काँग्रेसला मोठं खिंडार! देवरांनंतर 'या' बड्या नेत्याचा राजीनामा
08 Feb 2024 11:24:11
मुंबई : मुंबईत काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. मिलिंद देवरानंतर आता माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
बाबा सिद्दीकी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो. ४८ वर्षांचा हा एक महत्त्वपुर्ण प्रवास आहे. आज मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खूप काही व्यक्त करायला आवडले असते पण ते म्हणतात ना, काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो," असेही ते म्हणाले आहेत.
बाबा सिद्दीकी हे मुंबईतील वांद्रे पश्चिम मतदारसंघातून तीनदा आमदार राहिले आहेत. याशिवाय काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात ते मंत्रीदेखील होते. सध्या ते मुंबई काँग्रेस समिती आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या संसदीय बोर्डाचे अध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. याआधीही मुंबईमध्ये काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता बाबा सिद्दीकींनीच्या राजीनाम्याने काँग्रेसमध्ये मोठं भगदाड पडलं आहे. दरम्यान, बाबा सिद्दिकी आता कोणत्या पक्षात जाणार याबाबत त्यांनी घोषणा केली नसली तरी ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.