आपल्या पाणथळी

    05-Feb-2024
Total Views |



wetlands day



पाणी धरुन ठेवणारी एक महत्त्वाची परिसंस्था म्हणजेच पाणथळभूमी. यामध्ये असणारी परिसंस्था, तिचे महत्त्व समजून घेण्यासाठी साजर्‍या केल्या जाणार्‍या ‘जागतिक पाणथळभूमी दिनानिमित्त’ हा विशेष लेख...

गभरात, दरवर्षी दि.2 फेब्रुवारी रोजी ’वर्ल्ड वेटलॅन्डस् डे‘अर्थात, जागतिक पाणथळभूमी दिन साजरा केला जातो. जागतिक स्तरावर पाणथळ प्रदेशांविषयी जागरुकता निर्माण होऊन हे प्रदेश कशी महत्त्वाची भूमिका बजावतात हे सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दि. 2 फेब्रुवारी, 1971 या दिवशी कॅस्पियन समुद्राच्या किनार्‍यावरील रामसर, या इराणी शहरामध्ये, पाणथळ प्रदेशावरील अधिवेशनाचा जागतिक पातळीवर स्वीकार केला गेला. पाणथळ प्रदेशांचे संवर्धन आणि सुज्ञ वापर करण्याच्या उद्देशाने केला गेलेला हा आंतरराष्ट्रीय करार, एक महत्त्वाचा टप्पा होता. कारण, यामुळे पाणथळ जमिनीचे मूल्य जागतिक पातळीवर मान्य केले गेले. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने ठराव 75/ 317 द्वारे 2021 मध्ये दि. 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिवस म्हणून स्थापित करून त्याचे महत्त्व आणखी वाढवले.

यंदाच्या पाणथळभूमी दिनाची ‘वेटलँड्स आणि ह्युमन वेलबीइंग’ अशी थीम ठेवण्यात आली होती. ही थीम, पाणथळ परिसंस्था आणि त्या प्रदेशाच्या, मानवी समुदायांचे आरोग्य, सुरक्षितता आणि समृद्धीशी असलेल्या गुंतागुंतीच्या संबंधावर प्रकाश टाकते. ही थीम, आपल्याला ताजे पाणी, अन्न संसाधने आणि नैसर्गिक आपत्तींविरूद्ध संरक्षण देणारी पाणथळ स्थळे, आपल्या जीवनाच्या गुणवत्तेत कसे योगदान देत आहेत यावर विचार करण्यास उद्युक्त करते. भविष्यातील पिढ्यांसाठी हे फायदे टिकवून ठेवण्यासाठी पाणथळ प्रदेशांचे संवर्धन आणि पुनर्संचयन सुनिश्चित करण्यासाठी कृती करण्याची आवश्यकता आहे. पाणथळ प्रदेश, अर्थात, दलदल आणि खारफुटी, तसेच गोड्या पाण्याच्या पाणथळ प्रदेशापासून ते सागरी वातावरणापर्यंतच्या विविध परिसंस्थांसह, वेटलँड्स, मानवासोबतच असंख्य प्रजातींच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पण, हा पाणथळ प्रदेश इतका महत्त्वाचा का असावा? तर, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा केवळ सहा टक्के भाग व्यापणारा हा प्रदेश असूनही, सर्व वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींपैकी 40 टकक्यांहून अधिक प्रजाती, पाणथळ प्रदेशात आढळतात. ही परिसंस्था केवळ जैवविविधतेचा हॉटस्पॉट नाही, तर पूर नियंत्रण, पाणी शुद्धीकरण आणि हवामान नियमन यासारख्या महत्त्वपूर्ण पर्यावरणीय सेवादेखील प्रदान करते. पाणथळ जागा नैसर्गिक स्पंज म्हणून काम करते. अतिवृष्टी झाली, तर ती शोषून घेते आणि पुराचा प्रभाव कमी करते, तसेच मातीलादेखील प्रदूषकांपासून पाणथळ जमीन सुरक्षित ठेवते.

