कामकाज आणि वैयक्तिक जीवनाचे संतुलन

    08-Feb-2024
Total Views |
Work and personal life balance


दैनंदिन कामाचा ताण, त्यातून उद्भवणार्‍या शारीरिक व मानसिक समस्या या हल्ली सर्वत्र पाहायला मिळतात. आपला जन्मच जणू आयुष्यभर काम करण्यासाठी झालाय, असा प्रश्न म्हणूनच अनेकांना पडल्याशिवाय राहत नाही. त्यानिमित्ताने दैनंदिन कामकाज आणि वैयक्तिक जीवनाचे संतुलन नेमके कसे साधावे, यासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख...

सद्यःस्थितीत कामकाज कुठलेही वा कुठल्याही स्वरुपाचे असो, त्यामध्ये असणार्‍या विविध आव्हानांपोटी व वाढत्या व्यावसायिक स्पर्धेमुळे ताणतणाव, व्यावसायिक अस्वस्थता इत्यादींमुळे केवळ व्यक्तिगत स्तरावरच नव्हे, तर कौटुंबिक, सहकारी क्षेत्र व एकूणच कामकाज पद्धतीमध्ये वैयक्तिक जीवाचे संतुलन राखणे, ही बाब फार महत्त्वपूर्ण ठरते. ही बाब सर्वांना व सर्वदूर लागू होते.यासंदर्भात तपशिलांसह सांगायचे म्हणजे, कंपनीचे कॉर्पोरेट क्षेत्र व्यवसाय-व्यवस्थापनातील जबाबदारी, संगणक क्षेत्र, व्यावसायिक प्रवास, विपणन, आर्थिक व्यवहार, ग्राहक संपर्क क्षेत्र, विविध प्रशासकीय जबाबदार्‍या म्हणजेच व्यावसायिक स्पर्धेवर मात करून, यशस्वी होण्यासाठी जसे आणि ज्या प्रकारे काम करावे लागते, त्यामुळे अशी कामे करणार्‍यांचे कामकाजी जीवन निश्चितच असंतुलित होते व त्यामुळेच व्यवसाय-व्यवस्थापन क्षेत्रात विशेषतः मोठ्या वा जबाबदारीच्या पदांवर काम करणार्‍यांनी आपले काम आणि वैयक्तिक जीवन यांमध्ये संतुलन साधणे आणि कायम राखणे; पण तेवढेच महत्त्वाचे ठरते.
 
 
करिअर प्रवासाच्या विविध टप्प्यांमध्ये व्यक्तिगत स्तरावर पद-पगार-प्रतिष्ठा-प्रगती या मार्गावर केवळ चालणेच नव्हे, तर त्यावर अग्रेसर राहणे, याला पर्याय नसतो. या प्रवासात यशस्वी निर्णय प्रक्रियेसह काम करण्यावरच, व्यवस्थापक म्हणून व्यक्तीचा कस लागतो. कामापोटी स्वतःकडे लक्ष देण्यास बरेचदा वेळ नसतो. परिणामी, जबाबदारीच्या कामाचे स्वरूप, कामाचा ताण, प्रसंगी अधिक तास काम करणे व मुख्य म्हणजे घरी परतल्यावर देखील काम आणि कार्यालयीन कामाचा विचार करणे, ही हल्ली नित्याची बाब ठरली असून, त्यातूनच अनेकांच्या वैयक्तिक जीवनाचे असंतुलन निर्माण झालेले दिसते. ही बाब संबंधित मंडळी व त्यांच्या कुटुंबीयांसाठीही समस्या म्हणून उभी ठाकली आहे.या संदर्भातला मुख्य मुद्दा म्हणजे वर नमूद केल्याप्रमाणे, आज आपल्या भोवती असणार्‍या कामकाज आणि आपल्या वैयक्तिक जीवनातील असंतुलनाचे मूलभूत कारण काय? यावर मुळातून विचार करणे गरजचे ठरते. आज हे लक्षात ठेवणे तेवढेच महत्त्वाचे ठरते की, बरेचदा असे असंतुलन हे व्यक्ती म्हणून आपल्या व्यक्तिगत आशा-आकांक्षा व अधिकाधिक प्रगती साधण्याच्या प्रक्रियेत व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक व व्यावसायिक इच्छा- आकांक्षांच्या पूर्ततेतून होणे अपरिहार्य ठरते. असे विशेष प्रयत्न केल्यास आयुष्यात ’जैसे थे’ म्हणजेच यथास्थिती कायम राहू शकते. मात्र, आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजनपूर्वक व अपेक्षित समाधानासह काम करणे तेवढेच आवश्यक असते.
 
