"अकेला देवेंद्र क्या करेगा! हे कळलं असतं तर ओसाड गावचे पाटील झाले नसता!"
07 Feb 2024 15:22:47
मुंबई : अकेला देवेंद्र क्या करेगा हे आधीच ओळखलं असतं तर आज ओसाड गावाचे पाटील बनण्याची वेळ आली नसती, असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी खासदार सुप्रिया सुळेंना लगावला आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊतांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, "मुघलांच्या वंशजांनी आणि औरंग्याच्या पिल्लावळांनी आमच्या देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याची हिंमत करु नये. 'अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा' हे यांच्याच ताई बोलायच्या. पण आता 'अकेला देवेंद्र फडणवीस ही काफी है' असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. म्हणून देवेंद्र फडणवीसांना तुम्ही पहिल्या दिवसापासून ओळखलं असतं तर आज ओसाड गावाचे पाटील बनण्याची वेळ आली नसती," असा टोला त्यांनी लगावला आहे.
पुढे ते म्हणाले की, "निवडणुक आयोगाने केवळ पक्षाच्या आमदार आणि खासदारांची संख्या बघितली नाही. आज कुठल्याही जिल्ह्यात गेल्यावर कळेल की, तिथली राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना नेमकी कुणाबरोबर आहे. पण ज्यांनी स्वत:च्या हाताने आपल्या मालकाचा पक्ष संपवला त्यांनी दुसऱ्यांबद्दल बोलण्याची हिंमत करु नये. शेवटी 'अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा' याचं उत्तर 'अकेला देवेंद्र फडणवीस ही काफी है' हे आमच्या ताईला यानिमित्ताने काल कळलं असेल," असा टोलाही त्यांनी सुप्रिया सुळेंचं नाव न घेता लगावला आहे.