पण चिंताजनक बाब म्हणजे, सांडपाण्याच्या चुकीच्या पद्धतीने केला जाणार निचरा, त्याने होणारे प्रदूषण, तसेच जास्त मासेमारीआणि नैसर्गिक संसाधनांचे अतिशोषण यासारख्या कारणांमुळे पाणथळ जमीन जंगलांपेक्षा तब्बल तिप्पट वेगाने नाहीशी होत आहे. अशा र्‍हासामुळे केवळ जैवविविधतेलाच धोका निर्माण होत नाही, तर आवश्यक परिसंस्थेच्या सेवा पुरवण्याची पाणथळ प्रदेशांची क्षमताही कमी होते. आता विचार करा, मुंबईसारख्या शहरांसाठी ही किती मोठी वाईट बातमी आहे?
आपले शहर, अर्थात मुंबई बेट आणि नजीकचा परिसर, संपूर्णपणे समुद्राच्या सदैव सान्निध्यात येणार परिसर आहे. त्यात, शक्तिशाली पावसाळा आपल्याला सोसावा लागतो. त्या परिस्थितीत, आपली खारफुटी आणि पाणथळ स्थळेच आपले निसर्गापासून रक्षण करतात हे तर माझ्या मते मुंबईमधील प्रत्येकाला ठाऊक असेलच किंवा असलेच पाहिजे. पण खरंच प्रत्येक मुंबईकर, त्याचे आयुष्य सभोवतालच्या खारफुटीमुळे सुरक्षित आहे हे जाणतो का?

चर्चगेट येथील, किशीनचंद चेल्लाराम महाविद्यालयातील, जैवविज्ञान विभागातील चौदावीचे विद्यार्थी, आकिल समनानी, शक्तिसिंह राठोर आणि आदित्य झरापकर यांनी याच संबंधी डॉ. मयूरेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखालीकेलेल्या संशोधनात, काही चिंताजनक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यांनी केलेल्या संपूर्ण मुंबई परिसरातील 200हून अधिक लोकांच्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, फक्त 57 टक्के महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खारफुटीचे वैद्यकीय आणि आर्थिक महत्त्व ठाऊक होते. त्यातही खारफुटीचेऔषधी उपयोग आहेत, हे फक्त 41 टक्के विद्यार्थ्यांना माहीत होते. जवळजवळ 55 टक्के विद्यार्थ्यांनी मुंबईत राहूनही, खारफुटी प्रदेशाला एकदाही भेट दिलेली नाही. तर, फक्त 20 टक्के विद्यार्थ्यांना गेल्या सहा महिन्यांत खारफुटी प्रदेशात जाऊन आल्या आहेत. हे निष्कर्ष चिंतेची बाब आहेत. याचा असा अर्थ असू शकतो का? की, इतके उत्तम संवर्धन आणि जागरुकतेच काम मुंबई परिसरात होत असतानाही, काही सूक्ष्म सुधारणा किंवा नवीन दृष्टिकोनाची आवश्यकता आहे?

पुढे या संशोधनात असे देखील आढळून आहे की, 15-25 वयोगटातील तब्बल 64 टक्के विद्यार्थ्यांना तसेच 75 टक्के विद्यार्थ्यांनी रामसार बद्दल कधी ऐकलेही नाही आणि ज्यांना रामसार बद्दल माहीत होते, त्यातील सरासरी फक्त 75 टक्के मुलांना मुंबई परिसरात रामसार साईट आहे हे ठाऊक होते! आता महत्त्वाचामुद्दा म्हणजे, जर या महाविद्यालयीन वयातील मुलांमध्ये ही सरासरी आकडेवारी दिसते आहे, तर सामान्य जनतेच काय? पुढे संशोधानात असे देखील आढळून येते की, फक्त 40 टक्के विद्यार्थ्यांना खारफुटीच्या जमिनीचे शोषण आणि विनाशाचा संबंध जैवविविधतेच्या नुकसानाशी जोडत आहेत. याचा असा अर्थ होतो का, की खारफुटीचे पर्यावरणीय महत्त्व समजवताना, आपण अनावधानाने फक्त पावसाळ्यात वारंवार येणार्‍या पुरापासून वाचवणारा, इतकीच याची ओळख करून देत आहोत? हे मुद्दे, सुज्ञ वाचक आणि मुंबईचे रहिवासी म्हणून आपण विचारात घेणे गरजेचे आहे. येत्या पिढीचा, खारफुटी संबंधीचा कल सुधारण्याची गरज नक्कीच आहे, असे या सर्वेक्षणातूनदिसून येते.

