बेलगाम ‘खलिफा’

    09-Feb-2024
Total Views |
Chora Church

तुर्कियेचे राष्ट्राध्यश रेसेप तय्यप एर्दोगान यांनी इस्तंबूल शहरात असलेल्या जगप्रसिद्ध ’चोरा चर्च’चे मशिदीत रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला. एर्दोगानच्या योजनेनुसार, सर्व काही सुरळीत राहिलं, तर याचवर्षी मे महिन्यात मुस्लीम येथे नमाज अदा करू शकेल. मुस्लीम देशांमध्ये एक धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी देश अशी ओळख सांगणार्‍या तुर्कियेची ही ओळख एर्दोगान पुसण्यासाठी सज्ज झाले आहेत. दि. 22 जानेवारी 2024ला अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर, याच तुर्कियेच्या माध्यमांनी राम मंदिराविषयी गरळ ओकली होती. रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा मुस्लिमांसाठी दुःखद घटना असल्याचा साक्षात्कार या तुर्कियेच्या माध्यमांना झाला होता. याचे माध्यमांना आता आपल्या बनावटी खलिफाला खूश करण्याच्या नादात 1400 वर्षं जुन्या चर्चचे रुपांतर मशिदीत होताना पाहून, जगभरातील ख्रिश्चन धर्मियांना किती दुःख झाले असेल, याचा विचार ते करतील का?

तुर्कियेचीच माध्यमे का, जगभरातील अल्पसंख्यांकाच्या अधिकारासाठी लढण्याचा आव आणणार्‍या इस्लामिक सहकार्य संघटना (ओआयसी)ला सुद्धा तुर्कियेतील अल्पसंख्याक ख्रिश्चनांचे दुःख दिसले नाहीच. या दोन्हीशिवाय जगभरातील डावे, तथाकथित मानवाधिकार कार्यकर्ते आणि छद्म पुरोगामींना तुर्कियेत कशा प्रकारे चर्चचे रुपांतर मशिदीत केले जात आहे, त्याचे सोयरंसुतकही नसावे. चर्चचे मशिदीमध्ये रुपांतर करण्याची एर्दोगान यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधी सुद्धा जगप्रसिद्ध हागिया सोफिया चर्चचे मशिदीत रुपांतर एर्दोगान यांनी केले होते. त्यानंतर आता तुर्कियेतील आणखी एका चर्चचे रुपांतर मशिदीत करण्यात येत आहे. हे कृत्य तुर्कियेच्या इतिहासातील ख्रिश्चन धर्मियांचा इतिहास मिटविण्याचाच प्रयत्न म्हणावे लागेल.
 
तुर्किये आशिया आणि युरोपला जोडणार्‍या या देशाचे ऐतिहासिक आणि रणनीतिक महत्त्व आहे. जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने दोन मोठे धर्म ख्रिश्चन आणि इस्लाम. या दोन्ही धर्मांचा इतिहास या देशासोबत जोडलेला आहे. त्यासोबतच या भागावर प्रामुख्याने कॉन्स्टॅन्टिनोपल (आजचे इस्तंबूल) वर कब्जा करण्यासाठी, या दोन्ही धर्मांच्या साम्राज्यांनी रक्तरंजित लढाया लढल्या. शेवटी या लढाईत विजय झाला तो, ऑटोमन साम्राज्याचा. ऑटोमन साम्राज्याच्या काळात कॉन्स्टॅन्टिनोपलचे इस्तंबूल करण्यात आले. यासोबतच शहरांची धार्मिक ओळखसुद्धा बदलण्यात आली. कॉन्स्टॅन्टिनोपलमधील जगप्रसिद्ध चर्चचे रुपांतर मशिदींमध्ये करण्यात आले. पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांच्याविरोधात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ऑटोमन साम्राज्याची आणि साम्राज्याच्या खलिफाची सत्ता संपुष्टात आली.

ऑटोमन साम्राज्याच्या अस्तानंतर 1923 मध्ये सत्तेत आलेल्या मुस्तफ़ा कमाल पाशा उर्फ अतातुर्क (तुर्कांचा पिता) यांनी तुर्कियेला धर्मनिरपेक्षतेकडे नेले. ऑटोमन साम्राज्याचा काळात ज्या चर्चना मशिदीमध्ये रुपांतरित करण्यात आले होते, त्या चर्चचे रुपांतर संग्रहालयात किंवा पुन्हा चर्चमध्ये करण्यात आले. तुर्किये जगातील पहिला मुस्लीम बहुसंख्य देश होता, ज्याने संविधानिक धर्मनिरपेक्षता स्वीकारली. पण, आता धर्मनिरपेक्षतेकडून इस्लामिक कट्टरवादाकडे नेण्याचे लक्ष्य राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी ठेवले आहे.
 
तुर्कियेला पुन्हा एकदा इस्लाम धर्माचे जागतिक केंद्र बनवण्याचे स्वप्न एर्दोगन यांना पडत आहे. त्यासाठीच कोणतेही देणंघेणं नसताना, जगभरात काही झाले, तरी नाक खुपसण्याचे उद्योग सुरू केले आहेत. इस्लामच्या नावाखाली काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचे समर्थन, इस्रायल-हमास युद्धात दहशतवादी ‘हमास’चे समर्थन करून, एर्दोगान तथाकथित मुस्लीम उम्माहमध्ये आपली लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. तुर्कियेमध्ये मंदावलेली अर्थव्यवस्था, वाढलेला भ्रष्टाचार या सर्व गोष्टींवरून जनतेचे लक्ष्य विचलित करण्यासाठी, इस्लामिक कट्टरवादाला एर्दोगान हवा देत आहेत. सध्या तुर्कियेमध्ये एर्दोगानला रोखणारा एकही विरोधक नाहीये. त्यामुळे एर्दोगान बेलगाम झाले आहेत. एर्दोगान यांना खलिफा होण्याचे स्वप्न पडत असेलच, यात शंका नाही. पण, त्यांच्या या स्वप्नामुळे जगभरात नव्याने इस्लामिक कट्टरतावाद बोकाळण्याचीच शक्यता अधिक. जगाने या आधीच धार्मिक कट्टरवादाचे नुकसान सहन केले आहे. त्यात आता एर्दोगन यांचा इस्लामिक कट्टरतावाद जगाला नव्याने अशांततेकडे नेऊ शकतो.

 
 - श्रेयश खरात