गुंथर डेमनिग : युरोपचा स्मरणप्रमुख आणि स्मरणपाट्या

    09-Feb-2024
Total Views |
Article on Gunther Demnig

या स्मरण पाट्यांद्वारे ज्यू समाज संपूर्ण जगाला सांगतो आहे की, आम्ही आमची वांशिक कत्तल विसरलेलो नाही. या पाट्या बनवण्याच्या व्यवसायामुळे गुंथर डेमनिगला युरोप खंडाचा ‘स्मरणप्रमुख’ (रिमेंबरर-इन-चीफ) असं गमतीने म्हटलं जात आहे.

'श्रीरामजन्मभूमी निर्माण न्यासा’चे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरि यांनी पुन्हा एकदा समस्त मुसलमान समाजाला आवाहन केलं आहे की, आता काशी आणि मथुरा ही ठिकाणं तुम्ही स्वतः होऊन आम्हाला (म्हणजे हिंदू समाजाला) द्या. त्यांच्या या आवाहनाला अजून तरी कुणी प्रतिसाद दिलेला नाही.स्वामीजींच्या या आवाहनामागे मोठा इतिहास आहे. १९८०च्या दशकाच्या शेवटी विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोकजी सिंघल यांनी मुसलमानांच्या ’बाबरी मशीद अ‍ॅक्शन कमिटी’ या संघटनेला आवाहन केलं होतं की, आमच्याकडे साडेतीन हजार मंदिरांची यादी आहे, जी मंदिरं इस्लामी आक्रमकांनी वेळोवेळी उद्ध्वस्त केली होती. आज तिथे मशिदी उभ्या आहेत. पण, आम्ही तुमच्याकडे ती सगळी ठिकाणं मागत नाही. आम्हाला फक्त अयोध्या, काशी आणि मथुरा एवढी तीनच ठिकाणं तुम्ही राजीखुशीने द्या. आम्ही उरलेल्या ठिकाणांचा आग्रह सोडून देतो. अशोकजी सिंघलांच्या म्हणजेच हिंदू समाजाच्या या उदार आवाहनाला ’बाबरी मशीद अ‍ॅक्शन कमिटी’चे नेते सय्यद शहाबुद्दिन यांनी अत्यंत उर्मट उत्तर दिलं होतं.
 
आता ही साडेतीन हजार उद्ध्वस्त मंदिरांची यादी अशोकजींनी कुठून मिळवली? तर अरूण शौरी आणि रामस्वरूप या दोन विद्वानांनी ’हिंदू टेम्पल्स ः व्हॉट हॅपण्ड टू देम’ या नावाचा दोन खंडांचा ग्रंथच लिहिलेला आहे. त्यात संपूर्ण देशभरातल्या हिंदू मंदिरांच्या विध्वंसाचा पुराव्यासहित तपशील दिलेला आहे. मूळचे साम्यवादी, पण नंतर पक्के हिंदुत्वप्रेमी बनलेल्या सीताराम गोयल यांनी यांच्या ’व्हॉईस ऑफ इंडिया’ या प्रकाशन संस्थेद्वारे इस्लाम, ख्रिश्चानिटी, साम्यवादी आणि काँग्रेसी या मंडळींनी वेळोवेळी हिंदू समाजाला कसं नाडलेलं आहे (नाडणे हा फारच सौम्य शब्द झाला) याबाबतची अनेक साधार आणि समग्र पुस्तक प्रकाशित केलेली आहेत. सध्या राजीव मल्होत्रा, मीनाक्षी जैन इत्यादी विद्वान लोक याच विषयांवर उत्तम आणि भीषण वास्तव दाखवणार लेखन करीत आहेत.
 
