संगमेश्वरातील टाकळ्याचं झाड

    05-Feb-2024
Total Views |

taklyach jhad


रात्रीच्या वेळी टाकळ्याच्या झाडांवर काही पक्षी मोठ्या संख्येने वसाहत करुन राहतात. यामध्ये असणार्‍या गाय बगळे, पाण कावळे अशा काही पक्ष्यांविषयी आणि त्यांच्या सुंदर वास्तव्याविषयी माहिती देणारा हा लेख...
संगमेश्वरचा एसटी स्टॅण्ड रात्रीच्या वेळी ओलांडला आणि पलीकडील बाजूला गेलो की, अचानक आपली नजर झाडावर जाते. रात्रीच्या काळोखात झाडाला लगडलेले पांढरे शुभ्र कापसाचे बोळे वाटावे, असे अनेक पक्षी झाडावर बसलेले दिसतात. हे आहे संगमेश्वरमधील सुप्रसिद्ध बगळ्याचे झाड. स्थानिक भाषेत ‘टाकळ्याचे झाड’ म्हणून ओळखले जाणारे हे झाड वर्षानुवर्षे रस्त्याच्या कोपर्‍यात आपले स्थान टिकवून आहे. दिवसा सर्वत्र खाद्य शोधण्यासाठी जाणारे गाय बगळे संध्याकाळच्या सुमारास मात्र निवार्‍यासाठी अशी सुरक्षित जागा शोधून तिथे आपला रात्रीचा मुक्काम ठोकतात. मोठ्या समूहानेएकत्रित राहिल्यामुळे त्यांना त्यांच्या भक्षकांपासून सुरक्षा मिळते हे या मागचं मुख्य कारण. विणीच्या हंगामातसुद्धा अनेक पाणपक्षी अशा एकत्रित कॉलनी बनवून राहतात. ज्येष्ठ पक्षी अभ्यासक मारुती चीतमपल्ली यांनी अशा जागांना ‘सारंगगार’ असे उल्लेखिले आहे. कावळे, पाण कावळे, वंचक आणि गाय बगळे, कधी कधी करकोचा आणि चुकून माकून स्थलांतरित होऊन येणारे शराटी असे पक्षी आपला रात्रीचा सहवास गुण्यागोविंदाने संगमेश्वरमधील या झाडावर अनेक वर्षे कंठत आहेत. अनेक वेळा कावळ्यांची घरटीसुद्धा याच झाडावर बांधलेली दिसतात. रात्रभर एवढे पक्षी जमून त्यांची पडणारी विष्ठा, कलकलाट यामुळे अनेक वेळा यांना इथून हुसकावून लावण्यासाठीसुद्धा अनेक वेळा प्रयत्न झाले. पण, या सगळ्या प्रयत्नांना अयशस्वी ठरवत हे अनोखे बगळ्यांचे झाड वर्षानुवर्षे दिमाखात उभे राहिले आहे.
गाय बगळे किंवा ‘कॅटल इग्रेट’ नावाने ओळखले जाणारे हे बगळे मूळचे आफ्रिकेचे रहिवासी आता मात्र जगात सर्वत्र आढळतात. गवत खात फिरणार्‍या गुरांच्या मागेमागे करत त्यांच्या पायाने उडणारे कीटक, अंगावरील गोचीड झपाट्याने खाणारे हे बगळे तसे सर्व परिचित. घनदाट जंगले जशी कमी होत जाऊन माळराने, शेती आणि गवताळ कुरणे वाढत गेली तशी गाय बगळ्यांची संख्यासुद्धा वाढत गेली. हा एकमेव बगळा जवळपास पाणी नसणार्‍या भागातसुद्धा अगदी सहज राहतो. जून ते सप्टेंबरच्या काळात याचा विणीचा हंगाम असतो. मातकट बदामी रंगाचा पोशाख परिधान करून यांचे नर विणीसाठी उपवर बनतात. या हंगामात गाय बगळ्यांच्या डोक्यावर, मानेवर आणि पाठीवर पिवळसर नारिंगी रंगाची पिसे येतात. यालाच ‘ब्रीडिंग प्लमेज’ म्हटले जाते. असे मादीला आकर्षित करण्यासाठी नटलेले नर उन्मत्त होऊन भांडखोर झालेले बघायला मिळतात. डोक्यावरची तुर्‍यासारखी पिसे फुलवून एकमेकांना धाक दाखवत यशस्वी होणार्‍या नराची नवीन पिढी लवकरच जन्म घेते. गाय बगळ्यांची घरटी समूहाने असतात. आंबा, जांभूळ, वड पिंपळ चिंच अश्या झाडांवर एकत्रित संख्येने बगळे काट्या कुट्यांची घरटी बांधतात, अशी सारंग गारे किंवा हेरोनरी अनेकदा मानवी वस्तीजवळ दृष्टीस पडते. कोकणाला लाभलेला शेजार हा नेहमीच आतबट्याचा व्यवहार राहिलेला आहे. उत्तरेस मुंबई, दक्षिणेस गोवा आणि पूर्वेस पश्चिम महाराष्ट्र. मुंबईतून येणार्‍या विघातक विकासाच्या नवनवीन कल्पना, जीवाचा गोवा करण्यासाठी जाणार्‍या पर्यटकांसाठी घातल्या जाणार्‍या पायघड्या आणि साखरेसाठी होणारी वृक्षतोड मुंबई गोवा महमार्गाच्या चौपदरीकरणात अनेक वर्षे जगलेल्या पुराण वृक्षांचा बघता बघता बळी गेला.
शेकडो पावसाळे काढलेले हे वृक्ष विकासाच्या रेट्यात मात्र भुईसपाट झाले. रात्रीच्या निवार्‍यासाठी पक्ष्यांना लागणारी देशी झाडे शिल्लक राहिली नाहीत. आता पुढचा नंबर या बगळ्यांच्या झाडाचा आहे. बाजारपेठ की एसटी स्टॅण्ड कोणाचा बळी जाणार या वादात हार या झाडाची झालीय.. हे झाड तोडल्यावर रात्रीच्या निवासाला येणारे हे पक्षी थोडे दिवस सैरभैर होऊन फिरतील, चुकामूक झाल्यासारखे झाड शोधत राहतील. कदाचित, दुसर्‍या जागी स्थलांतरितसुद्धा होतील. पण त्यामुळे कवडीमोल ठरून भुईसपाट झालेल्या या अनोख्या निवार्‍याची किंमत मात्र सर्व निसर्गप्रेमींच्या मनात लाखमोलाची राहील, हे मात्र खरं.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.