रामललाच्या जयघोषात मुंबईतून पहिली 'आस्था ट्रेन' अयोध्येला रवाना!

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    06-Feb-2024
Total Views |

Astha Train


मुंबई :
'जय श्रीराम'चे नारे देत मोठ्या भक्तिमय वातावरणात मुंबईहून सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी 'आस्था ट्रेन' अयोध्येला रवाना झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, आ. प्रविण दरेकर, आ. मनीषा चौधरी उपस्थित होते. २४ मार्च पर्यंत 'मिशन अयोध्या ' अभियान सुरू राहणार आहे.
 
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अयोध्येला जाणारे सर्व लोक भाग्यशाली आहेत. त्यांना प्रभू रामाचे दर्शन घेता येणार आहे. अयोध्येला जाणाऱ्या सर्वांचा हेवा वाटतो. कारण प्रभू रामाचे दर्शन तुम्हाला माझ्याआधी घेता येणार आहे. ५०० वर्षे जे स्वप्न आपण बघितले, शेकडो लढाया झाल्या, हजारो बलिदान झाले. त्याच ठिकाणी आज रामलल्ला स्थापित झाले. ६ डिसेंबर १९९२ कलंकाचा ढाचा खाली आणला आणि रामलल्लाची मूर्ती त्याठिकाणी स्थापित केली."
 
"आम्ही सर्व काँक्रीटच्या घरात राहतो आणि आमचं आराध्य दैवत मातीच्या घरात राहते. त्यामुळे आमचा नारा होता 'रामलला हम आयेंगे मंदिर भव्य बनायेंगे... ' देशाचे प्रधानमंत्री मोदीजींचे आभार मानतो त्यांनी हे स्वप्न पूर्ण केले. रामललाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ती मूर्ती पाहिल्यानंतर प्रभू रामाची अनुभूती येते. ती मूर्ती १४० कोटी जनतेच्या आशा आकांक्षाची पूर्ती आहे," असेही फडणवीस म्हणाले.
 
मोदी सरकारमुळे राम मंदिर पूर्णत्वास!
 
"काही लोक प्रश्न विचारतात तुम्ही काय केले? त्यांना माझा प्रश्न आहे.. न्यायालयामध्ये २००८ साली तेव्हाच्या केंद्र सरकारला विचारले होते की, या ठिकाणी मंदिर होते असे केंद्र सरकारचे मत आहे का? त्यावेळी केंद्र सरकारने सांगितले रामाचा जन्म अयोध्येत झाला, याचा कुठलाही पुरावा त्याठिकाणी नाही. अशा प्रकारचे एफिडेविट कोर्टात दाखल केले होते. २०११ साली याच लोकांनी दुसरे एफिडेविट दाखल केले की, रामसेतू काल्पनिक आहे. रामसेतू नावाची कुठलीही गोष्ट नाही. नरेंद्र मोदी सरकारने ठामपणे इथेच मंदिर आहे याच ठिकाणी मंदिराचे अवशेष मिळाले आहेत आणि हीच रामाची जन्मभूमी आहे असे ठणकावून सांगितले. याच ठिकाणी मंदिर आम्हाला बांधायचे आहे असे सांगितले."
 
"मोदी सरकारने ही भूमिका घेतली त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. काहीजण म्हणतात हे सुप्रीम कोर्टामुळे झालं पण मोदीजींचे सरकार नसते तर ते होवू शकले नसते कारण सुप्रीम कोर्टात या लोकांनी राम काल्पनिक असल्याचे एफिडेविट केले होते," अशी टीका फडणवीस यांनी केली.
 
मुंबईत काही फेक रामभक्त!
 
"मुंबईमध्ये काही फेक राम भक्त फिरत आहेत. जोरजोरात भाषण करत आहेत. जोरात बोलत आहेत. स्वतःला राम भक्त सांगत आहेत. आम्हीच बाबरी तोडली असे सांगत आहेत. हे तेच लोक आहेत जेव्हा बाबरी ढाचा खाली आला तेव्हा ते आपल्या घरामध्ये लपून बसले होते; घाबरून बसले होते. ते लोक आम्हाला आता शिकवत आहेत. आम्हाला अभिमान आहे कलंकाचा ढाचा आम्ही खाली आणला. आता त्या ठिकाणी मंदिर तयार झाले. तुम्ही त्या मंदिराकडे कुच करत आहात," असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.