‘स्टार्टअप’ युवराज झालेत ‘नॉन स्टार्टर’ : पंतप्रधानांनी राज्यसभेत काँग्रेसला धुतले

नेत्याची गॅरंटी नसलेल्यांनी ‘‘मोदी गॅरंटी’’वर प्रश्न विचारू नये

    07-Feb-2024
Total Views |
 PM Narendra modi in rajyasabha

नवी दिल्ली :
तुमच्या पक्षाचे युवराज हे स्टार्टअप असल्याचे वाटले होते, मात्र हे आता नॉन स्टार्टर झाले आहेत. त्यामुळे पक्ष, नेता आणि धोरण यांचा भरवसा नसलेल्यांनी ‘मोदी गॅरंटी’वर प्रश्न उपस्थित करू नये; असा सणसणीत टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेसला राज्यसभेत लगाविला आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपती अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावास उत्तर दिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात जोरदार टोलेबाजी करून काँग्रेसला मनसोक्त धुतले. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा चांगलाच संताप झाल्याचे दिसून आले. खर्गे यांच्या राज्यसभेतील एका भाषणाचा संदर्भ घेऊन पंतप्रधान म्हणाले की, आम्हाला खर्गेंनी आम्हाला लोकसभा निवडणुकीत ४०० जागा आशीर्वाद दिला आहे, आता मात्र त्यांना तो आशीर्वाद मागे घ्यायचा असल्यास त्यांनी तो जरूर घ्यावा. मात्र, आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ आता फार दूर नाही. या तिसऱ्या कार्यकाळामध्ये विकसित भारताचा पाया अधिकच मजबूत होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

काँग्रेस पक्ष सध्या देश तोडण्याचा विचार पसरवित असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. देशात दक्षिण विरुद्ध उत्तर असा वाद पेटविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी समाजात विविध घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात अफवा पसरविण्यात येत आहेत. सरकार उद्योगांविषयी खोटे सांगितले जात आहे. काँग्रेस पक्षच सध्या नैराश्यात असल्याने संपूर्ण देशात काँग्रेस नैराश्य पसरविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ आता दूर नाही. या तिसऱ्या कार्यकाळामध्येही यापूर्वीच्या दोन कार्यकाळांप्रमाणेच वेगवान विकास होणार असून विकसित भारताचा पाया अधिक मजबूत होईल, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावरदेखील नाव न घेता पंतप्रधानांनी टिका केली. ते म्हणाले, काँग्रेसने आपल्या युवराजांना एक स्टार्टअप बनवून टाकले आहे. मात्र, सध्या ते स्टार्टअप आहे, परंतु सध्या तो नॉन-स्टार्टर आहे. ते सुरूही होत नाहीत आणि लाँचही करता येत नाही. काँग्रेस पक्ष सध्या विचारांनी आउटडेटेड झाला आहे तर त्यांचे कामकाजही आउटसोर्सद्वारेच सुरू आहे. देशात दीर्घकाळपर्यंत सत्तेत असलेल्या पक्षाची अशी स्थिती होणे हे अतिशय दुर्दैवी असून तुमच्याविषयी आम्हाला सहानुभूती वाटते. काँग्रेसला सध्या प. बंगालमधून ४० जागा जिंकून दाखवा, असे आव्हान आले आहे. मात्र, काँग्रेसने आपल्या ४० जागाही वाचवू शकणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे नेता, पक्ष आणि नितीविषयी भरवसा नसलेल्या पक्षाने ‘मोदी गॅरंटी’वर प्रश्न करू नये; असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
 
आरक्षणास विरोध हेच काँग्रेसचे धोरण

पं. नेहरू यांचा अनुसूचित जाती व जमातींच्या आरक्षणास विरोध असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नेहरूंच्या एका पत्राचा हवाला देऊन सांगितले. नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की मी कोणत्याही प्रकारच्या प्रामुख्याने सरकारी नोकरीतील आरक्षणाच्या विरोधात आहे. आरक्षण हे अकार्यक्षमता आणि अकुशलतेस प्रोत्साहन देते. आरक्षणामुळे सरकारी कामकाजाचा स्तर घसरेल, असे नेहरूंनी आपल्या पत्रात म्हटले होते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आरक्षणविरोधी काँग्रेसमुळे देशातील अनुसूचित जाती व जमातींनी कधीही आरक्षण मिळाले नसते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.