गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला ‘आनंदाचा शिधा’ मिळणार

11 Mar 2024 22:17:45
Anandacha Shidha



मुंबई :   राज्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्याचा निर्णय सोमवार, दि. ११ मार्च रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब, तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी १ किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला “आनंदाचा शिधा” दिला जाईल.
 
दरम्यान, राज्यातील सुमारे २५ लाख अंत्योदय अन्न योजना, १.३७ कोटी प्राधान्य कुटुंब व ७.५ लाख शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक अशा सुमारे १.६९ कोटी शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिधा” देण्यात येईल. यासाठी येणाऱ्या ५५० कोटी ५७ लाख रुपये इतक्या खर्चास मंजूरी देण्यात आली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील मातृशक्तीचा सन्मान राज्य सरकारने केल्याची भावना सगळ्यात निर्माण झाली आहे. त्याचबरोबर, अयोध्येत महाराष्ट्र भवनासाठी ६७ कोटींचा भूखंड मंजूर करण्यात आला आहे.


हे वाचलंत का? >>>   देशात CAA कायदा लागू!, नागरिकत्वासाठी कोण अर्ज करू शकतो? वाचा सविस्तर


अयोध्येतील सदर भूखंड ९ हजार ४२० चौ. मीटर इतका असून, त्याची किंमत ६७ कोटी १४ लाख इतकी आहे. तसेच, उत्तर प्रदेश आवास व विकास परिषदेमार्फत सेक्टर ८ डी, भूमी विकास गृहस्थान एवं बाजार योजना, शहानवाजपूर माझा येथे आहे. या ठिकाणी महाराष्ट्र भवनाचे बांधकाम झाल्यावर महाराष्ट्रातील भाविकांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणे सोयीचे आणि आरामदायी होईल तसेच त्यांची माफक रकमेत निवासाचीही व्यवस्था होईल.

अयोध्येत महाराष्ट्र भवनाकरिता भूखंडाला मान्यता देण्यात आली असताना दुसरीकडे धनगर समाजाला नवी मुंबई येथे भूखंड उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. खारघर नोड सेक्टर ५ मधील भूखंड क्र. ४६ बी हा ४ हजार चौ.मी. भूखंड धनगर समाजास देण्यात येईल. सिडकोच्या प्रचलित धोरणानुसार भाडेपट्टा अधिमुल्य आकारून जाहिरातीने भूखंडाचे वाटप करण्यात येते.

मात्र याबाबतीत अपवाद करण्यात येऊन इतर मागास बहुजन कल्याण विभागास भाडेपट्टयाने थेट वाटप करण्यात येईल. या संदर्भात अभिनव समाज फाऊंडेशन या धनगर समाजासाठी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने नवी मुंबई येथे भूखंड मिळविण्याबाबत विनंती केली होती.





Powered By Sangraha 9.0