योगींना अडकवण्याच्या नादात स्वत:च अडकला! न्यायालयाने 'परवेझ'ला सुनावली ७ वर्षाची शिक्षा

    08-Feb-2024
Total Views |
 CM Yogi
 
लखनौ : उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक भाजप नेत्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी बनावट सीडी सादर केल्याप्रकरणी गोरखपूर न्यायालयाने परवेझ परवाझला ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याच प्रकरणात त्याला दंडही ठोठावण्यात आला आहे. त्यावेळी परवेझने एका विभागातील दुकानांवर दगडफेक करण्यासाठी लोकांना भडकवले होते. नंतर भाजप नेत्यांवर बनावट सीडी सादर करून वातावरण बिघडवल्याचा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला होता.
 
मिळालेल्या माहितीनुसार, २००७ मध्ये इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनला फाशी देण्यात आली तेव्हा परवेझने गोरखपूरमध्ये प्रक्षोभक भाषणे दिली आणि मुस्लिम जमाव जमवला आणि शहरातील हिंदूंच्या दुकानांवर दगडफेक केली. त्यामुळे संपूर्ण शहरातील वातावरण बिघडले होते. यानंतर त्यांनी गोरखपूरचे तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ आणि भाजप नेते शिवप्रताप शुक्ला, राधामोहन दास अग्रवाल आणि अंजू चौधरी यांच्यावर भडकाऊ भाषण केल्याचा आरोप करत खोटा गुन्हा दाखल केला होता.
 
तपासात परवेझचे दावे सिद्ध होऊ शकले नाहीत. कोर्टाने परवेजला पुरावे मागितल्यावर त्याने एक सीडी दिली. या सीडीमध्ये या नेत्यांची भडकाऊ भाषणे असल्याचा दावा त्यांनी केला. ही सीडी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली असता ती बनावट असल्याचे आढळून आले असून, भाषणात छेडछाड करण्यात आल्याचे आढळून आले आहे.
 
या प्रकरणी भाजपचे माजी आमदार दिवंगत वायडी सिंग यांनी परवेझ यांच्यावर पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यासंबंधीच्या खटल्यांमध्ये न्यायदंडाधिकारी आदर्श श्रीवास्तव यांनी त्यांना शिक्षा सुनावली आहे. एका प्रकरणात त्याला पाच वर्षांची तर दुसऱ्या प्रकरणात सात वर्षांची शिक्षा झाली आहे. दोन्ही शिक्षा एकाच वेळी चालतील. त्याच्यावर १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.