तरीही स्वामी गोविंददेव गिरि म्हणतायत की, “काशी-मथुरा खुषीने आम्हाला द्या. आम्ही बाकी सगळं विसरायला तयार आहोत.” तळाला नाल लावलेल्या वहाणेने चार मुस्कटात भडकवाव्यात आणि एकच मोजावी, इतके यांचे अपराध भयंकर असूनही हिंदू समाजाचे नेते डॉ. मोहनजी भागवत म्हणतात की, ”यांचा आणि आमचा ‘डीएनए’ एकच आहे.“ तेव्हा लक्षात हे येतं की, हिंदू समाज कमालीचा उदार आहे, कमालीचा क्षमाशील आहे.प्रख्यात साहित्यिक, कादंबरीकार गोपाल नीलकंठ दांडेकर उर्फ गोनीदा यांची कुमारवयीन वाचकांसाठी लिहिलेली एक कादंबरी आहे-’भिल्लवीर कालिंग.’ नर्मदेच्या काठी जंगलात राहणारा कालिंग हा मुलगा विलक्षणच आहे. भिल्ल असूनही त्याला प्राण्यांची शिकार करणं, हत्या करणं आवडत नाही. एक दिवस या भिल्ल वस्तीवर शक या आक्रमक लोकांचा हल्ला होतो. शक सगळ्या पुरुषांना आणि वृद्ध स्त्रियांना ठार मारतात, तर तरूण स्त्रियांना पळवून नेतात. कालिंग बचावतो. एक बौद्ध भिख्खू अभिमानसिंह त्यांना वाचवतो आणि शस्त्रविद्या शिकण्यासाठी उज्जैन नगरीला पाठवतो. कालिंग शस्त्रविद्येत पटाईत होऊन, भिल्लांचं सैन्य संघटित करतो. तिकडे गंगा-यमुनेच्या खोर्‍यात राजा चंद्रगुप्त शकांविरुद्ध प्रचंड युद्ध छेडतो.
 
माघार घेणारे शक गंगा-यमुनेच्या मैदानी प्रदेशातून नर्मदेच्या वनप्रदेशात आसरा घेतात. तिथे त्यांना अडवायला आणि टिपून मारायला कालिंग आणि त्याची भिल्ल सेना तयारच असते. शकांचा पूर्ण निःपात होतो. सम्राट चंद्रगुप्ताकडून दूत निरोप घेऊन येतो की, नार्मदीय वनप्रदेशात शकांचा पूर्ण पराभव करणारे भिल्ल सेनापती कालिंग यांना सम्राटांनी राजधानीत बोलवलं आहे. सम्राटांना त्यांना भेटण्याची खूप उत्कंठा आहे. भिल्ल सेनेत जल्लोष होतो. पण, कालिंग भिख्खू अभिमानसिंहाला म्हणतो की, ”पराक्रम केला म्हणजे काय केलं मी? माणसं ठार केली, हेच ना?“ चकीत झालेला भिख्खू म्हणतो की, ”कालिंगा, अरे ज्यांनी तुझं सगळे गाव कापून काढलं, ज्यांनी तुझ्या आईला ठार केलं, ज्यांनी तुझ्या देखत तुझ्या बहिणींना पळवलं, त्यांना तू माणसं म्हणतोस?“

कालिंग विव्हळ होऊन उद्गारतो, “नका, नका अभिमानदादा, या जखमा पुन्हा उकलू नका.” त्यावर भिख्खू उत्तरतो की, ”अरे, उकलाव्याच लागल्या मला. त्याशिवाय तुझ्या मनावरचा हा करुणेचा पगडा हटला नसता. अरे मुला करुणा, दया, क्षमा ही माणसांना दाखवायची असते. पिसाळलेल्या लांडग्यांना नव्हे!”भिल्लवीर कालिंग आणि बौद्ध भिख्खू अभिमानसिंह यांच्या या संवादातून गोनीदांनी हिंदू समाजाच्या मानसिकतेवरच नेमकं बोट ठेवलं आहे. खरोखरच हिंदू समाजाची ही उदारता, क्षमाशीलता जगभरातली एकमेवाद्वितीय आहे. मात्र, सद्गुणसुद्धा जेव्हा मर्यादा ओलांडतात, तेव्हा त्यांना विकृतीचं स्वरूप येतं. तशी गेल्या काही शतकांमध्ये ही क्षमाशीलता सद्गुण विकृती बनली होती.प्रभू रामचंद्राने, क्षमाशीलतेला दुर्बलता समजलं जात आहे, असे पाहिल्यावर खुद्द समुद्रावर-जल महाभूतावर शस्त्र उपसलं होतं. भगवान कृष्णाने फक्त १०० अपराध भरेपर्यंतच क्षमाशीलता दाखवली. ती मर्यादा संपल्यावर, भर सभेत सुदर्शन चक्राने शिशुपालाचं मुंडके उडवलं. हिंदू समाजाने तसं क्षमाशील व्हावं, सद्गुण विकृती टाकून द्यावी, यासाठी गेल्या शंभर-सव्वाशे वर्षांत अनेक आधुनिक ऋषी-मुनींनी तपस्या केली. दि. ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी अमेरिकेतल्या शिकागो सर्वधर्म परिषदेत तोपर्यंत अनाम, अज्ञात असणार्‍या एका भगव्या संन्याशाने केलेले भाषण म्हणजे हिंदू समाजाच्या सामर्थ्य आधारित क्षमाशीलतेचा आधुनिक काळातला पहिला प्रकट आविष्कार होता, असे म्हणता येईल.

