शिवरायांवरील ग्रंथाच्या प्रसारासाठी...

    08-Feb-2024
Total Views |
Mangesh Barbade

‘शककर्ते शिवराय’ या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील प्रसिद्ध ग्रंथाच्या प्रचार-प्रसारासाठी मंगेश बरबडे पूर्णवेळ प्रयत्नशील आहेत, त्यांच्याविषयी...

विक्री कौशल्याच्या क्षेत्रात विविध कंपन्यांत करिअर झाले. मात्र, त्यानंतर ग्रंथ प्रसाराच्या प्रेरणेने मंगेश बरबडे यांनी एक अनोखा मार्ग स्वीकारला. ‘शककर्ते शिवराय’ या सुप्रसिद्ध द्विखंडात्मक ग्रंथाच्या प्रसारासाठी त्यांनी पूर्ण वेळ कार्य सुरू केले. त्यासाठी अनेक उपक्रम ते यशस्वीपणे राबवित आहेत. मात्र, हे सगळे घडून यावे, अशीच काहीशी योजना असल्याची नम्र भावना ते व्यक्त करतात. मूळचे यवतमाळचे असलेले मंगेश बरबडे यांना लहानपणापासूनच इतिहासाची आवड. घरात पुस्तके, मराठी, इंग्रजी वर्तमानपत्रांचा सहवास त्यांना लाभला. अशा या बौद्धिक वातावरणातचस त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले.पुढे मंगेश करिअरसाठी 1999 साली पुण्यात दाखल झाले. अनेक नामांकित कंपन्यांमधून सेल्स विभागात त्यांनी सेवा बजावली. त्याच काळात इथल्या गड-किल्ल्यांना भेटी सुरू केल्या. पुढे 2019 साली नागपूरच्या ‘छत्रपती सेवा प्रतिष्ठान’चे कार्य पुण्यातून त्यांनी सुरू केले. आज ते प्रतिष्ठानच्या ‘शककर्ते शिवराय’ या द्विखंडात्मक ग्रंथाच्या प्रसारात पूर्ण योगदान देतात. “कुणी मला 1999ला पुण्यात आल्यावर सांगितले असते की, इथे पुण्यात बाजीराव रस्त्यावर एक कार्यालय असेल, ज्याचे कामकाज तू पाहशील, तर ते खोटे वाटले असते,“ असे ते सांगतात.

‘शककर्ते शिवराय’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ग्रंथाचा लेखन काळ आणि वाटचालीविषयी त्यांनी माहिती दिली. या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक विजयराव देशमुख यांनी 1974 मध्ये विदर्भातल्या शिवभक्तांसाठी किल्ले दर्शन यात्रा सुरू केली. ही सलग 15 दिवस चालणारी किल्ले दर्शन यात्रा होती. सिंदखेड राजा येथील जिजाऊ माता जन्मस्थानापासून ते रायगडापर्यंत अनेक स्थळांचे, किल्ल्यांचे दर्शन यात्रेद्वारे शिवभक्तांना घडले. पुढे शिवचरित्र लेखनाची प्रेरणा मिळाल्यानंतर, विजयराव देशमुख यांनी कागदपत्रे आणि अन्य संशोधन साधने गोळा केली. संस्थेची स्थापना आणि टप्प्याटप्प्याने ग्रंथाच्या दोन्ही भागांचे प्रकाशन झाले. ‘शककर्ते शिवराय’ हा ग्रंथ कोणत्याही प्रकाशकाला प्रसिद्धीसाठी दिलेला नाही. त्याचे वितरण ‘छत्रपती सेवा प्रतिष्ठान’मार्फत केले जाते. या ग्रंथाची हार्डबाऊंड आवृत्ती उपलब्ध होती. 2016 मध्ये या ग्रंथाच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले, अशी माहितीही बरबडे यांनी दिली.

