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
नितेश राणे म्हणाले की, "संजय राजाराम राऊत आणि त्यांचे मालक नेहमीच स्वत:च्या चुका दुसऱ्यांवर लादण्याचं काम करत आलेले आहेत. रविंद्र वायकर हे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटचे सदस्य. थेट मातोश्रीच्या वहिनींशी संपर्कात असलेले सदस्य आणि मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावरच्या कंपन्यांमध्ये असलेले पार्टनर आहेत. हेच रविंद्र वायकर जेव्हा अडचणीत आल्यावर उद्धवजींकडे गेले तेव्हा त्यांना सरनाईकांना, यशवंत जाधव यांना दिलं तेच उत्तर देण्यात आलं. तुम्ही तुमचं बघून घ्या, आम्हाला यात टाकू नका असं सांगण्यात आलं."
हे वाचलंत का? - विजय शिवतारेंनी दोन्ही पवारांविरोधात थोपडले दंड! बारामतीत लोकसभा लढवणार
"त्यामुळे जेवढी ताकद उद्धवजी स्वत:च्या मुलाला आणि मेव्हण्याला वाचवण्यासाठी लावतात तेवढी ताकद ते शिवसैनिकासाठी कधीच लावत नाहीत. याची जाणीव आणि अनुभव वायकरांना आल्याने त्यांनी आपल्या भवितव्यासाठी योग्य तो निर्णय घेतला आहे. म्हणून भाजप आणि शिंदे साहेबांवर आगपाखड करण्यापेक्षा तुमचा मालक ज्याप्रमाणे युज ॲण्ड थ्रो पॉलिसी वापरतात त्यामुळे सगळे निष्ठावान शिवसैनिक तुम्हाला कधी कळणार हा विचार महाराष्ट्र आजही करत आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.