जगाला शाश्वतता देण्याचे काम भारतच करेल!

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

    05-Feb-2024
Total Views |
 
Dr. Mohanji Bhagwat
(Dr. Mohanji Bhagwat Amrut Mahotsav Alandi)

पुणे : "भारताने जगाला ज्ञान देण्याची वेळ आली आहे. ते शक्य झाले नाही, तर जगाला लवकरच विनाशाला सामोरे जावे लागेल, अशी स्थिती सध्या उद्भवली आहे. जगातल्या जाणकार लोकांना हे ठाऊक आहे. भारताला आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी उभे राहायचे आहे. संपूर्ण जगाला मृत्युसंकटातून वाचवण्यासाठी शाश्वतता देण्याचे काम भारताला करायचे आहे आणि ते भारतच करेल", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
 
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरीजी महाराज यांचा जन्मोत्सव दरवर्षी गीताभक्ती दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षी त्यांना ७५ वर्ष पूर्ण झाल्याने त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आळंदी येथे ४ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत 'गीताभक्ती अमृत महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, दि. ०५ फेब्रुवारी रोजी अमृत महोत्सवाचा शुभारंभ झाला.
 
सरसंघचालक यावेळी म्हणाले, "ईश्वरनिष्ठांची मांदियाळी सदैव मिळत राहो, असे वरदान संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानात मागितले. श्रद्धा आणि भक्ती या गोष्टी मनुष्याकडे असल्याने ते वरदान आधीपासूनच प्राप्त आहे. आपण कधीही त्यापासून विभक्त होत नाही. ती कायम जागी ठेवण्यासाठी अशा ईश्वरनिष्ठांची मांदियाळी आपल्याला जागोजागी भेटत असते."
 
श्रीरामजन्मभूमीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणे हा योगायोग नाही या सांगताना ते म्हणाले, "अयोध्येत २२ जानेवारी रोजी श्रीरामलला आपल्या मंदिरात विराजमान झाले. यासाठी गेली अनेक वर्ष संघर्ष झाला. त्या संघर्षाचे फळ म्हणजे श्रीरामलला आपल्या जन्मभूमीत विराजमान झाले, हे पाहण्याचे भाग्य आजच्या पिढीला मिळाले. हे ईश्वरीकार्य केवळ परमेश्वराच्याच इच्छेमुळे पूर्णत्वास आले आहे. त्यांची इच्छा पूर्ण होण्याचा तो आरंभबिंदू आहे. हा योगायोग नसून नियतीची योजना आहे."
 
गोविंददेव गिरीजी महाराजांना अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा देत सरसंघचालक म्हणाले, "आपापसात अविश्वासाच्या आणि कट्टरतेच्या ज्या भिंती उभ्या आहेत, त्या भेदून भारत एक संध एक रस मानवता निर्माण करेल; जो सृष्टीला सोबत घेऊन जगाला सुखी करेल. भारत श्रद्धेचा देश आहे, श्रद्धेशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही; केवळ पुरुषार्थाची आवश्यकता आहे. गोविंददेव गिरीजी महाराजांच्या अमृत महोत्सवानिमित्त या पुरुषार्थाचा आरंभ होईल असा मला विश्वास आहे. समाजात ज्याप्रकारे परिवर्तनाची आवश्यकता आहे, तसे परिवर्तनही लवकरच होईल."
 
कार्यक्रमादरम्यान मंचावर रा.स्व.संघाचे अ.भा.कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी, पूज्य जगद्गुरु द्वाराचार्य स्वामी राजेंद्रदासजी महाराज, पूज्य बालयोगी सदानंदजी महाराज, पूज्य डॉ. आचार्य लोकेश मुनिजी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
 
'भगवद्गीता' भारतीय संस्कृतीचे केंद्र
भगवद्गीतेचे यथार्थ निरुपण वास्तविकतः ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये झाले आहे. भगवद्गीतेचे पाठ वाचून ते आपल्या आचरणात आणले पाहिजेत. भगवद्गीता ही भारतीय संस्कृतीचे केंद्र आहे, त्यास आपण कधीच विसरू शकत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच विचाराने चालत असून देशभक्तीचे शिक्षण देणारे ते एक विश्वविद्यालय आहे. ज्यांना देशभक्ती शिकायची असेल त्यांनी एकदातरी संघाच्या शाखेत जाऊन पाहावे.
- गोविंददेव गिरीजी महाराज
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.