ही संतुलन प्रक्रिया सुलभ नसली, तरी आपल्यासाठी अशक्य नाही, ही खूणगाठ बाळगली म्हणजे बर्‍याच बाबी सुलभ होत जातात. मुख्य म्हणजे, याची सुरुवात आपण स्वतःपासून करणे आवश्यक व उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, व्यक्ती जेव्हा आपल्या शैक्षणिक पात्रतेनंतर नव्यानेच आपल्या रोजगाराची सुरुवात करते, तेव्हा कामाचा पूर्वानुभव नसतो, पुरेसे कौशल्य व कामाची माहिती नसते. त्यामुळे या शिक्षण-सराव व व्यवहार या प्रक्रियेत व त्या काळात प्रत्येकच व्यक्तीचे नियोजन-अंमलबजावणीमध्ये अपरिहार्यपणे आढळते.मात्र, सुरुवातीच्या काळातील अस्थिर वा अपुरे कौशल्य आणि सरावाच्या अभावी करावी लागणारी अतिरिक्त धावपळ व प्रयत्नांनंतर आपल्याला वाढते ज्ञान व अनुभवाच्या आधारे तथाकथित धावपळीवर मात अवश्यपणे करता येते. अशा प्रकारे मात करण्यासाठी संबंधित व्यक्तीने स्वतः पुढाकारासह प्रयत्न मात्र करायला हवेत. असे करणे आपल्याला आपली कामकाजविषयक जबाबदारी, त्याच्याशी संबंधित आव्हाने, विविध खाचखळगे इत्यादी यशस्वीपणे करतानाच, वैयक्तिक व कौटुंबिक जबाबदार्‍यांचे संतुलन करण्यात साहाय्यभूत ठरु शकतात.
 
 
कामकाज व वैयक्तिक जीवनाचे संतुलन साधण्यासाठी मूलभूत गरज असते, ती कामाच्या निर्धारित कालमर्यादेचे संपूर्णपणे व गांभीर्याने पालन करण्याची. यासाठी वेळ, संसाधने, सामग्री, जबाबदारीची निश्चिती इत्यादी अपरिहार्य ठरते. हे केले म्हणजे बर्‍याच अंशी उद्दिष्ट साध्य केले जाऊ शकते. काम व त्याला पूरक परिस्थिती व मानसिकता या संदर्भात महत्त्वाची ठरते. या दोन्ही बाबी कामकाजाला अधिक पूरक, उपयुक्त आणि उत्पादकसुद्धा बनवितात. याचे संबंधित व्यक्ती-व्यवस्थापकाला दुहेरी फायदे होऊ शकतात. त्यामुळे जबाबदारीचे काम वेळेत, अचूक व निर्धारित पद्धतीने होऊ शकते. परिणामी, संबंधितांना इतर काम करण्यावर आपले लक्ष देता येते. कामाचे आणि काम करणार्‍यांचे नेमके संतुलन साधले जाऊ शकते.वैयक्तिक मानसिकता व त्याच्याच जोडीला चांगले शरीर, आरोग्य या बाबी कामाच्या ठिकाणी व कामाच्या संदर्भात अधिक उपयुक्त बनवितात. यासाठी उत्तम आरोग्य व त्यासाठी पूरक असे खानपान आवश्यक असते. आजकाल विशेषतः विस्तारित वा अतिरिक्त कामाचे तास, भोजनाच्या अनिश्चित वेळा, स्थानिक प्रवासासाठी लागणारा प्रदीर्घ कालावधी यांमुळे कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक जीवनाचे संतुलन ही बाब एक समस्या स्वरुपात पुढे आली आहे. या परिस्थितीचा परिणाम म्हणून व्यक्तिगत स्वरुपात कर्मचार्‍यांचे आरोग्य ही बाब म्हणजे नवे आव्हान ठरली आहे.

