विवेकाचा आवाज; पण ऐकणारे आहेत का?

    05-Feb-2024
Total Views |
Sadiq Ali Thangal endorses Ram temple


अनेक धर्मांचे लोक एकत्र नांदत असलेल्या, भारतासारख्या देशात प्रत्येक नागरिकाने दुसर्‍या धर्माचा आदर राखला पाहिजे. कोणत्याही देशात बहुसंख्य असलेल्या समाजाच्या मागण्यांकडे फार काळ दुर्लक्ष करता येत नाही. त्यामुळे रामजन्मभूमीवरच रामाचे मंदिर उभे राहिले पाहिजे, ही हिंदूंची मागणी रास्तच होती. देशातील मुस्लीम समुदायाने आता राजकीय विवेक आणि समजूतदारपणा दाखविणार्‍या नेत्यांना पाठिंबा देऊन, हिंदूंमध्ये आपल्या समाजाबद्दलचा विश्वास वाढविला पाहिजे.
 
'इंडियन युनियन मुस्लीम लीग’च्या केरळ प्रांताचे अध्यक्ष सादिक अली शिहाब थंगल यांनी अलीकडेच केलेले विधान स्वागतार्ह असून, समस्त मुस्लीम समाजानेही त्याचे स्वागत केले पाहिजे. “अयोध्येत उभारण्यात आलेले राम मंदिर आणि त्यापासून जवळच उभारण्यात येत असलेली मशीद ही भारताच्या पंथनिरपेक्षतेची प्रतीके आहेत,” असे सांगून थंगल यांनी अयोध्येतील राम मंदिराला विरोध करण्याचे, कोणतेही कारण नसल्याचे मत व्यक्त केले. “राम मंदिराची उभारणी ही देशाच्या बहुसंख्याक समाजाची मागणी आणि गरज होती. आता या वास्तवापासून मागे जाता येणार नाही,” असे सांगून थंगल यांनी म्हटले आहे की, “राम मंदिर आणि भावी मशीद ही देशाच्या पंथनिरपेक्षतेची उत्तम उदाहरणे आहेत. मुस्लीम समाजानेही सहिष्णुता दाखविली पाहिजे.” त्यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर खूपच प्रसिद्ध झाला आहे.
 
थंगल यांचे विधान ही आजच्या संघर्षमय उष्ण राजकीय वातावरणात आलेली थंडगार वार्‍याची झुळुक आहे. पण, एखाद्या झुळुकीने तात्पुरता दिलासा दिला, तरी वातावरण थंड होत नाही. अयोध्या, काशी आणि मथुरा ही हिंदूंची तीन सर्वोच्च धार्मिक तीर्थक्षेत्रे असून, (आता अयोध्या सोडल्यास) तेथील प्रमुख मंदिरांवर सध्या मुस्लीम समाजाचा कब्जा आहे. जोपर्यंत ही स्थिती कायम राहील, तोपर्यंत देशात धार्मिक तणावाचे वातावरण कायम राहील. म्हणून मुस्लिमांनी या तीन ठिकाणांवरील आपला ताबा हिंदूंकडे सोपवल्यास, देशात अन्यत्र अशा प्रकारे बांधण्यात आलेल्या मशिदींवरील हक्क हिंदू समाज सोडून देईल, ही हिंदूंची मागणीही जुनीच आहे. आता अलीकडेच ‘रामजन्मभूमी ट्रस्ट’चे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरि महाराज यांनीही तीच मागणी केली आहे.

देशात रामजन्मभूमीवरच प्रभू श्रीरामांचे मंदिर उभारले जावे, ही समस्त हिंदूंची अढळ श्रद्धा होती. भारतातील मुस्लीम वगळता अन्य कोणत्याही धर्मियांनी आणि त्यांच्या नेत्यांनी या मागणीला विरोध केला नव्हता किंवा राम मंदिर बांधल्यावरही त्यास विरोध केलेला नव्हता. केवळ मुस्लीम समाजातील काही कट्टरवादी नेत्यांनी आणि मुस्लीम मतांवर अवलंबून असलेल्या काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेससारख्या काही बोगस धर्मनिरपेक्ष पक्षाच्या नेत्यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी, या मंदिराच्या मागणीला विरोध चालविला होता. वास्तविक, रामजन्मभूमीवर झालेल्या उत्खननात जेव्हा मंदिराचे अवशेष सापडले, तेव्हाच मुस्लीम नेत्यांनी हा विरोध थांबविला असता आणि त्या जागेवर राम मंदिरच्या उभारणीला मंजुरी दिली असती, तर हा प्रश्न इतका चिघळला नसता. त्यामुळे निर्माण झालेली कटुता नष्ट झाली असती आणि त्या मुद्द्यावरून झालेल्या संघर्ष टळला असता आणि अनेक निरपराधांचे प्राणही वाचले असते. पण, मुस्लीम समाजाकडून इतक्या समजुतदारपणाची अपेक्षा दुर्मीळच. याचे कारण या समाजावर कट्टरवादी नेत्यांचा आणि कट्टर मानसिकता असलेल्या मुल्ला-मौलवींचा प्रचंड पगडा.

