ठाण्यात मिळणार आपल्या स्वप्नातील घरकुल

क्रेडाई एमसीएचआयचे १६ ते १९ फेब्रुवारी रोजी ठाणे गृह उत्सव प्रदर्शन

    07-Feb-2024
Total Views |
Credai mchi in thane city home

ठाणे  : 
आपल्या स्वप्नातील घरकुल व्हावे, अशी प्रत्येक नागरिकांची इच्छा असते. स्वप्नातील हे घर शोधण्याची प्रतिक्षा आता संपली आहे. ठाण्यात ५० हुन अधिक विकासकांच्या १०० पेक्षा जास्त प्रकल्पातील घरे ठाण्यातील रेमंड मैदानात १६ फेब्रु. ते १९ फेब्रु. या कालावधीत क्रेडाई एमसीएचआयच्या "ठाणे गृह उत्सव' या प्रदर्शनात पाहता येणार आहेत. या प्रदर्शनाचे उदघाटन १६ फेब्रु. रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनात यंदा प्रथमच गृह, पुर्नविकास, महारेरा यावर व्याख्यान तसेच परिसंवाद होणार असुन हेलिकाप्टरची आभासी सैर देखील ठाणेकरांना घडवली जाणार आहे.अशी माहिती एमसीएचआय ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भावेश गांधी, जय व्होरा सचिन मिराणी, संदीप माहेश्वरी, मनीष खंडेलवाल,गौरव शर्मा, निमित मेहता आदी उपस्थित होते.
 
सांस्कृतिक नगरी असलेल्या ठाणे शहराला समृद्ध व संपन्न इतिहास आहे. सध्या शहरात विविध सुविधा उपलब्ध असून, शांत व सुरक्षित वातावरणात निवासासाठी ठाणे शहराची राज्यात `रिटेल हब' म्हणून ओळख झाली आहे. ठाण्यातील वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या मैदानात क्रेडाई एमसीएचआयच्या वतीने २१ वे "ठाणे गृह उत्सव' प्रदर्शन आयोजित केले आहे. सर्वाना मोफत प्रवेश असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन १६ फेब्रु. रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून यावेळी रेमंड उद्योगसमुहाचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील निमंत्रण दिले असल्याचे एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितले.

 ठाणे गृह उत्सवाची वैशिष्ट्ये

* मुंबई महानगर क्षेत्रात गृहकर्ज व मालमत्ता खरेदीसाठी विश्वासार्ह प्रदर्शन
* ठाण्यातील १०० हून अधिक गृहप्रकल्प
* ५० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग
* १५ हून अधिक बॅंका व गृहकर्ज वित्तीय संस्था
* घरखरेदीसाठी उत्सूक २० हजारांहून अधिक कुटुंबे प्रदर्शनाला भेट देणार

`कल आज और कल–महारेरा' विषयावर व्याख्यान

क्रेडाई एमसीएचआयच्या, प्रॉपर्टी प्रदर्शनात `कल आज और कल–महारेरा' विषयावर प्रसिद्ध सीए अश्विन शाह यांचे १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता व्याख्यान आहे.महारेरा कायद्यातील तरतूद, अंमलबजावणी, प्रकल्पात अडचणी उद्भवल्यास बांधकाम व्यावसायिकापर्यंत पोचणे आदी बाबत माहिती देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या व्याख्यानाला उपस्थित राहून महारेरा कायद्याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी केले आहे.

मिस अॅण्ड मिसेस ठाणे फॅशन शो

या गृह उत्सव प्रदर्शनात गृहप्रकल्पांबरोबरच शानदार पद्धतीने लाईफस्टाईल प्लस इव्हेंटचेही आयोजन करण्यात आले आहे. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता मिस अॅण्ड मिसेस ठाणे फॅशन शो रंगणार आहे. घर खरेदीदार ग्राहकांना प्रकल्प पाहतानाच नारीशक्तीचा सन्मान व शहराची समृद्ध संस्कृती दाखविण्यासाठी फॅशन शो आयोजित केला आहे.

पुनर्विकासावर परिसंवाद

प्रदर्शनात १८ फेब्रुवारी रोजी `ठाणे शहराचा पुनर्विकास' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये वास्तूविशारद मकरंद तोरसकर, वास्तूविशारद मकरंद पारंगे, अॅड. प्रसन्न माटे आणि ठाणे जिल्हा गृहनिर्माण फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे सहभागी होणार आहेत. तसेच यंदा शहरातील उत्कृष्ट गृहनिर्माण संस्थांचा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.

एमसीएचआय, हौसिंग फेडरेशनतर्फे स्वच्छ सोसायटी स्पर्धा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छता अभियानाला अनुसरून एमसीएचआय आणि ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्यावतीने १८ फेब्रु. रोजी ठाणे शहर व जिल्ह्यातील स्वच्छ गृहनिर्माण सोसायट्यांसाठी स्पर्धा आयोजित केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येकी ८ गृहनिर्माण सोसायट्यांना रोख रकमेचे बक्षीस दिले जाणार आहे.

करा ठाण्याची आभासी हेलिकॉप्टर सैर!

गृह उत्सव प्रदर्शनात यंदा प्रथमच ठाणे शहराची आभासी पद्धतीने हेलिकॉप्टर सैर करता येणार आहे. घर खरेदीसाठी आलेल्या इच्छूक ग्राहकांना आभासी पद्धतीने हेलिकॉप्टरची सैर घडविली जाणार आहे. त्यातून ठाण्यातील विविध भागांचा आभासी पद्धतीने थरारक प्रवास करता येईल. त्याचबरोबर ठाणे शहराचे विलोभनीय दृष्य पाहण्याची संधी मिळणार आहे. व्हर्च्युअल रिॲलिटी इनोव्हेशनमध्ये व्ही.आर.कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने ही हेलिकॉप्टरची सैर उपलब्ध केली आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.