मुंबई : देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या नौदलातील जवानांनी ज्या ठिकाणी सेवेत आहेत त्या ठिकाणी मतदार नोंदणी आहे का याची खात्री करावी, आणि मतदार यादीत आपले नाव नसेल तर मतदार नोंदणी करण्याची अजूनही संधी आहे. त्या मुळे मतदार नोंदणी करावी, असे आवाहन मुंबई शहर व उपनगरचे समन्वय अधिकारी (स्वीप) डॉ सुभाष दळवी यांनी केले.
आज भारतीय नौदलाच्या दक्षिण मुंबईतील 'आयएनएस आंग्रे' परिसरात आयोजित मतदार नोंदणी जनागागृती विशेष मोहीम कार्यक्रमादरम्यान संवाद साधताना बोलत होते. यावेळी नौदलाचे कॅप्टन विजय यादव, कॅप्टन अवस्थी यांच्यासह मोठ्या संख्येने नौदलाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी आदेश डफळ हे देखील याप्रसंगी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी तथा निवडणुक अधिकारी संजय यादव यांचा निर्देशांनुसार 'सार्वत्रिक लोकसभा निवडणूक - २०२४' करिता मुंबई शहर जिल्ह्यात विशेष मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याच अंतर्गत दक्षिण मुंबईतील 'आयएनएस आंग्रे' येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला '१८७ कुलाबा' विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी अधिकारी आदेश डफळ यांनी मतदार नोंदणी प्रक्रिया व 'पोस्टल बॅलेट' याबाबत उपस्थितांना चलचित्रफितीच्या माध्यमातून माहिती दिली.
या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना डॉ. सुभाष दळवी म्हणाले की भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा सर्व नागरिकांनी आवर्जून हक्क बजवावा आणि मतदान करणे राष्ट्रीय कर्तव्य आहे . आणि ती आपल्या सर्वांची जवाबदारी सुद्धा आहे. नौदलातील जे अधिकारी व कर्मचारी मुंबईत कार्यरत आहेत, त्यांनी मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे, आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणी साठी voters.eci.gov.in /voter helpline mobile app/ मतदार मदत क्रमांक १८००२२१९५० या वर संपर्क करावा असे आवाहन डॉ. दळवी यांनी केले.
कार्यक्रमाच्या अखेरीस कॅप्टन विजय यादव म्हणाले की, मुंबई सेवेत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मुंबईतच मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे नाव नसेल तर तातडीने नोंदणी करावी असे सांगून जनजागृती कार्यक्रम आयोजित करणाऱ्या मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाचे आणि उपस्थित सर्व मार्गदर्शकांचे आभार मानले. त्याचबरोबर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आवर्जून मतदान करावे, असेही आवाहन यादव यांनी यावेळी केले.