मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी कायमच चर्चेत असते. देशात घडणाऱ्या राजकीय, सामाजिक घटनांबाबत ती आपली मते सतत परखडपणे मांडत असते. नुकतेच तिने ‘पत्रकार आणि दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांच्या पत्नी अनुपमा चोप्रा यांना त्या सिनेपत्रकारितेच्या नावावर कलंक आहेत’ असे म्हटले आहे. नुकताच त्यांचा '१२ वी फेल' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर नाव कोरत प्रेक्षकांची मनेही जिंकली आहेत.
काय आहे प्रकरण?
१२ वी फेल चित्रपटाचे दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांनी असे म्हटले होते की, त्यांच्या पत्नी अनुपमा चोप्रा यांना असे वाटले होते की त्यांनी १२वी फेल हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला पाहिजे होता. कारण चित्रपटगृहात प्रेक्षक हा चित्रपट पाहायला येणार नाही. अनुपमा यांच्या या विधानावर कंगना राणावत चांगलीच भडकली आहे. कंगनाने सोशल मिडियावर पोस्ट करत लिहिले आहे की, “विधु विनोद चोप्रा यांच्या पत्नी अनुपमा चोप्रा सिनेपत्रकारितेच्या नावावर कलंक आहेत. त्यांना तरुण आणि बुद्धिमान महिलांबद्दल इर्ष्या वाटत असल्यामुळे त्यांना आपल्याच पतीबद्दल इर्ष्या वाटत असल्यास त्यात कोणतेही आश्चर्य वाटण्यासारखे नाही. त्यांनी कुणाच्या नावावर स्वत:ची वेबसाईट, व्यवसाय सुरु केला आहे हे सगळे जाणतातच. तसेच, त्यांना बॉलिवूडच्या पार्टीत कुरघोड्या करण्याची आयती संधीच मिळाली आहे, ज्यामुळे त्या चांगल्या चित्रपट आणि कलाकृतींबद्दल उलटसुलट बोलतात.”