वसुलीबाजांचा बुरखा फडणवीसांनी टराटरा फाडला!

11 Mar 2024 14:49:53

Devendra Fadanvis


मुंबई :
मुंबई कोस्टल रोड प्रकल्पात आमदारांनी वेळोवेळी कंत्राटामध्ये वसुली केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोड प्रकल्पाचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "२००४ ते २०१४ मध्ये राज्यात आणि केंद्रात युपीएचे सरकार होतं. कोस्टल रोडमधील सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आपल्या नियमांमध्ये सी लिंक बांधण्यासाठी परवानगी होती परंतू, कोस्टल रोडसाठी परवानगी नव्हती. युपीए सरकारच्या काळातील महाराष्ट्रातील शेवटच्या मुख्यमंत्र्यांना ड्रीम प्रोजेक्ट म्हणत दिल्लीला जाताना मी बघितलं. ते दिल्लीला जायचे आणि हात हलवत परत यायचे. त्यांना कधीही परवानगी मिळाली नाही. मोदी सरकार आल्यानंतर महायुती सरकारने कोस्टल रोडच्या या प्रवासाला सुरुवात केली. आमच्या केंद्र सरकारसोबत पाच बैठका झाल्या. यातल्या प्रत्येक समस्येचं निराकरण आम्ही काढू लागलो."
हे वाचलंत का? - "ज्या लोकांनी निवडून दिलं आधी त्यांना तरी न्याय द्या!"
 
"हे काम सुरु केल्यानंतरही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात पिटीशन झाली पण आम्ही सगळीकडे जिंकलो. आता काही लोकं हे आमच्या काळात झालं असा दावा करत आहेत. पण मला आजही आठवतं की, मी तेव्हा विरोधी पक्षनेता होतो. माझ्याकडे त्यांचे लोकं सातत्याने यायचे आणि सांगायचे की, इथे वसुली सुरु आहे. आम्हाला याठिकाणी कामच करता येत नाही. आम्हाला एक ट्रक न्यायचा आहे किंवा खोदकाम करायचं आहे तरी वसुली होत होती. तसेच आमच्याच लोकांना कामं द्या, याच भावाने कामं द्या असं सगळं सुरु होतं. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर दबाव होता," असा आरोप त्यांनी केला.
 
ते पुढे म्हणाले की, सत्ताबदल झाल्यामुळे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे हा रस्ता पुर्ण झाला. अन्यथा अजून दोन-चार वर्ष हा रस्ता झाला नसता. एकनाथ शिंदेंनी यातल्या अडचणी दूर केल्या. राज्याचे मुख्यमंत्री खंबीरपणे उभे असल्याने हा प्रकल्प शक्य झाला आहे. या प्रकल्पासाठी सगळं मी करुन आणलं पण उद्धव ठाकरेंनी रातोरात भुमिपूजन ठरवलं आणि मी मुख्यमंत्री असून मला उद्धाटनालाही बोलवलं नाही. पण आम्ही श्रेयाकरिता कधीच लढलो नाही. कारण आम्हाला मुंबईचा विकास हवा आहे. आमच्या श्रेयापेक्षा मुंबई मोठी आहे," असेही ते म्हणाले.


Powered By Sangraha 9.0