हे सगळं बघितल्यावर, आपण पुरेसं संवर्धन आणि जनजागृती करत नाही आहोत का? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. पण तसं खरंतर नाहीये. अनेक योजना आणि मोहिमा यापूर्वीच राबविल्या गेल्या आहेत. असे असंख्य प्रोग्राम आणि सरकारी योजना सहज इथे मांडता येतील. 2023 मध्येदेखील केंद्र सरकारद्वारे पहिले जलसंधारण सर्वेक्षण,अमृत धरोहर आणि मिष्टी (चरपर्सीेींश खपळींळरींर्ळींश षेी डहेीशश्रळपश करलळींरीीं ढरपसळलश्रश खपलेाशी) सारख्या योजनांचा शुभारंभ झाला आहे. स्थलांतरित पक्षी आणि त्यांच्या अधिवासासाठी संरक्षण प्रयत्नांना बळ देण्यासाठी मध्य आशियाई फ्लायवे (उऋ) मध्ये भारताने संस्थात्मक फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी पण केली आहे.

इकोटूरिस्ट हॉटस्पॉट म्हणून पाणथळ जागांचा अधिक चांगला वापर करून स्थानिक समुदायाचा सहभाग करून घेणे हा यावरचा एक उपाय असू शकतो. इको-टूरिझमची ठिकाणे असल्याने, हे क्षेत्र त्यांचे आर्थिक मूल्यदेखील प्रदर्शित करू शकतील आणि तरुण लोकसंख्येला खारफुटीच्या जमिनीकडे आकर्षित करू शकतील. पुनर्संचयित प्रकल्पांमध्ये स्थानिक समुदायांना सामील करून परिसंस्था सेवा वाढवणे आणि शाश्वत उपजीविका निर्माण करण्याचा दुहेरी फायदा होतो. ज्यामुळे संवर्धन उपक्रमांचे यश आणखीन वाढू शकेल असे वाटते. शाश्वत पर्यावरणीय पर्यटन, सेंद्रिय शेती आणि जबाबदार मासेमारी पद्धती यांसारख्या प्रोत्साहनांमुळे केवळ पाणथळ जमीनच जतन केली जाऊ शकत नाही, तर या परिसंस्थांवर अवलंबून असलेल्या समुदायांसाठी उपजीविकेचे पर्यायी मार्गदेखील उपलब्ध होऊ शकतात व यानेच संवर्धनाच्या प्रयत्नात त्यांचा सहभाग वाढू शकेल. जागतिक बँकेने केलेल्या अभ्यासानुसार, पाणथळ जमिनींचे आर्थिक मूल्य अंदाजे वर्षाला 47 ट्रिलियन डॉलर इतके आहे. ओडिशातील चिलिका तलाव अशा प्रोत्साहनांच्या सकारात्मक प्रभावाचा पुरावा आहे. जिथे शाश्वत पर्यावरणीय पर्यटनाने आणि समुदायाच्या सहभागाने तलावाच्या पर्यावरणीय पुनर्संचयनात आणि स्थानिक रहिवाशांच्या कल्याणात मोलाचे योगदान केले आहे. स्थानिक समुदाय, या परिसंस्थांशी खोलवर जोडलेले आहेत, त्यांना त्यांच्या पर्यावरणाच्या आरोग्यामध्ये रस आहे. त्यांना आवश्यक साधने आणि प्रोत्साहन देऊन पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांमध्ये गुंतवून आणि मालकीची भावना वाढवून, भारत भविष्यातील पिढ्यांसाठी या महत्त्वपूर्ण परिसंस्था जतन करून, शाश्वत पाणथळ पुनर्संचयनाच्या दिशेने मार्गक्रमण करू शकतो. उरले आहे आता फक्त, येत्या पिढिला पाणथळ संवर्धनाची ओढ लावणे !


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.