प्रतिष्ठानमार्फत ग्रंथ प्रसारासोबतच विविध उपक्रम राबविले जातात. 1982 पासून ’जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार’ दिला जातो. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासह अनेक मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. 2019 मध्ये पुण्यातील कार्यालय सुरू झाल्यानंतर, या ग्रंथाच्या प्रचार-प्रसारावर मंगेश बरबडे यांनी भर दिला. 23 वर्षे विक्री विभागातील कार्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. संमेलने आणि ग्रंथप्रदर्शनाच्या उपक्रमांतून स्टॉल्स लावायला सुरुवात केली. पुणे महापालिकेच्या पु. ल. देशपांडे उद्यानात होणार्‍या ग्रंथप्रदर्शनात सहभागी होतात. प्रथम नाशिकच्या साहित्य संमेलनात त्यांनी स्टॉल लावला. महाराजांच्या काळी असेल, अशा सदरेसारखी त्याची रचना केली. स्टॉलवर येणार्‍याला आपल्या परंपरेप्रमाणे गूळ-पाणी, तांबूल द्यायला सुरुवात केली. हा केवळ एक पुस्तक विक्रीचा स्टॉल नाही, हा वेगळा उपक्रम आहे, हे लक्षात यायला लागले. लोकांचा प्रतिसाद वाढू लागला. ”आजपर्यंत अनेक गावांत, अनेक संमेलानांत, उपक्रमांत हे पुस्तक उपलब्ध करून दिले आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कारण, यातून पैसे कमावणे, हा उद्देश नाही. छत्रपती शिवाजी महाराजांवरील या चरित्रग्रंथाचा प्रसार होणे महत्त्वाचे आहे.

सगळीकडे लोक पुस्तक घेतात. अनेक संमेलनस्थळी चांगली विक्री झाली. अमळनेरच्या साहित्य संमेलनातही या ग्रंथाची विक्री चांगली झाली,” असे बरबडे सांगतात. विक्रीखेरीज या ग्रंथाच्या निमित्ताने समाजातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. शिक्षण संस्थांच्या मदतीने नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी किल्ले दर्शनाचा उपक्रम हाती घेतला आहे. रक्तदानासारखे उपक्रमही आयोजित केले आहेत. बदलत्या काळानुसार फेसबुक पेज, इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केले. तसेच पॉडकास्टद्वारे लोकांना माहिती दिली आहे. यंदा 350वा शिवराज्याभिषेक दिन आणि प्रतिष्ठानला 50 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल, ऑनलाईन व्याख्यानांचे देखील आयोजन केले आहे. अलीकडे प्रसारासाठी या ग्रंथाची द्विखंडात्मक पेपरबॅक आवृत्ती अवघ्या 500 रुपयांत वाचक, विक्रेते सर्वांनाच उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे कसे घडून आले, याची कहाणी बरबडे यांनी सांगितली.2019 मधील घटना. ग्रंथाच्या प्रती संपत आल्या, तेव्हा एक हजार प्रतींचे कोटेशन घेऊन गेलो होतो. मात्र, प्रतिष्ठानने एक लाख प्रतींचा संकल्प केला.

तोही दोन्ही पेपरबॅक खंड. अवघ्या 500 रुपयांत विक्रेते, वाचक सर्वांनाच उपलब्ध करून देण्याचा संकल्प! हे काम अनेकांच्या सहयोगाने पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. गतवर्षी जूनमध्ये ही योजना आणली, त्यानंतर तीनएक आवृत्त्या आजपर्यंत संपल्या आहेत. केवळ वाचकच नव्हे, तर अनेक बँका, पतसंस्था, शैक्षणिक संकुले, उद्योजक यांच्याकडून मोठी खरेदी होत असल्याच्या घटना त्यांनी सांगितल्या.“शिवपथ स्वीकारला, शिवचरित्राच्या प्रसार कार्याची कास धरली. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा, त्याचप्रमाणे आई-वडिलांची पुण्याई, ज्येष्ठ बंधू मोहन बरबडे यांचा आशीर्वाद आणि पाठराखण, सद्गुरू विजयराव देशमुख आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक अजयराव देशमुख यांच्यामुळेच इथवर मार्गक्रमणा झाली आहे, आज जो काही आहे, तो या सर्वांमुळे आहे,” अशी भावना मंगेश बरबडे व्यक्त करतात. त्यांना शुभेच्छा!


-मनोज तुळपुळे


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.