चाणाक्य म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी गेली कशी?

    07-Feb-2024
Total Views |
Sharad Pawar news
 
आपण नेहमीच म्हणतो, देशात शरद पवार यांच्या उंचीचा नेता नाही, पण दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर शरद पवारांना स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही. त्यांना कधीही स्वत:च्या ताकदीवर मुख्यमंत्री बनता आलं नाही, असे विधान दि. २० ऑगस्ट २०२३ रोजी दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत केले. दिलीप वळसे पाटलांनी हे विधान करुन एकप्रकारे शरद पवारांची राजकीय उंची मोजली, असंच म्हणता येईल. पण दुसरीकडे शरद पवारांना महाचाणक्य अशी उपाधी जोडणारे अनेक नेते शरद पवार गटात आहेत.पण दि.६ फ्रेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंबधी दिलेल्या निकालानंतर महाचाणक्य गंडलेत का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलायं. त्यामुळे राष्ट्रवादीत फुट का पडली? शरद पवारांच्या पाच महत्त्वपुर्ण चुका कोणत्या ज्यामुळे पक्षात बंड झालं? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

२ जुलै २०२३ अजित पवार शरद पवार यांच्याविरुध्द बंड करुन भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर प्रकर्षाने शरद पवारांच्या चुकांवर चर्चा माध्यमांवर केली जाऊ लागली. त्यातील पाच चुका आपण जाणून घेऊ. शरद पवारांची पहिली चुक म्हणजे सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करणे. या चुकीची आठवण खुद्द अजित पवारांनी दि. ५ जुलै २०२३ रोजी मुंबईत केलेल्या शक्तीप्रदर्शनात काकांना करून दिली. अजितदादा म्हणाले की, मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही माझी चूक झाली का? मुळात या प्रश्नाचा रोख होता, सुप्रिया सुळेंकडे. कारण शरद पवारांनी अजित पवारांना डावलून सुप्रिया सुळेंना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष केलं होतं. या निर्णायाने एक प्रकारे शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना आपला राजकीय वारसदार घोषित केलं. आणि त्यामुळे तळागळात राष्ट्रवादी पोहचवणाऱ्या अजित पवार गटाचे नेते दुखी झाले. आणि हीच शरद पवारांची मोठी चुक होती.

त्यानंतर शरद पवारांची दुसरी चूक म्हणजे, शरद पवारांनी अजितदादांचे केलेले खच्चीकरण. सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करण्याआधी शरद पवारांनी अजित पवारांना राजकारणात बदनाम करण्याची आणि खच्चीकरण करण्याची एकही संधी सोडली नाही. ह्याच उदाहरण म्हणजे, २००४ ची निवडणूक. २००४ च्या निवडणूकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमध्ये राष्ट्रवादीला ७१ आणि काँग्रेसला ६९ जागा मिळालेल्या होत्या. संख्याबळानुसार, सर्वात मोठा पक्ष असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद मिळायला हवे होते. उलट राजकीय विश्लेषक सांगतात की, त्यावेळी विलासराव देशमुखही राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद देण्यासाठी तयार होते. पण शरद पवारांनी अजितदादाचं खच्चीकरण करत, काँग्रेसला मुख्यमंत्री पद देऊ केल. त्यामुळे शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री पदापासुन दुर ठेवण्यासाठी अनेक राजकीय डावपेच खेळले, असं राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे अजित पवारांचं शरद पवारांनी केलेलं राजकीय खच्चीकरण ही दुसरी चूक होती.

त्यानंतर शरद पवारांची तिसरी चूक म्हणजे, पवारांनी पक्षात काहींना दिलेले विशेष अधिकार आणि अजित पवारांना डावलणं. २०१९ ला पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जातं होती. त्यावेळी शरद पवारांना एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारला की, पार्थ पवार हे लोकसभा निवडणूकीची तयारी करतायेत, ते निवडणूक लढविणार का? त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, सगळी तिकीटं कुटुंबातच दिली तर कार्यकर्त्यांनी काय करायचं? या विधानावरून पार्थ पवारांचा राजकीय प्रवेश शरद पवारांना मान्य नसल्याचं स्पष्ट झालं होतं. २०२० मध्ये ही शरद पवारांनी "पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत. आम्ही त्यांच्या मताला कवडीचीही किंमत देत नाही," असे वक्तव्य केले होते. पण दुसरीकडे शरद पवारांकडून रोहित पवारांना दिली जाणारी वागणूक , महत्त्वाच्या बैठकांमध्ये रोहित पवारांची उपस्थिती, महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या काळात रोहित पवार सातत्याने माविआच्या बैठकांमध्ये उपस्थिती.यावरून रोहित पवारांविषयी असणारी शरद पवारांची आपुलकी लक्षात येते. ज्यामुळे हा विशेष अधिकार पवारांना महागात पडला. तसेच जितेंद्र आव्हाडांवरील अजितदादांची नाराजी स्पष्ट आहे. एकदा अजितदादा स्वत: म्हणाले होते की, राज्यात वाचळविरांची संख्या वाढता आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत आहोत. विकासाची कामे करण्यासाठी सत्तेत आहोत. सार्वजनिक कामे झालीच पाहिजे. राज्यातील सर्व सामान्यांचे कल्याण ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे पक्षात काहींना दिलेले विशेष अधिकार ही देखील शरद पवारांची चूक होती.

त्यानंतर मी म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार, असा आविर्भाव निर्माण करणे. ही देखील शरद पवारांची चूक आहे. फुटीनंतर ही पक्षात समन्वय साधून पक्षातील आमदारांशी चर्चा करून तोडगा काढता येणं शक्य असताना ही, आमदार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे!, असे विधान पवारांनी केले. तर दुसरीकडे बंडानंतर शरद पवारांनी घेतलेली संभ्रमात टाकणारी भुमिका देखील त्यांची चूक अधोरेखित करते. "अजितदादा आमचे नेते आहेत. यात वादच नाही. फूट म्हणजे काय? पक्षात फूट कशी पडते? राष्ट्रीय पातळीवरील मोठा गट पक्षापासून फारकत घेतो तेव्हा त्याला फुट म्हणतात. पण आज राष्ट्रवादीत तशी परिस्थिती नाही. होय, काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. पण त्याला फाटाफूट म्हणता येणार नाही. लोकशाहीत ते हे करू शकतात." , असं सकाळी म्हणणारे पवार, सायंकाळी."अजित पवारांना पक्षात पुन्हा संधी नाही. पहाटेच्या शपथविधिवेळी ठरलं होतं. पुन्हा असं करणार नाही.तसेच अजित पवार आमचे नेते आहेत,असं विधान मी केलेलं नाही, अशी पलटी पवारांनी मारली. ज्यामुळे त्यांची बदलणारी भुमिका बंडामागची चूक ठरू शकते.

तसेच पवाराचं फोडाफोडीचं राजकारणचं त्यांची पाचवी चूक ठरले. १९७८ ला विधानसभा निवडणूकीनंतर वसंतदादा पाटलांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकार पाडतं शरद पवारांनी बंड केला. आणि पुलोदचा प्रयोग केला. पण या फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात करून नंतर शरद पवारांना आपल्याच पक्षातील नेत्यांचा विश्वास संपादन करता आला नाही, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. ज्यामुळे पक्षातील नेत्यांचा शरद पवारांवर असलेला अविश्वास हा देखील अजितदादांच्या बंडामागची पवारांची मोठी चूक स्पष्ट करतो.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.