या संदर्भात वेळोवेळी झालेली चर्चा, व्यक्त करण्यात येणारी मते, झालेला अभ्यास व संशोधन यावरून कामकाज, कामाचे ताण व त्यापोटी येणारा ताण व परिणामी व्यक्तीपासून व्यवस्थापकांपर्यंतचे विविध स्तरांवर व विविध प्रकारे होणारे असंतुलन कमी करण्यासाठी व परिणामी नियंत्रित करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाय फायदेशीर ठरतील-कामाच्या दरम्यान ताण येऊन, अस्वस्थता बरेचदा येते व त्यातूनच कामकाजी मंडळीच्या व त्यातही जबाबदारीसह अधिकारपदावर काम करणार्‍यांना विविध स्वरुपांतील असंतुलनाचा सामना करावा लागतो. यावर तोडगा म्हणून संबंधित व्यक्तीने अशी परिस्थिती का आणि कशामुळे निर्माण होते, याचा पडताळा घ्यायला हवा. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, तणाव निर्माण करणारे वा देणारे मुद्दे आणि कारणे यांचे स्वतः व त्रयस्थपणे विश्लेषण करून त्यावर काय आणि कशाप्रकारे उपाययोजना करता येईल, याचा विचार करून अशा अंमलबजावणी मानसिक तयारी करणे.
 
स्वतःच्या भावना समजून घेणे ः काम करताना विभिन्न मुद्दे व पैलूंवर विचार करावा लागतो. या प्रक्रियेत भावनांचा प्रभाव व्यक्तीवर अपरिहार्यपणे पडतो. बरेचदा आपल्याला मनाविरुद्ध विचार करावा लागतो वा निर्णयदेखील घ्यावा लागतो. त्यामुळे मानसिक तणाव अपरिहार्यपणे होतो. अशा वेळी वस्तुस्थिती व व्यावहारिक स्थिती याचा ताळमेळ घातल्यास, संतुलन साधले जाऊ शकते.

प्राथमिकतांना प्राधान्य देणे ः हल्ली एकाच व्यक्तीने विविध कामे करणे, अचानकपणे एखादे नवे काम करणे, प्रसंगी इतरांच्या गरजांनुरूप काम करावे लागणे या बाबी होतच असतात. यातून कामाचा व मानसिक ताण वाढतो. या सर्व बाबींना संतुलित ठेवण्यासाठी कामातील महत्त्वाच्या बाबींना प्राधान्य देणे, हा उपाय उपयोगी ठरतो.उपयुक्त कामकाज पद्धतींची अंमलबजावणीः काम करणार्‍यांचा अनुभव फार महत्त्वाचा असतो. आपल्या कामामध्येे सुधारणा वा सुकरता आणण्याचे काम ते प्रत्यक्षात करणारेच अधिक प्रभावीपणे करू शकतात. असे केल्यास काम सोपे सुकर व उत्पादक होते व प्रसंगी होणारा ताणतणाव सहजपणे टाळता येतो.

कामावर आत्मविश्वासासह नियंत्रण ः आपल्या कामाचे क्षेत्र व आवाका लक्षात घेऊन काम केल्यास, विशेषतः एकूणच कामकाजावर आत्मविश्वासासह नियंत्रण ठेवता येते. असे केल्यास एकूणच कामाचे संतुलन साधले जाऊ शकते.
 
कार्यालयाबाहेरचे काम ः स्वरूप आणि उपाय ः कार्यालय-कामाच्या ठिकाणी या परिघाबाहेर कामाची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे काम आणि त्यामुळे होणारी धावपळ-ताण काही प्रमाणात नियंत्रित करण्यासाठी, कामकामाचे ठिकाण, कामाचे स्वरूप याला शिस्त व निर्धारित पद्धत लावणे आवश्यक असते.वरील बाबी प्रसंगी लहान वा नित्याच्या वाटत असल्या, तरी त्याला योग्य व निर्धारित कार्यपद्धतीसह अमलात आणणे, हाच ठोस उपाय ठरतो व तेच लक्षात घेणे आवश्यक ठरते.
-दत्तात्रय आंबुलकरआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.