दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ बचाव आंदोलनाला यश!

शाळा आणि वाढीव क्षमतेसह दामोदर नाट्यगृह यांचे बांधकाम एकाच वेळी सुरू होणार...

    07-Feb-2024
Total Views |
damodar natyagruha News

मुंबई (दिपक वागळे
) : नमन, मेळे, दशावतार, शक्ती-तुरे, मराठी नाटक, हौशी कलाकार, आणि लोककलांचे माहेर घर असणारे दामोदर नाट्यगृह १० वर्षे बंद राहिले तर गिरणगावातील मराठी नाट्यरसिक, रंगकर्मीनी जायचे कुठे..? गिरणगावातील या नाट्यगृहाच्या पाडकामामुळे नाटयकलावंत आणि जनतेच्या मनात क्षोभ निर्माण झाला आहे. आहे त्याच ठिकाणी किमान एक हजार आसनव्यवस्थेसह दामोदर नाट्यगृह, सहकारी मनोरंजन मंडळाला त्यात पूर्वीप्रमाणेच जागा आणि शाळेच्या गरजेनुसार फेज मॅनरमध्ये शाळेचे बांधकाम उभे राहण्यासाठी योग्य तो सुधारित आराखडा तयार करण्याचे आदेश मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी सोशल सर्विस लीग आणि संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना दिले. त्यासाठी वेळ पडल्यास तज्ज्ञ आर्किटेक्टची मदत घ्या. शाळेची आताची इमारत कमकुवत वाटल्यास त्याचे रिस्टोरेशन करण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न करता येईल का ते पहा. आवश्यक वाटल्यास महापालिकेकडे त्या परिसरात कोणती इमारत असेल तर तात्पुरती शाळेसाठी उपलब्ध करून द्या. पण नाट्यगृह आणि शाळा ही दोन्ही बांधकामे एकाच वेळी झाली पाहिजेत असे निर्देश मंत्री केसरकरांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.

मागील काही महिन्यांपासून परळ येथील दामोदर नाट्यगृहाचे तोडकाम थांबवण्याचे आदेश संबंधित पालिका तसेच राज्य प्रशासनाने दिले होते. नाट्यगृहाच्या जागी वाढीव क्षमतेचे नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळाला त्यात पूर्वीप्रमाणेच जागा अशा वादात सोशल सर्व्हिस लीग आणि सहकारी मनोरंजन मंडळ यानिमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकले होते. "दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळाचे सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान नाकारता येणार नाही. गिरणगावचा हा सांस्कृतिक वारसा जतन केला गेला पाहिजे. दामोदर नाट्यगृह त्याच जोमाने त्याहीपेक्षा अधिक क्षमतेचे त्याच जागी उभारण्यात येईल, त्यात सहकारी मनोरंजन मंडळालाही पूर्वीप्रमाणे किंबहुना वाढीव जागा देण्यात येईल" असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी सहकारी मनोरंजन मंडळ आणि नाट्यकर्मीना दिला आहे. दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ बचाव आंदोलनाच्या प्रश्नांवर पालकमंत्री दीपक केसरकरांनी बुधवारी महापालिकेत बैठक बोलावली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रवीण दरेकर, कालिदास कोळंबकर, स्थानिक नेते नाना आंबोले, संबंधित पालिका अधिकारी तसेच सोशल सर्व्हिस लीग आणि सहकारी मनोरंजन मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री दीपक केसरकर यावेळी म्हणाले की, शाळा आणि नाट्यगृहांचे बांधकाम एकाचवेळी सुरू करण्यात यावे आणि दोन वर्षांत सदर बांधकाम पूर्णत्वास न्यावे, असे सांगतानाच यासाठी महापालिका अधिकाऱ्यासह मी स्वतः गुरुवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी सदर जागेची पाहणी करण्यासाठी येतो, असे आश्वासनही केसरकर यांनी यावेळी दिले. नाट्यगृहाचा आराखडा बनवताना नाट्यकर्मी आणि तज्ञ आर्किटेक्ट यांची एक समिती नेमली जाईल आणि त्यांच्या सूचनांना अनुरूप नाट्यगृहाचा आराखडा तयार करण्यात येईल, जेणेकरून नवीन नाट्यगृहात काही त्रुटी राहणार नाहीत, असेही त्यांनी घोषित केले. तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून सहकारी मनोरंजन मंडळाचे बंद झालेले अनुदान पुन्हा सुरू करून देण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

