गोरेगाव पश्चिम येथील निवासी गाळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार!

11 Mar 2024 20:42:06
MHADA Konkan Division



मुंबई :
   गोरेगाव पश्चिम येथील शाळेसाठी आरक्षित भूखंडावरील पडीक अवस्थेतील निवासी गाळे येत्या ४८ तासात ताब्यात घेऊन त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, असे निर्देश 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांना लोकशाही दिनानिमित्त आयोजित सुनावणी दरम्यान दिले. 

वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात तिसरा लोकशाही दिन उत्साहात संपन्न झाला. आज झालेल्या लोकशाही दिनासाठी प्राप्त १० अर्जांवर जयस्वाल यांनी यशस्वी सुनावणी दिली. नूतन विद्या मंदिर संस्थेच्या महाराष्ट्र विद्यालयास दिलेल्या २० निवासी गाळ्यांच्या संदर्भात प्राप्त अर्जावर सुनावणी देते वेळी जयस्वाल यांनी संबंधित मंडळाच्या अधिकार्‍यांना र्निर्देश दिले की, सदर म्हाडाचा भूखंड शाळेसाठी आरक्षित आहे.


हे वाचलंत का? >>>   झोपडपट्टी पुनर्विकासासाठी MMRDA आणि SRA संयुक्त भागीदारी करार



या भूखंडावरील निवासी गाळे अत्यंत पडीक अवस्थेत असल्याने ते गाळे येत्या दोन दिवसात ताब्यात घेण्यात यावेत व त्यानंतर त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांची दुरुस्ती करण्यात यावी तसेच सदर निवासी गाळे दुरुस्ती करण्यापलीकडे गेले असतील तर ते पाडून भूखंड मोकळा करून घ्यावा. अशा प्रकारे अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न लोकशाही दिनाच्या निमित्ताने निकाली काढण्यात आला. त्याचप्रमाणे गाळे हस्तांतरण प्रकरणामध्ये अर्जदार रामदास भोसले यांनी मालवणी मालाड येथील सन २००४ मध्ये म्हाडाची घेतलेली सदनिका सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देखील हस्तांतरित होत नसल्याचे अर्जाद्वारे सादर केले.


 त्यानुषंगाने जयस्वाल यांनी संबंधित अधिकार्‍यांना नियमांच्या अधीन राहून अर्जदारांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्जदाराच्या नावे हस्तांतरण करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी मुंबई मंडळाच्या संबंधित मिळकत व्यवस्थापक यांना निर्देश दिले.  म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे पाचपाखाडी ठाणे येथील योजना कोड क्रमांक २३९ अंतर्गत अशोक परब यांना सन २०१४ मध्ये वितरित केलेल्या भूखंडाचा ताबा अर्जदाराला सर्व कायदेशीर कार्यवाही करून १५ दिवसांत देण्यात यावा, असे निर्देश जयस्वाल यांनी दिले. सदर भूखंडावर अतिक्रमण झाले असल्यास अतिक्रमण निष्कासन करावे व भूखंडाचे क्षेत्रफळ कमी आढळून आल्यास अर्जदारला इतरत्र भूखंड देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा, असेही निर्देश जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

अर्जदार वैशाली वारंग यांच्या इंदिरानगर जोगेश्वरी एस आर ए गृहनिर्माण सहकारी संस्थेत असलेल्या निवासी झोपडीबाबत पात्रता निश्चितीच्या प्रलंबित अर्जाबाबत अर्जदारास तात्काळ पात्र करावे व अनिवासी झोपडीच्या अर्ज प्रकरणी अर्जदारास अपात्र करावे, असे निर्देश जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अर्जदार शकुंतला राजहंस-व्हटकर यांनी सांताक्रुझ पश्चिम येथे असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये त्यांचा मुलगा अमोल व्हटकर यांना सहयोगी सभासद करणेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी संबंधित उपनिबंधक यांना दिले.

लोकशाही दिनामध्ये प्राप्त उर्वरित अर्जाबाबत सर्व अर्जदारांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी दिले. लोकशाही दिनाला 'म्हाडा'चे सचिव राजकुमार सागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी उमेश वाघ, निवासी कार्यकारी अभियंता पी. बी. सानप, कार्यकारी अभियंता निलेश मडामे, कार्यकारी अभियंता रूपेश राऊत आदी उपस्थित होते.




Powered By Sangraha 9.0