समृद्धी महामार्गाच्या 'ओव्हरपास'मध्ये पहिल्यांदाच दिसले 'हे' वन्यजीव

08 Feb 2024 10:35:44
samruddhi mahamarg
 
 
 मुंबई (अक्षय मांडवकर) - 'हिंदुहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा'वरील (samruddhi mahamarg) 'वाईल्डलाईफ ओव्हरपास'वर पहिल्यांदाच वन्यजीवांच्या हालचाली टिपण्यात आल्या आहेत. या महामार्गावर वन्यजीवांच्या सुखकर हालचालींकरिता 'ओव्हरपास' आणि 'अंडरपास' बांधण्यात आले आहेत. (samruddhi mahamarg) यामधील 'ओव्हरपास'वरुन विविध प्रजातींचे वन्यजीव ये-जा करत असल्याचे पहिल्यांदाच समोर आले आहे. रस्ते प्रकल्पांमध्ये वन्यजीवांच्या भ्रमणाकरिता अशा प्रकारे 'ओव्हरपास' बांधण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच यशस्वी प्रयोग आहे. (samruddhi mahamarg)
 
 
मुंबई-नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग हा ७०१ किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे. यापैकी ११७ किमी. लांबीचा महामार्ग हा वन्यजीवांच्या अधिवास क्षेत्रामधून जातो. या अधिवास क्षेत्रांमध्ये व्याघ्र भ्रमणमार्ग आणि तानसा, काटेपूर्णा, करंजा-सोहळ या अभयारण्यांच्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळे या क्षेत्रांमधून वन्यजीवांच्या हालचाली सुखकर करण्यासाठी महामार्गावर काही विशिष्ट बांधकामे करण्यात आली आहेत. यामध्ये 'वाईल्डलाईफ ओव्हरपास' आणि 'अंडरपास'चा समावेश आहे. वन्यजीवांच्या हालचालींसाठी रस्त्यावर जो उन्नत स्वरुपाचा पूल बांधण्यात येतो त्याला 'ओव्हरपास' असे म्हणतात. तर मूळ महामार्गच वनक्षेत्रामधून जाताना जेव्हा उन्नत स्वरुपाचा बांधला जातो किंवा त्याठिकाणी कलवट बांधण्यात येतात, त्याला 'अंडरपास' म्हणतात. समृद्धी महामार्गावर अशा प्रकारचे नऊ 'ओव्हरपास' आणि १७ 'अंडरपास' आहेत. एखाद्या महामार्गावर वन्यजीवांच्या भ्रमणासाठी 'ओव्हरपास' बांधण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग होता. त्यामुळे या 'ओव्हरपास'मधून वन्यजीव ये-जा करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
 
 
समृद्धी महामार्गावरील 'ओव्हरपास' आणि 'अंडरपास'मधील वन्यजीवांच्या हालचालींची नोंद करण्याचे काम 'भारतीय वन्यजीव संस्थान'चे (डब्लूआयआय) शास्त्रज्ञ करत आहेत. 'डब्लूआयआय'ने दिलेल्या माहितीनुसार समृद्धीच्या 'ओव्हरपास'मधून वन्यजीव ये-जा करत असल्याचे पहिल्यांदाच दिसले आहे. त्याठिकाणी लावलेल्या 'कॅमेरा ट्रॅप'मध्ये वन्यजीवांच्या छबी टिपण्यात आल्या आहेत. यामध्ये निलगायी, चिंकारा, लंगूर आणि कोल्ह्याचा समावेश आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0