मुंबई : उबाठाचे बाळराजे, आम्ही दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेणारे लोकं नाहीत. जे आम्ही करतो त्याचंच श्रेय आम्ही घेतो, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे. सोमवारी बहुचर्चित वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिणवाहिनी मार्गिकेचे लोकार्पण पार पडले. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उबाठाच्या बाळराजे म्हणतात की, हे सगळं आम्ही केलं आणि हे आमच्या कामाचं श्रेय घेत आहेत, असं मी काल समाज माध्यमांवर बघितलं. त्यामुळे त्यांना मी सांगू इच्छितो की, आम्ही दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेणारे लोकं नाहीत. जे आम्ही करतो त्याचंच श्रेय आम्ही घेतो."
"कोस्टल रोडची संकल्पना नवीन नसून अनेक वर्षांपासून ही संकल्पना होती. उद्धव ठाकरेंनी दोन महानगरपालिकेच्या निवडणुका कोस्टल रोडचे प्रेझेंटेशन दाखवूनच पार पाडल्या. मात्र, कोस्टल रोड कधी झालाच नाही. पण या किनारी रस्त्याचा एक भाग आज सुरु करण्यात येत असल्याने आज मुंबईकरिता अतिशय महत्त्वाचा दिवस आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "२००४ ते २०१४ मध्ये राज्यात आणि केंद्रात युपीएचे सरकार होतं. कोस्टल रोडमधील सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आपल्या नियमांमध्ये सी लिंक बांधण्यासाठी परवानगी होती परंतू, कोस्टल रोडसाठी परवानगी नव्हती. युपीए सरकारच्या काळातील महाराष्ट्रातील शेवटच्या मुख्यमंत्र्यांना ड्रीम प्रोजेक्ट म्हणत दिल्लीला जाताना मी बघितलं. ते दिल्लीला जायचे आणि हात हलवत परत यायचे. त्यांना कधीही परवानगी मिळाली नाही. मोदी सरकार आल्यानंतर महायुती सरकारने कोस्टल रोडच्या या प्रवासाला सुरुवात केली," असेही ते म्हणाले.