महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर आता महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार
05 Feb 2024 20:04:16
मुंबई (विशेष प्रतिनिधी): राज्यात वन आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी उल्लेखणीय काम करणाऱ्या व्यक्तींसाठी ‘महाराष्ट्र वनभूषण’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र वनविभागाने ही घोषणा केली असून वनक्षेत्रामधील जैवविविधतेचे संगोपन, वन्यजीव संवर्धन, वनसंरक्षण मृदा व जलसंधारण तसेच वनेतर क्षेत्रामध्ये उल्लेखणीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
यामध्ये पुरस्कार मिळवणाऱ्यांना २० लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येणार असून त्याबरोबर सन्मामचिन्ह आणि मानपत्र देण्यात येणार आहे. या पुरस्काराची निवड करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. या पुरस्कारामुळे वने, वन्यजीव आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याला चालना आणि प्रोत्साहन मिळणार आहे.
काय आहेत पुरस्कारासाठीचे निकश?
१) विनासरकारी संसाधनांचा वापर करत जनजागृती तसेच लोकचळवळीच्या माध्यमातुन वन, जैवविविधतेचे संगोपन, वनसंवर्धन, मृदा आणि जलसंधारण, नैसर्गिक संसाधनांचा पर्याप्त वापर, पर्यावरण सजगता, महत्त्वाचे दस्तावेजीकरण, तसेच वनेतर क्षेत्रामध्ये काम असावे.
२) या शाखांमधील कार्य व लोकचळवळीमार्फत असाधारण योगदान दिलेले असावे.
३) या पुरस्कारासाठी कार्यरत शासकीय, निमशासकीय, अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था यांमधील अधिकारी किंवा कर्मचारी पात्र नसतील.
वनभूषण पुरस्कार निवड समितीमध्ये यांचा समावेश - निवड प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात शिफारशींसाठी - १) अपर मुख्य/ सचिव प्रधान /सचिव (वने) यांचा समावेश २) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) ३) वन, वानिकी क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी ४) कृषी विद्यापिठातील वन वानिकी क्षेत्रातील तज्ञ प्रतिनिधी ५) सेवानिवृत्त वन अधिकारी ६) आवश्यकतेनुसार निमंत्रीत व्यक्ती ७) प्रधान मुख्य वनसंरक्षक
मुख्य निवड समिती - १) वनमंत्री २) अपर मुख्य/ सचिव प्रधान /सचिव (वने) ३) सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत शासन नियुक्त प्रतिनिधी ४) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख)