मुंबई : ज्या लोकांनी निवडून दिलं आधी त्यांना तरी न्याय द्या, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंचे नाव न घेता लगावला आहे. सोमवारी वरळी ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोडचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आज काही लोक म्हणतात की, मी इकडे उभा राहतो, तिकडे उभा राहतो, नवीन मतदारसंघ शोधतो. पण ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांना तरी आधी न्याय द्या. हा वरळीतील विषय होता. आपण इथल्या कोळी बांधवांना न्याय देऊ शकला नाहीत. सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे हेच आमदार आणि मंत्र्यांचं काम असतं."
हे वाचलंत का? - "उबाठाचे बाळराजे, आम्ही दुसऱ्यांच्या..."; फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला
"आपण केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे असं म्हणतो, पण पुर्वीच्या सरकारचा यावर विश्वास नव्हता असं मला वाटतं. म्हणूनच या कामाला फार विलंब होत होता. कुणीतरी इन्ट्राग्रामवर याला आम्ही केलेलं काम असं म्हणत होते. पण यात तुम्ही किती अडथळे घातले? या प्रकल्पाला कसा उशीर होईल हे पाहिलं. याशिवाय या प्रकल्पासाठी लागणाऱ्या केंद्राच्या, सुप्रीम कोर्टाच्या आणि पर्यावरणाबाबतच्या परवानग्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मिळवल्या. म्हणूनच हा कोस्टल रोड इतक्या जलद गतीने होत आहे. पण शेवटी केलेल्या कामाचं श्रेय द्यायला मनाचा मोठेपणा लागतो. कद्रु वृत्तीचा माणूस ते कधीच देऊ शकत नाही. गरज सरो आणि वैद्य मरो अशी लोकं असतात. त्यामुळे यावर आता काय बोलायचं?," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "त्यावेळी कोळी बांधवांना दोन पिलरमधील अंतर मोठं हवं होतं. ६० मीटरवरून १२० मीटर अंतर त्यांना हवं होतं. यासाठी कोळी बांधव त्यावेळीचे स्थानिक आमदार आणि मुख्यमंत्र्यांकडे गेले. पण हे होणार नाही, ते शक्य नाही असं त्यांना सांगण्यात आलं. पण मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा दोन पैसे जास्त खर्च होतील पण कोळी बांधवांचा प्रश्न कायमचा सुटायला हवा असं सांगितलं. आम्ही निर्णय घेऊन १२० मीटरपर्यंत अंतर वाढवले. त्यावेळी आम्ही सर्वांनीच मनाचा मोठेपणा दाखवला. पण ज्यांना कोतेपणा दाखवायचा होता त्यांनी दाखवला," असेही ते म्हणाले.