सौदी अरेबियात मुस्लिमांची सर्वोच्च पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत. पण, त्या देशाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी देशात चालविलेल्या सुधारणांची तरी माहिती घेतली पाहिजे. या युवराजाने आपल्या देशाला कट्टरवादाच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. 21व्या शतकातही महिलांना मोटार चालविण्याची परवानगी नाकारणारा सौदी अरेबिया हा एकमेव देश होता. जगभर त्याने अतिशय कट्टर अशा वहाबी इस्लामचा प्रसार चालविला होता. पण, मोहम्मद बिन सलमान यांनी अनेक प्रतिगामी कायदे आणि प्रथा रद्द केल्या आहेत. तेथे आता महिलांना एकट्यानेही हज यात्रा करण्याची परवानगी देण्यात आली. सौदी अरेबियासारख्या देशात जर अशा प्रकारे इस्लाममध्ये सुधारणा होत असतील, तर भारतातील मुस्लिमांनी आपली कट्टर मानसिकता बदलण्यास काय हरकत आहे?
 
हिंदूंनी केलेल्या मागणीला भक्कम ऐतिहासिक आणि पुरातन आधार आहे. काशीतील ज्ञानवापी मशीद ही मूळ मंदिरावर उभी करण्यात आली आहे, हे त्याकडे नजर टाकल्यावरही लगेच लक्षात येते. त्याशिवाय ज्ञानवापी हेच मूळ काशी विश्वनाथाचे मूळ मंदिर आहे, हे दर्शविणारे अनेक ठोस आणि ऐतिहासिक पुरावे आहेत. नुकत्याच या परिसरात केलेल्या सर्वेक्षणातही मूळ मंदिराचे अनेक अवशेष आणि चिन्हे दिसून आली. तीच बाब मथुरेतील कृष्ण जन्मभूमीची. अलीकडेच ‘भारतीय पुरातत्त्व विभागा’ने केलेल्या पाहणीत सध्याची इदगाह मशीद ही मूळ मंदिरावर उभी असल्याचे अनेक पुरावे दिसून आले. मुळात भारतावर झालेल्या इस्लामी आक्रमणांचा हेतूच भारतातील हिंदू धर्म नष्ट करून, त्याला इस्लामी देश बनविणे हे होते.

मुघलांनी भारतात आपली सत्ता स्थापन केल्यावर, त्यास राजकीय आधार मिळाला आणि बर्‍याच मुघल बादशहांनी हिंदूंची असंख्य देवळे पाडून, त्या जागी मशिदी उभ्या केल्या. या सार्‍या घटनांचे ऐतिहासिक आणि दस्तऐवजी पुरावेही आहेत. हिंदूंना काळाची चक्रे उलट फिरवायची नाहीत. पण, त्यांच्या सर्वोच्च धार्मिक श्रद्धास्थानांवरील हे मुस्लीम आक्रमण हटविले जावे, इतकीच त्यांची न्याय्य मागणी आहे.थंगल यांच्या पक्षाने म्हणजे मुस्लीम लीगने काँग्रेसबरोबर युती केली आहे. आपला मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसलाच थंगल यांनी हा मित्रत्वाचा सल्ला देण्याची गरज आहे; पण त्यांनी जरी तो दिला, तरी तो ऐकण्याची काँग्रेसच्या नेत्यांची तयारी आहे का, हा खरा प्रश्न आहे. कारण, त्या नेत्यांचे सारे राजकारण आता केवळ मुस्लीम लांगूलचालनावर उभे राहिले आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.