भगवद्गीतेच्या प्रसारासाठी ‘गुरूकुलम् न्यास’

    06-Feb-2024
Total Views |
Article on Gurukulam Nyas Sanstha

भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मंजिरी फडके यांनी ‘गुरूकुलम् न्यास’ या संस्थेची स्थापना केली आहे. हे न्यास भगवद्गीतेच्या माध्यमातून धर्म संस्काराची जागृती समाजामध्ये सातत्याने करत आहे. भौतिकतेच्या विळख्यात समाज ओढला जात असताना समाजासमोर कर्मनीतीमूल्यांचा जागर करणारी ही संस्था. संस्थेच्या या धर्मसंस्कारप्रणित कार्याचा घेतलेला आढावा.

मंजिरी फडके यांनी दि. ४ डिसेंबर, २०१३ रोजी ‘गुरूकुलम् न्यास’ या संस्थेच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. ‘संकल्प, संसाधन-संस्करण, समन्वय, सिद्धी, समर्पण’ या भगवद्गीतेतील पंचसूत्रीवर ही संस्था आधारित आहे. गेल्या दहा वर्षांत ठाणे, रायगड, नाशिक, पालघर, मुंबई या जिल्ह्यात संस्थेच्या कार्याचा विस्तार झाला आहे. ४० शिक्षकांच्या माध्यमातून ही संस्था कार्यरत आहे. भगवद्गीता व्यक्तीच्या शारीरिक,मानसिक व बौद्धिक विकासासाठी अभ्यासणे आवश्यक आहे, याची जाणीव प्रत्यक्ष समाजामध्ये मिसळून, संथावर्ग, सखोल अभ्यासक्रम, शालेय प्रकल्प या विविध आयामामार्फत निःशुल्क पद्धतीने जागवीत आहे.

 संस्थेतर्फे अभ्यासवर्ग, गीता संथावर्ग, स्पर्धा, शिक्षक प्रशिक्षण आणि शिबिरे घेतली जातात. आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी संथावर्ग पूर्ण केले आहेत. वय वर्ष ७ ते ७५ वयोगटातील ८० छात्रांनी संपूर्ण गीता कंठस्थ करून श्रृंगेरी येथील शंकराचार्यांचे आशीर्वाद व प्रथम पुरस्कार प्राप्त केले आहेत. १०० पेक्षा जास्त छात्रांनी गीतेचा सखोल अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. शालेय प्रकल्पाद्वारे शिशुवर्ग ते इयत्ता दहावीपर्यंतचे सुमारे एक हजार विद्यार्थी या संस्थेशी जोडलेले आहेत. दूरकेंद्री संथा प्रकल्पाद्वारे देशातील तसेच परदेशातील ५० छात्र जोडले आहेत. महाराष्ट्राच्या (नागपूर, जालना, अमरावती, माहूर, छत्रपती संभाजीनगर, रामटेक, वर्धा, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक, पनवेल) विविध शहरांमध्ये अमृतस्पर्शी भगवद्गीता स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक सहभागींनी प्रशस्तिपत्र प्राप्त केले आहे. न्यासामार्फत एकूण २० ठिकाणी संथा वर्ग घेतले जातात.
संथा वर्गांमध्ये पाणिनीच्या व्याकरणानुसार आणि सोप्या नियमावलीच्या आधारे श्लोकांचे शास्त्रशुद्ध, स्पष्ट, लयबद्ध वाचनाचे शिक्षण दिले जाते. संथावर्ग आठवड्यातून दोन दिवस चालतात. व्यक्ती जीवनाशी सुसंबद्ध असा श्लोकांचा अर्थ आणि विवेचन केले जाते. सुबोध गीता सारमध्ये त्रिस्तरीय सखोल अभ्यासक्रम शिकविला जातो. ग्रंथाच्या सखोल अभ्यासासाठी कालबद्ध अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी वर्षभरात १५० छात्र प्रवेश घेतात. त्यांना शिक्षकांच्या मार्गदर्शनासह संदर्भग्रंथाचा उपयोग ही छात्रांकडून केला जातो. या अभ्यासक्रमात प्रथम स्तर भगवद्गीता, द्वितीय स्तर भगवद्गीता, उपनिषदे, संस्कृत व्याकरण, तृतीय स्तर आनुषंगिक अभ्यास चिंतन, मनन व प्रत्यक्ष सादरीकरण केले जाते. आपण मिळविलेले ज्ञान कसोटीवर खरे उतरते की नाही, हे जाणून घेण्यासाठी नावीन्यपूर्ण विविध स्पर्धाचे वेळोवेळी आयोजन केले जाते. शालेय संथा व स्पर्धेचे आयोजन केले जाते.

दूरकेंद्री संथा प्रकल्पातंर्गत राज्याच्या विविध भागात वास्तव्य असणार्‍या आणि संपूर्ण गीता शिकण्याची इच्छा असणार्‍या सर्वांसाठी वर्षातून तीन ते चार वेळा त्यांच्या शहरात जाऊन समूहाला संथा दिली जाते. शिक्षक प्रशिक्षणांतर्गत शिक्षकांसाठी एकत्रित प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. आधुनिक विचार प्रवर्तनांशी तंत्रज्ञानाशी जोडून स्वत:ला आणि छात्रांना समृद्ध करण्यासाठी शिक्षक परिश्रम घेत असतात. तसेच संथा घेणार्‍या छात्रांना गीतेच्या प्रचार-प्रसार कार्यात सहभागी करून घेण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे भरविली जातात. शालेय उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना संस्कृतची गोडी लागावी, स्पष्ट उच्चारांचे संस्कार व्हावेत, एकाग्रता वाढावी यासाठी गीतेतील अध्यायांची निवड करून संथा देणे व पाठांतर स्पर्धा घेतली जाते. हे वर्ग बदलापूर, काटई, कल्याण, अंबरनाथ, पनवेल याठिकाणी चालतात.
 
‘श्रीगुरूकुलम्’ न्यासाचा स्वातंत्र्य वीरांप्रती कृतज्ञतापूर्वक गीतापठयज्ञ हा अत्यंत अभिनव उपक्रम आहे. यामध्ये न्यासाचे २०० ते २५० प्रतिनिधी स्वखर्चाने आपलेयोगदान देत आहेत. स्वातंत्र्य संग्रामात ज्या क्रांतिवीरांनी भगवद्गीता हाती घेऊन प्राणार्पण केले, त्यांच्या गावी त्यांच्या वास्तूमध्ये जाऊन कृतज्ञतापूर्वक स्मरण करून गीता पाठयज्ञ (संपूर्ण गीतापठण) केला जातो.‘श्रीगुरूकुलम् न्यासा’ने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतपर्वानिमित्त हा संकल्प केला आहे. आतापर्यंत भगूर, चिरनेर, चिंचवड, शिरढोण, काळाराम मंदिर-नाशिक अशा विविध ठिकाणी न्यासाने हे कार्यक्रम घेतले आहेत.

‘श्रीगुरुकुलम्’ न्यासा’तर्फे सर्वांसाठी खुली कंठस्थ स्पर्धा घेतली जाते. भगवद्गीतेतील संपूर्ण १८ अध्याय कंठस्थ केलेल्या सर्वांसाठी न्यासातर्फे दरवर्षी एप्रिल महिन्यात नि:शुल्क कंठस्थ स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्याविषयीची सविस्तर माहिती जानेवारीमध्ये ुुुwww.shreegurukulamnyas.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते. गीतेतील श्लोकांचे शुद्ध उच्चरण, तसेच गीतेतील पंचसूत्रीचा मागोवा घेणारे अर्थपूर्ण विवेचन, प्रत्यक्ष गुरुकुल पद्धतीने वर्ग घेऊन केले जाते. संपूर्ण गीता पाठ करणार्‍यांना श्रृंगेरी पीठाधीश श्रीशंकराचार्याचे आशीर्वाद व प्रोत्साहन पुरस्कार प्राप्त व्हावा म्हणून तयारी घेऊन श्रृगेंरी येथे पाठवले जाते. आतापर्यंत न्यासामार्फत ८० हून अधिक छात्रांनी असे सुयश मिळविले आहे. ते न्यासाच्या कार्यात प्रत्यक्ष योगदान देत आहेत. तसेच इतरांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहेत. यामध्ये वय वर्षे सात ते ७५ पर्यंतचे छात्र आहेत.

पंचगव्याधारित उत्पादनांसाठी प्रशिक्षण वर्गांतर्गत ग्रामीण सुदूर क्षेत्रातील व्यक्ती ही न्यासाशी संपर्कात याव्यात, यादृष्टीने न्यासाने आपल्या चार प्रतिनिधींना वर्धा येथे केंद्र सरकारतर्फे आयोजित प्रशिक्षणासाठी पाठवले होते. हे प्रशिक्षण केंद्र सरकारच्या ‘एमएसएमई’ योजनेचा भाग आहे. त्यामुळे या चार प्रशिक्षकांना केंद्र सरकार व ‘एमगिरी’तर्फे प्रशस्तिपत्र तसेच हे प्रशिक्षण देण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. सटाणा तालुका आसखेडा गाव सिन्नर तालुका निमगाव देवपूर येथे प्रशिक्षण शिबिरे ग्रामस्थांसाठी निश्चित करण्यात आली आहेत. यानिमित्ताने प्रशिक्षणार्थीना उत्पादनांचे प्रशिक्षण व भगवद्गीता संस्कार देता येईल हा उद्देश आहे.
 
संपूर्ण योगाभ्यासातून सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास यासाठी सर्टिर्फिकेट कोर्स, डिप्लोमा कोर्स, डिग्री कोर्स अशा स्तरांसाठी अभ्यासक्रमांची आखणी करून तो अभ्यासक्रम पूर्णत्वाकडे आणला जात आहे. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षक ‘श्रीगुरूकुलम्’ न्यासा’कडे आहेत.सध्या न्यासाच्या शिक्षकांकडून प्रशिक्षित छात्र राष्ट्रीय स्तरावर योगस्पर्धेमध्ये सुयश मिळवित आहेत. भगवद्गीतेमधील योगाभ्यास समजून घेत आहेत.

अंध दिव्यांग विद्यार्थ्यांचे विकसन होऊन त्यांना स्वप्रतिष्ठा प्राप्त व्हावी, यासाठी भगवद्गीतेच्या माध्यमातून न्यासाचे शिक्षक प्रयत्नशील आहेत.त्याचवेळी त्यांच्यातील हस्तकौशल्य विकसित करण्यासाठी हे शिक्षक काम करीत आहेत. न्यासाच्या प्रचार व प्रसार कार्याचे प्रत्यक्ष प्रमाण मिळावे. तसेच, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, यासाठी श्रीगुरूकुलम् न्यासाने मराठी ( https://www.youtube.com/SHREEšGURUKUL-MšNY-S?subšconfirmation=1) VgoM qhXr‘YyZ (https://www.youtube.com/channel/UCBBO0C0N-MYXp3pKmbdšwJw?subšconfirmation=1) गीतागुंजन आणि पैरवी भगवद्गीतेची या कार्यक्रमाद्वारे युट्यूब वाहिनीचाही शुभारंभ केला आहे. ‘गुरूकुलम् न्यास’ या संस्थेच्या अध्यक्षपदी मंजिरी फडके, कार्यवाह पदी शुंभागी कुलकर्णी, सहकार्यवाह संतोष गोसावी,कोषाध्यक्ष म्हणून स्मिता मिर्जी कार्यरत आहेत.
जान्हवी मोर्ये
(अधिक माहितीसाठी संपर्क
मंजिरी मधुकर फडके
८००७९७६३४३)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.