वैश्विक विश्वासाची गुंतवणूक

    06-Feb-2024
Total Views |
Editorial on Editorial on Foreign Institutional Investors Moving on Indian Stock Market

जागतिक पातळीवर अनिश्चितता कायम असतानाही, भारतीय शेअर बाजाराची आजवरची कामगिरी ही लक्षणीयच. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना आकर्षित करणारा भारतीय बाजार, आता जगातील सर्वांत मोठा चौथ्या क्रमांकाचा बाजार ठरला. त्याशिवाय चिनी बाजारपेठेला समर्थ तसेच विश्वासार्ह पर्याय अशीही त्याची ख्याती निर्माण झालेली दिसते. म्हणूनच देशातील गुंतवणूकदारांबरोबर विदेशी गुंतवणूकदारही भारतीय शेअर बाजाराकडे विश्वासाने झेपावले आहेत.

लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असून, नुकतेच गेल्या तिमाहीचे आशादायी चित्रही समोर आले. बाजारात काहीशी अस्थिरता असली तरी यंदाच्या आर्थिक वर्षात सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित मूल्यांकन चार ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. गेल्या वर्षभरात निर्देशांक तसेच निफ्टीच्या वाढीमुळे देशांतर्गत गुंतवणूकदारच नव्हे, तर विदेशी गुंतवणूकदारांनीही भारतीय बाजारात कोट्यवधींची गुंतवणूक करुन, आपला विश्वास दर्शविलेला दिसतो. चिनी बाजारपेठांमधील जोखीम वाढल्याने, तसेच तेथील मंदी कायम असल्याने भारतीय बाजारांनी विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित केले. एका अहवालानुसार, गुंतवणुकीच्या जोरदार प्रवाहामुळे गेल्या दहा महिन्यांत निफ्टी एक तृतीयांश इतका वाढला, तर गेल्यावर्षी २० अब्ज डॉलरपेक्षा जास्त विदेशी गुंतवणूक नोंदवण्यात आली.
 
गेले काही महिने सातत्याने भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल विदेशी संस्था, जागतिक नाणेनिधी तसेच जागतिक बँकेने सकारात्मक भाकीत वर्तविलेले दिसते. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून गौरवली गेलीच, त्याशिवाय ती अधिक विश्वासार्ह असल्याचे मत जगभरातून मांडले गेले. त्यामुळेच गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित होताना दिसून येतात. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारत यापूर्वीच ओळखला जाऊ लागला. जगाचे उत्पादन केंद्र म्हणून भारताची आंतरराष्ट्रीय नकाशावर ओळख प्रस्थापित झाली. या पार्श्वभूमीवर चिनी अर्थव्यवस्था तसेच बाजारपेठ मंदीत असताना स्वाभाविकपणे भारतीय बाजार हे विदेशी गुंतवणूकदारांसाठी प्राधान्यक्रमाचे ठरले.
 
भारतात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुका ही खरे तर अनिश्चितता वाढवणारी बाब. मात्र, तिसर्‍या वेळीही केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील स्थिर सरकार स्थापन होण्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याने, ही अनिश्चितता दूर झाली आहे. निवडणूकपूर्व चाचणीतही भाजपवरच विश्वास कायम ठेवण्यात आला. म्हणूनच तिसर्‍यांदा बहुमतातील सरकार पुन्हा एकदा सत्ता स्थापन करत असल्याने, केंद्र सरकारची विकासाची धोरणे यापुढील काळातही कायम राहणार यावर शिक्कामोर्तब झाले. म्हणूनच गुंतवणूकदार मोठ्या संख्येने भारतात गुंतवणूक करायला पुढाकार घेताना दिसतात. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी भारत ही चांगली बाजारपेठ असल्याचे व्यक्त होत असलेले मतही त्यासाठी कारणीभूत ठरले. भारतीय बाजारपेठेत नवनवे विक्रम प्रस्थापित होत असताना चिनी बाजारात मात्र काळजीचे वातावरण कायम आहे, हेही लक्षात घ्यायला हवे.

निफ्टी २२ हजारांच्या आसपास असला, तरी २०२४च्या अखेरीस तो २३ हजार, ५००ची पातळी पार करेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. काही विश्लेषकांनी तर जूनमध्येच तो २३ हजार, ५०० पर्यंत पोहोचेल, असे भाकीत केले. भारतीय बाजाराचे मूल्य चार ट्रिलियन डॉलर इतके असून, जागतिक पातळीवर नकारात्मक वातावरण असतानाही, देशांतर्गत तसेच विदेशी गुंतवणूकदारांना तो आकर्षित करताना दिसतो. भारतीय बाजारपेठेने गाठलेला हा टप्पा उल्लेखनीय असाच. तसेच काही दिवसांपूर्वीच हाँगकाँगच्या शेअर बाजाराला मागे टाकत भारत चौथ्या क्रमांकावर आला होता, हे देखील शुभसंकेत!
 
विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारात लाखो रुपयांची गुंतवणूक करत आहेत. भारत हा चीनच्या बाजारपेठेसाठी वेगाने वाढणारा पर्याय म्हणून उदयास आला असून, गुंतवणूकदार अधिकाधिक संख्येने भारताकडे वळत आहेत. विशेषत: चीनच्या बाजारपेठांमध्ये धोका कायम राहिल्याने त्यांना भारतात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. भारतीय अर्थव्यवस्था ही विश्वासार्ह असल्याची जगभरात मान्यता असून तीच भारतातील गुंतवणुकीला चालना देणारी ठरली आहे.
 
गेल्या वर्षभरात निर्देशांक तसेच निफ्टीची झालेली वाढ लक्षणीय अशीच. या निर्देशांकांमध्ये घसघशीत वाढ दिसून आली असल्यानेच, गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. भारतीय बाजाराची क्षमता ओळखून असल्यानेच विदेशी गुंतवणूकदार भारतात येत आहेत. निवडणूक वर्षांत गेल्या तीन दशकांमध्ये सरासरी १७ टक्के परतावा दिल्याचे डेटा सांगतो. म्हणूनच निफ्टीत १४ टक्के वाढ अपेक्षित आहे. तसेच, भारतीय बाजार चांगला परतावा देण्यासाठीही ओळखला जातो. अमेरिकेपेक्षा भारतात परतावा जास्त मिळतो. म्हणूनच गुंतवणूकदारांसाठी तो आकर्षक बनला आहे. चीनला पर्याय म्हणून भारताने स्वतःला सिद्ध केले असून, भारताच्या आर्थिक वाढीमध्ये त्यांना संधी मिळताना दिसते.

अमेरिकेतील मध्यवर्ती बँकेने व्याज दरवाढ करण्याचे जे आक्रमक धोरण राबविले, त्यामुळे जगभरातील गुंतवणूक काढून ती अमेरिकेत गुंतवण्याकडे गेल्या दोन वर्षांत कल दिसून आला. मात्र, आता दरवाढीत कपात होण्याचे संकेत मिळत असल्याने, गुंतवणूकदार पुन्हा अन्य पर्यायांचा शोध घेत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय बाजारांचा चांगला पर्याय गुंतवणूकदारांना उपलब्ध झाला आहे. म्हणूनच या गुंतवणूकदारांच्या निधीच्या प्रवाहाने निर्देशांकात वाढ झाली. तसेच २० अब्ज डॉलरचा निधीही बाजारपेठेने आकर्षित केला.

जागतिक पातळीवर विदेशी गुंतवणूकदारांना चीन व्यतिरिक्त उपलब्ध असलेला समर्थ पर्याय म्हणून भारताने निर्माण केलेली ओळख, बाजाराला आकर्षित करणारी ठरली, असे म्हणता येते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येणार असल्याने, राजकीय स्थैर्यता त्यांना भावणारी ठरली. या पार्श्वभूमीवर ‘टाटा समूहा’ने मंगळवारी आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. ‘टाटा समूहा’चे एकत्रित बाजार भांडवल ३० लाख कोटींच्या पुढे गेले. ‘टाटा समूहा’साठी ही ऐतिहासिक बाब. समभागधारकांच्या संपत्तीत झालेली ही उल्लेखनीय वाढ प्रामुख्याने ‘टीसीएस’, ‘टाटा मोटर्स’, ‘टाटा पॉवर’ तसेच इंडियन हॉटेल्सच्या समभागांमध्ये सातत्याने झालेल्या वाढीमुळेच नोंदवली गेली.

अमेरिकेतील दिग्गज कंपन्यांच्या मूल्यातही घट दिसून येत असताना, ‘टाटा समूहा’ने केलेली कामगिरी ही विशेषच म्हणावी लागते. गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने राबवलेल्या प्रभावी विकास योजना, भांडवली खर्चासाठी केलेली सर्वोच्च तरतूद, तसेच विकासाला दिलेली चालना भारतीय अर्थव्यवस्थेला बळ देणारी ठरली. म्हणूनच या दहा वर्षांत भारताने अनेक विक्रम प्रस्थापित केले. भारतीय बाजारांनीही केलेली कामगिरी लक्षणीय ठरली. चौथ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा बाजार असा लौकिक असलेला भारतीय शेअर बाजार आता विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचे आकर्षक गंतव्य स्थान ठरला आहे, यात म्हणूनच आश्चर्य नाही.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.