युद्धाच्या चक्रव्यूहात महासत्ता

    06-Feb-2024
Total Views |
America on Global hamas and Houthis Conflicts

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भडकलेले इस्रायल-हमास युद्ध अद्याप थांबलेले नाही. याउलट या युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यताच अधिक. अमेरिकेच्या नेतृत्वात पाश्चिमात्य देशांचा इस्रायलला कायमच पाठिंबा राहिला. त्याचाच परिणाम आता त्यांना भोगावा लागत आहे. पाश्चिमात्य देशांना इच्छा नसतानासुद्धा या युद्धात उतरावे लागले. त्याला कारण ठरले, इराण समर्थित हुती बंडखोरांचे लाल समुद्रात सुरू असलेले हल्ले. हुती बंडखोरांच्या याचं हल्ल्यांमुळे ’जागतिक महासत्ता’ असे बिरुद मिरवणारी अमेरिका युद्धाच्या चक्रव्यूहात अडकली आहे.

इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून संपूर्ण पश्चिम आशियाच अशांततेच्या गर्तेत. यामागे मुख्य कारण म्हणजे, अमेरिका आणि इराणमधील शीतयुद्ध. इराण इस्रायल-हमास युद्धाच्या आडून पाश्चिम आशियामध्ये आपले वर्चस्व स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे, तर अमेरिकेची भूमिका सध्यातरी युद्धाची व्याप्ती वाढू नये, अशीच दिसते. युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करणारी अमेरिका शांतीप्रिय तर अजिबात नाही. पण, हाच अमेरिका रशिया-युक्रेन युद्धात अडकलेला आहे. इस्रायलला सुद्धा अमेरिकेचा रसद पुरवठा सुरुच आहे. त्यामुळे अमेरिकेला आता नवीन युद्ध नकोय. पण, इराण आणि इराण समर्थित दहशतवादी गटांना काहीही करून अमेरिकेला युद्धात ओढायचे आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्नसुद्धा केले. पण, अद्याप अमेरिका थेट युद्धात उतरलेली नाही.
‘हमास’च्या समर्थनात येमेनच्या हुती बंडखोरांनी नोव्हेंबरमध्ये लाल समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्यास प्रारंभ केला. आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी सुरळीत राहण्यात लाल समुद्रातून होणारी जलवाहतूक महत्त्वाची. लाल समुद्रामार्गे युरोप-आशिया एकमेकांना जोडलेले. त्यामुळे लाल समुद्रात अनुचित प्रकार घडला की,जागतिक व्यापारात अडथळा निर्माण होतो. हुती बंडखोरांनी हाच मुद्दा हेरून लाल समुद्रात व्यापारी जहाजांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. हुती बंडखोरांचे मुख्य लक्ष्य हे इस्रायल आणि पाश्चिमात्य देशांची मालवाहू जहाजे. त्यामुळे पाश्चिमात्य देशांच्या जागतिक व्यापाराला धोका निर्माण झाला. त्यामुळे अमेरिकेवर हुती बंडखोरांवर कारवाई करण्यासाठी जागतिक दबाव वाढत होता.
 
अमेरिकेसह युरोप आणि पश्चिम आशियातील दहा देशांनी मिळून लाल समुद्राच्या सुरक्षेसाठी एक सैन्य आघाडीसुद्धा सज्ज केली. या आघाडीवर लाल समुद्रातील व्यापारी जहाजांच्या सुरक्षेची जबाबदारी. यासाठी अमेरिकेच्या नौदलाने आपल्या युद्धनौका लाल समुद्रात तैनात केल्या. हुतींच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिका आणि ब्रिटन येमेनमधील हुती बंडखोरांच्या ठिकाणांवर हल्लेसुद्धा करत आहेत. यामुळे हुती बंडखोरांची सैन्य ताकद कमी झालेली दिसते. तरीही ती पूर्णपणे संपुष्टात आलेली नाही. त्यासोबतच या भागात फक्त हुतीच सक्रिय नाहीत. हुतींसोबत इराण समर्थित अनेक बंडखोर गट पश्चिम आशियामध्ये सक्रिय आहेत. या बंडखोरांनी अमेरिकेच्या ठिकाणांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. दि. २८ जानेवारी रोजी जॉर्डनमध्ये एका ड्रोन हल्ल्यात अमेरिकेचे तीन सैनिक मृत्युमुखी पडले. या हल्ल्यामागे इराणचा हात आहे, असा आरोप अमेरिकेने केला. याला उत्तर म्हणून अमेरिकेने इराक आणि सीरियातील इराणच्या सैन्य ठिकाणांवर हल्ला केला. त्यामुळे भविष्यात इराण-अमेरिका संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमेरिकी जनतेचा बायडन यांच्यावर इराणवर कारवाई करण्यासाठी दबाव वाढत आहे. बायडन यांची थेट युद्धात सहभागी न होण्याच्या भूमिकेवर, अमेरिकेतील माध्यमांमध्ये टीका होताना दिसते. बायडन यांच्या ठाम भूमिका न घेण्याच्या आडमुठ्या निर्णयामुळे मध्य-पूर्वमध्ये अमेरिकेच्या हितसंबंधांना धोका निर्माण होत आहे, अशी टीका अमेरिकी माध्यमे बायडन यांच्यावर करत आहेत. त्यातच २०२४ हे अमेरिकेमध्येही निवडणुकीचे वर्ष. त्यामुळे बायडन यांची मध्य-पूर्वेमधील संघर्षावरची गळचेपी भूमिका त्यांना मतदारांपासून दूर नेईल. दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायल समर्थक आहेत. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढलेली दिसते. अमेरिकी मतदारांचा दबाव, जागतिक महासत्ता म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे दूर करण्याची जबाबदारी, मित्र देशांमध्ये कमी होत चालेली विश्वासाहर्ता, या सर्वांवर उत्तर शोधणे बायडन यांना न झेपणारे. यातूनच बायडन कसा मार्ग काढतात, हे येणारा काळच ठरवेल. पण, सध्यातरी अमेरिका आणखी एका युद्धात सहभागी होण्याची शक्यताच अधिक!

श्रेयश खरात 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.