राज्यसभा म्हणजे अनुभवांचे विद्यापीठ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    08-Feb-2024
Total Views |
Narendra Modi on rajya sabha election

नवी दिल्ली: दर पाच वर्षांनी लोकसभेतील सदस्य बदलतात तर राज्यसभेत दर दोन वर्षांनी नवे सदस्य नवी उर्जा घेऊन येतात. त्याच प्रकारे, द्विवार्षिक निरोपसमारंभ देखील नव्या सदस्यांसाठी अविस्मरणीय आठवणी आणि अमूल्य वारसा ठेवून जातो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी राज्यसभेत केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप दिला. यावेळी ते म्हणाले, अधिक व्यापक सामाजिक मंचासाठी राज्यसभेतून निवृत्त होत असलेल्या सदस्यांना या सभागृहातील अनुभवाचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल. हे सभागृह म्हणजे सहा वर्षांच्या अनुभवांनी घडवलेले वैविध्यपूर्ण विद्यापीठ आहे. येथून जाणारा प्रत्येकजण समृद्ध होऊन जातो आणि जाताना देश उभारणीच्या कार्याला बळकटी देऊन जातो. आज निरोप देत असलेल्या सदस्यांना संसदेच्या जुन्या आणि नवीन इमारतीत काम करण्याची संधी मिळाली आणि ते अमृत काळ आणि संविधानाच्या 75 वर्षांचे साक्षीदार म्हणून या सदनाचा निरोप घेत आहेत, असे पंतप्रधानांनी म्हणाले.

जेव्हा अनिश्चितता मोठ्या प्रमाणात दिसत होती त्या कोविड महामारीची आठवण करून देताना पंतप्रधानांनी, सभागृहाच्या कामकाजात कोणताही अडथळा येऊ न देणाऱ्या सदस्यांच्या वचनबद्धतेचे कौतुक केले. यावेळी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी संसद सदस्यांनी घेतलेली मोठी जोखीम पंतप्रधानांनी नमूद केली. कोरोना विषाणूमुळे ज्या सदस्यांना आपला जीव गमवावा लागला त्यांच्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आणि सभागृहाने ते स्वीकारत पुढे वाटचाल सुरु ठेवल्याचे त्यांनी सांगितले.विरोधकांनी काळे कपडे परिधान केल्याच्या घटनेची आठवण करून देत पंतप्रधानांनी ते नमूद केले की, देश समृद्धीचे नवे उच्चांक गाठत आहे आणि देशाच्या प्रगतीच्या प्रवासाकडे वाकडी नजर रोखण्यासाठीचा प्रयत्न म्हणून या घटनेकडे ‘काळा टिका’ म्हणून पाहिले जाऊ शकते.

लोकशाहीच्या चर्चेत डॉ. मनमोहन सिंग यांचा उल्लेख अनिवार्य

या सभागृहाला तसेच देशाला मार्गदर्शनपर ठरलेल्या त्यांच्या दीर्घकालीन कार्यकाळामुळे आपल्या देशाच्या लोकशाहीबद्दलच्या प्रत्येक चर्चेत डॉ.मनमोहन सिंग यांचा नामोल्लेख होणे अनिवार्य असेल. असे प्रतिष्ठित सदस्य आपल्यासाठी दिशादर्शक प्रकाश असतात म्हणून त्यांच्या वागणुकीतून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी सूचना त्यांनी सर्व सदस्यांना केली. सभागृहातील सदस्याचे कर्तव्याप्रती समर्पण कसे असावे याचे प्रेरणादायी उदाहरण देत पंतप्रधान मोदी यांनी सभागृहातील मतदानासाठी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग व्हीलचेयरवर बसून सभागृहात उपस्थित राहिले, याचे कौतुक केले. याचे स्मरण केले. लोकशाहीला सामर्थ्य देण्यासाठी ते आले होते असा मला विश्वास आहे, पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी डॉ.मनमोहन सिंग यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.