हिंदू समाजाच्या उदार, क्षमाशील वृत्तीबद्दल, तिच्या दुर्मीळतेबद्दल एवढं तपशीलवार लिहिण्याचं कारण वेगळंच आहे. तो पाहा गुंथर डेमनिग. गुंथर वयाची पंचाहत्तरी ओलांडलेला, एक जर्मन अभियंता (सिव्हिल इंजिनिअर) आहे. तो राहतो, जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये. पण, त्याच्या प्युजो पिकअप व्हॅनमधून तो युरोपातल्या सगळ्या देशांमध्ये फिरत असतो. तो पाहा, गुंथर एका फूटपाथवर चक्क गुडघे टेकून बसला आहे. आपल्या हातातल्या छिन्नीने त्याने फूटपाथची एक लादी उचकटली. या जागी बरोबर याच मापाची एक छानशी पितळी पाटी त्याने बसवली. चारी बाजूंना सिमेंट लावून, ती पक्की केली. गुंथरचं हे काम बघतायत डॉ. जो कॉस्टेरिश, त्याची बायको कॅथी आणि त्यांची मुलं. ठिकाण आहे-बेल्जियम देशाची राजधानी ब्रुसेल्स शहर. ’शॉसी डी वॉटर्लू’ नावाच्या एका भव्य इमारतीला लागून असलेल्या फूटपाथावर हे काम चालू आहे. डॉ. जो. कॉस्टेरिश हा ज्यू डॉक्टर साधारण साठीचा आहे. तो ऑस्ट्रेलियात पर्थ शहरात राहतो. जो, कॅथी आणि त्यांची तिशी-पस्तीशीतली मुलं मुद्दाम या कामासाठी पर्थहून ब्रुसेल्सला आली आहेत. गुंथर डेमनिगकडे पितळी पाटीची ऑर्डर त्यांनी अगोदरच नोंदवली आहे. डेमनिगनने ती पाटी बसवल्यावर, कॅथीने तिच्यावर फुलं वाहिली आहेत. पाटीवर सुंदर अक्षरात मजकूर कोरलेला आहे- ’मॅक्स कॉस्टेरिश-जन्म १८८४ इथे राहत होता.’

कॉस्टेरिश कुटुंबाचे कुणीही नातलग आता ब्रुसेल्समध्ये नाहीत. त्यामुळे या कार्यक्रमाला डॉ. जो, कॅथी, त्याची मुलं, ब्रुसेल्स महापालिकेचे काही स्थानिक अधिकारी, स्थानिक ज्यू संस्थेचे काही कार्यकर्ते आणि पाटी बसवणारा गुंथर डेमनिग एवढेच लोक आहेत. सगळे लोक खरोखरच दोन-दोन शब्द बोलतात आणि कार्यक्रम संपतो. हलकीशी पावसाची सर येते. कॅथी कॉस्टेरिशने आपल्या आजे सासर्‍याच्या स्मरण पट्टीवर वाहिलेली फुलं पाण्याने वाहून जातात. फूटपाथवरची माणसांची आणि रस्त्यावरची वाहनांची वाहतूक नेहमीसारखी वाहत राहते.१९१४ ते १९१८ या कालखंडात युरोपात एक महायुद्ध झालं. एका बाजूला जर्मनी आणि तुर्कस्तान तर विरुद्ध बाजूला ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिका असे या युद्धातले प्रमुख भिडू होते. यात जर्मनीचा दारूण पराभव झाला. पुढे १९३३ साली जर्मनीत हिटलरचा नाझी हा पक्ष सत्तारूढ झाला. या पक्षाचं असं म्हणणं होतं की, ‘महायुद्धातल्या पराभवाला इतर अनेक गोष्टींबरोबरच जर्मनीतल्या ज्यू या समुदायाची गद्दारी कारणीभूत आहे.’ हे नाझी पक्षांचं मत होतं, संपूर्ण जर्मन साम्राज्याचं नव्हे. पण, १९३३ साली नाझी पक्ष सत्तारूढ झाला आणि त्याने सर्व क्षेत्रांत ज्यूविरोधी धोरण पुढे रेटायला सुरुवात केली. अनेक शहाण्या ज्यू लोकांनी जर्मनीला रामराम ठोकायला सुरुवात केली.

मॅक्स कॉस्टेरिश हा बर्लिनमध्ये राहणारा, एक चांगला सधन ज्यू व्यापारी होता. त्याने १९३४ साली बर्लिन सोडलं आणि तो ब्रुसेल्सला आला. ’शॉसी डी वॉटर्लू’ या संपन्न वस्तीतल्या भव्य इमारतीत तो राहू लागला. त्याला चार मुलगे होते. पुढे सप्टेंबर १९३९ मध्ये हिटलरने युरोपात दुसरं महायुद्ध छेडलं. नाझी सेना एकापाठोपाठ एक युरोपीय देश जिंकू लागल्या.मे १९४० मध्ये नाझींनी बु्रसेल्स म्हणजे बेल्जियम देशच जिंकला. जिंकलेल्या देशांमधल्या सगळ्या ज्यू लोकांना पकडून, विविध छळ छावण्यांमध्ये डांबण्यात आलं. नंतर विषारी गॅस सोडून, त्यांची सरळ कत्तल करण्यात आली. किमान ६० लाख (अक्षरी साठ लाख) ज्यू कैद्यांना अशा रितीने नष्ट करण्यात आलं.मॅक्स कॉस्टेरिश, त्याची बायको आणि तीन मुलगे या कत्तलीत मारले गेले. एक मुलगा मॅनफ्रेड हा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. तो ऑस्ट्रेलियाला गेला. डॉ. जो कॉस्टेरिश हा मॅनफ्रेडचा मुलगा. तो आता पूर्ण ऑस्ट्रेलियन आहे. युरोपशी त्याची काही संबंध नाही.दुसरीकडे गुंथर डेमनिग हा बर्लिनवासी जर्मन १९४८ साली बर्लिनमध्येच जन्मला. महायुद्धातल्या पराभवाच्या कहाण्या ऐकत आणि खडतर परिस्थितीशी टक्कर देत त्याची पिढी वाढली. नाझी पक्षाच्या अतिरेकी तत्त्वज्ञानाबद्दल सर्वसामान्य जर्मन समाजाला घृणा वाटते. ज्यू समाजावर जे अत्याचार झाले, त्याबद्दल सर्वसामान्य जर्मन समाजाला अपराधी भावनाच आहे. तसे तिथे स्वतःला ’नवनाझी’ म्हणवणारे लोकही आहेतच. पण, समाजात त्यांना पाठिंबा नाही.
 
१९९६ साली बर्लिनमधल्या काही ज्यू लोकांच्या मनात ही पितळी स्मरण पाटीची कल्पना आली. तसं बर्लिनमध्ये एक सामुदायिक ज्यू स्मारक आहेच. पण एकेक व्यक्ती, एकेक कुटुंब यांची निवासस्थानं शोधून, त्या इमारतींसमारेच्या फूटपाथवर एका लादीच्या जागी एक पितळी स्मरण पाटी बसवणं, अशी एक नवीनच संकल्पना या मंडळींनी काढली. ते कंत्राट घ्यायला, गुुंथर डेमनिग या जर्मन माणसाने सुरुवात केली. मग जर्मनीसह युरोपातल्या अनेक देशांमध्ये ही टूम पसरली. डिसेंबर २०२३ पर्यंत गुंथरने एक लाख पितळी पाट्या बसवल्या आहेत. विशेष म्हणजे, कोणत्याही शहरातल्या, गावातल्या महापालिका, नगरपालिका अधिकार्‍यांनी या उपक्रमाला कसलाही अडथळा न आणता, उलट संपूर्ण सहकार्य दिले आहे.मुद्दा काय की, या स्मरण पाट्यांद्वारे ज्यू समाज संपूर्ण जगाला सांगतो आहे की, आम्ही आमची वांशिक कत्तल विसरलेलो नाही. या पाट्या बनवण्याच्या व्यवसायामुळे गुंथर डेमनिगला युरोप खंडाचा ‘स्मरणप्रमुख’ (रिमेंबरर-इन-चीफ) असं गमतीने म्हटलं जात आहे. उद्या हिंदूंनी अशा पाट्या बनवण्याचं ठरवलं, तर देशातल्या सगळ्या तीर्थक्षेत्रांचे आणि शहरांचे फूटपाथ लाद्यांऐवजी पितळी पाट्यांचेच बनवावे लागतील.

- मल्हार कृष्ण गोखले

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.