ममतादीदींचा 'इंडिया' आघाडीला दणका! बंगालमध्ये उमेदवार जाहीर

10 Mar 2024 17:15:06
India Alliance Mamata Banerjee


नवी दिल्ली : 
 काँग्रेसप्रणित 'इंडिया' आघाडीस नाकारून ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये सर्वच्यासर्व ४२ उमेदवार रविवारी जाहिर केले आहेत. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेस पक्षाने मोठा गाजावाजा करून 'इंडिया' आघाडीची स्थापना केली होती. मात्र, या आघाडीमध्ये एकवाक्यता नसल्याचे सुरुवातीपासूनच स्पष्ट झाले होते. आता लोकसभा निवडणूक कधीही जाहिर होण्याची शक्यता असताना प. बंगालमध्ये 'इंडिया' आघाडी उध्वस्त झाली आहे.

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी राज्यातील सर्व ४२ लोकसभा मतदासंघासाठी उमेदवारांची घोषणा केली. त्यामुळे बंगालमध्ये 'इंडिया' आघाडी विरूध्द तृणमूल काँग्रेस विरूध्द भाजप असा तिरंगी सामना होणार आहे. परिणामी राज्यात पुन्हा एकदा भाजपला मोठे यश मिळू शकते. त्याचवेळी 'इंडिया' आघाडीस मात्र अस्तित्वाची लढाई लढावी लागू शकते.

ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. त्यावेळी मात्र काँग्रेसने बॅनर्जी यांच्यासोबत चर्चा करून त्यांना आघाडीतच ठेवण्याविषयी विश्वास व्यक्त केला होता. मात्र ममतांनी काँग्रेसच्या विनंतीस केराची टोपली दाखवली असल्याचे स्पष्ट झाले आहे.


काँग्रेसला धक्क्यांवर धक्के

काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये तृणमूलसोबत सन्मानजनक जागावाटप करण्याची आपली इच्छा वारंवार जाहीर केली होती. एकतर्फी घोषणांनी नव्हे जागावाटपास अंतिम स्वरूप द्यायला हवे होते. समविचारी पक्षांनी भाजपविरोधी एकत्र लढावे अशी काँग्रेसची इच्छा आहे, अशी हताश प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केली.

Powered By Sangraha 9.0