damodar natyagruha News


गिरणगावातील कामगार, लोककलावंतांची हक्काची रंगभूमी असणाऱ्या दामोदर नाटयगृहाचे पाडकाम दि. १ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झाले. परंतु, पुनर्विकासाबाबत दामोदर नाट्यगृहाशी संबंधित कलाकार आणि सहकारी मनोरंजन मंडळ यांनी साशंकता व्यक्त करत नोव्हेंबर महिन्यात दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ बचाव आंदोलन करण्यात आले. दै. मुंबई तरुण भारतने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल खुद्द पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली. मंत्री लोढा यांनी तात्काळ संबंधितांशी भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. यानंतर लगेचच येथील तोडकामाला पालिकेच्या डीपी विभागाने या बांधकामाला स्थगिती आदेश दिल्याने डिसेंबर महिन्यापासून बांधकाम थांबविण्यात आले. दै. मुंबई तरुण भारत' याबाबतीत सातत्याने पाठपुरावा करत होता. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी म्हणून दामोदर नाट्यगृहाचा प्रश्न उपस्थित करत दामोदर बचाव आंदोलनाला एकप्रकारे बळकटी दिली.

नेमका वाद काय?

सोशल सर्व्हिस लीग संस्थेने ऐन दिवाळीच्या तोंडावर दोन महिन्यांचा पगार देऊन नाट्यगृह कर्मचाऱ्यांना कायमच घरी बसवले. सहकारी मनोरंजन मंडळाच्या डोअर किपर्सना (नाट्यगृहाचे द्वारपाल) तर तेही मिळालं नाही. सन १९२२ साली ना. म. जोशींनी स्थापन केलेल्या गिरणगावातील दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळाने २०२२ मध्ये १०० वर्षे पूर्ण केली. गिरणगावातील अनेक नामवंत संगीत तसेच नाटय कलाकारांनी याच सहकारी मनोरजन मंडळाच्या जागेत नाटकाच्या तालमी केल्या आणि याच दामोदर नाट्यगृहाच्या रंगगचावर आपली ओळख मिळवली असताना सोशल सर्व्हिस लीग'ने "आम्ही हॉल तोडून शाळा बाधणार आहोत, त्यासाठी जागा खाली करा", एवढेच अधिकृतपणे सहकारी मनोरजन मंडळाला सांगितले. परंतु, तोडण्यात येणारे दामोदर नाट्यगृह कुठे आणि कधी होणार? दामोदरच्या वास्तूत असलेल्या सहकारी मनोरंजन मंडळासाठी जागा कुठे आणि कधी देणार? नाट्यगृह पाडल्यानंतर नाटक, रिहर्सल कुठे करायची? सहकारी मनोरंजन मंडळाचे नाटकांच्या तालमी/उपक्रम कुठे करायचे? अशा प्रश्नांचे लेखी ठोस उत्तर देण्यात आले नाही. उलट तात्काळ वीजपाणी तोडून आम्हाला अंधारात टाकले आहे, असा आरोप सहकारी मनोरंजन मंडळाने केला. आम्हा रंगकर्मींचा विरोध पुनर्विकासाला नाही, आमचा विरोध पुनर्विकासाच्या नावाखाली गिरणगावातील ८०० खुर्च्यांचे दामोदर नाट्यगृह अप्रत्यक्षपणे बंद करण्याला आहे, सहकारी मनोरंजन मंडळाला हक्काच्या निवाऱ्यातून बेघर करण्याला विरोध आहे. दामोदर हॉल तोडून पुन्हा त्या जागी वाढीव क्षमतेचे नाट्यगृहच व्हायला हवे. नाट्यगृहाचा वाढीव एफएसआय नाट्यगृहासाठीच वापरला गेला पाहिजे. सहकारी मनोरंजन मंडळाला दामोदर नाट्यगृहात जागा जागा मिळायला हवी, अशी मागणी सहकारी मनोरंजन मंडळाने केली होती.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.