डाव्या विषवल्लीच्या विरोधात कणखर राष्ट्रवादी शक्ती!

    05-Feb-2024   
Total Views |
Dr. Arif Mohammad Khan and Communist agenda


केरळसारख्या सुशिक्षित राज्यात एकीकडे डाव्या सरकारविरुद्ध खंबीर भूमिका घेणारे राज्यपाल दिसून येतात, तर दुसरीकडे या देशात जन्म घेऊनही ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास एक महिला नकार देते! देशविरोधी, देशविघातक शक्ती त्या राज्यात विषारी बीजे कशी पेरत आहेत, त्याची कल्पना यावरून येते. पण, अशा विषवल्लीच्या विरुद्ध राष्ट्रवादी शक्ती त्या राज्यात पाय घट्ट रोवून उभ्या राहत आहेत, भारतविरोधी शक्तींना समर्थपणे तोंड देत आहेत. एक ना एक दिवस ही विषवल्ली राष्ट्रवादी शक्ती उखडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाहीत!

केरळचे राज्यपाल डॉ. आरिफ मोहम्मद खान यांच्याविरुद्ध केरळमधील डावे सरकार, ’स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ ही साम्यवाद्यांची विद्यार्थी संघटना सातत्याने काही ना काही अपप्रचार करण्यात गर्क असतात. राज्यपाल एखाद्या कार्यक्रमाला निघाले की, त्यांना काळे झेंडे दाखव, त्यांच्या मोटारींचा ताफाच अडव, त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी कर, असे फालतू उद्योग त्यांच्याकडून सुरू असतात. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचा ‘राजकीय हत्यार’ म्हणून वापर केला जात असल्याचा आरोपही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी काही महिन्यांपूर्वी राजभवनाबाहेर आयोजित एका जाहीर सभेत केला होता. राज्यपाल हे केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘हस्तक’ असल्याचा आरोप साम्यवादी नेते कानम राजेन्द्रन यांनी त्याच सभेत केला. राज्यपालपद हे घटनात्मक पद असताना, त्या पदाचा मान राखण्याऐवजी संधी मिळेल, तेव्हा त्या पदाचा अपमान केरळमधील डाव्या पक्षांकडून, डाव्या विद्यार्थी संघटनांकडून केला जात असतो.

पण, राज्यपाल त्यांच्या निदर्शनांना, टीकेला अजिबात घाबरत नाहीत, त्यांच्या निदर्शनांना खंबीरपणे सामोरे जातात. राज्यपाल खान यांच्याविरुद्ध होत असलेली आंदोलने लक्षात घेऊन, केंद्र सरकारने आता त्यांना ’झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्था देऊ केली आहे. केरळमधील साम्यवादी पक्ष राज्यपालांविरुद्ध आकाशपाताळ एक करीत असताना, केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी आपल्या अलीकडील केरळ दौर्‍यात राज्यपालांचे अत्यंत कौतुक केले. एका युवा संमेलनात बोलताना, “शहाबानो प्रकरणी राजीव गांधी यांच्या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका घेणारे आरिफ मोहम्मद खान हे महाविद्यालयीन जीवनात आमचे हिरो होते!” असे मीनाक्षी लेखी यांनी सांगितले. तिहेरी तलाकची प्रथा रद्द करावी, अशी मागणी त्यावेळी आरिफ मोहम्मद खान यांनी केली होती, हे मीनाक्षी लेखी यांनी लक्षात आणून दिले. तिहेरी तलाक मोडीत काढणार्‍या सरकारचा आपण एक भाग आहोत, याबद्दल आपणास अभिमान वाटत असल्याचे सांगण्यास, त्या विसरल्या नाहीत.

आमच्या महाविद्यालयीन काळात महिलांची स्थिती दयनीय होती. तिहेरी तलाक प्रथा बंद व्हावी, असे खान यांना वाटत होते. त्या काळात आरिफ मोहम्मद खान यांनी तिहेरी तलाकच्या विरुद्ध भूमिका घेतली आणि मंत्रिपदाचा राजीनामा दिला, हे मीनाक्षी लेखी यांनी लक्षात आणून दिले. आरिफ मोहम्मद खान हे केरळमधील डाव्या सरकारच्या तालानुसार वागत नसल्याने त्यांच्याविरुद्ध तेथील साम्यवादी निदर्शने करीत आहेत, हे उघड आहे. डावे सरकार त्यांच्याविरुद्ध जे बिनबुडाचे आरोप करीत आहे, तेही त्यांनी वेळोवेळी फेटाळून लावले आहेत. आपण राजकीय हस्तक्षेप केल्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सिद्ध करून दाखवावे. तसे सिद्ध झाल्यास आपण राजीनामा देण्यास तयार आहोत, असे आव्हान काही महिन्यांपूर्वी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. राजभवनामध्ये राजकीय नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप डाव्या सरकारने केला होता. तो आरोप फेटाळून लावताना, तो सिद्ध करण्याचे आव्हान राज्यपालांनी दिले होते. ‘आम्हाला कायद्याचे राज्य हवे आहे, सत्ताधीशांचे राज्य नको,’ हा मुद्दा राज्यपालांकडून आग्रहाने मांडला जात असतो.

 राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांच्या या भूमिकेमुळेच त्यांच्याविरुद्ध निदर्शने, आंदोलने असे प्रकार केरळमध्ये घडत आहेत. पण, असल्या प्रकारांना न डगमगता, राज्यपाल तेथे खंबीरपणे उभे आहेत.मीनाक्षी लेखी यांनी आपल्या कार्यक्रमात राज्यपालांचे कौतुक केले असले, तरी केरळमधील काही जणांवर डाव्या विचारांचा पगडा अजून असल्याचे दिसून येते. मीनाक्षी लेखी यांच्या केरळमधील एका कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देण्यास सांगितले असता, काहींनी त्यास प्रतिसाद दिला नाही. ही अगदी अलीकडील घटना. त्यावर “भारत ही तुमची माता नाही काय,” असा प्रश्नही मीनाक्षी लेखी यांनी केला. उपस्थित एका महिलेस त्यांनी उभे राहण्यास सांगितले आणि ‘भारतमाता की जय’ असे म्हणण्यास सांगितले असता, त्या महिलेने काहीच प्रतिसाद न दिल्याचे पाहून, तिला सभागृह सोडून जाण्यास मीनाक्षी लेखी यांनी सांगितले.

केरळसारख्या सुशिक्षित राज्यात एकीकडे डाव्या सरकारविरुद्ध खंबीर भूमिका घेणारे राज्यपाल दिसून येतात, तर दुसरीकडे या देशात जन्म घेऊनही ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास एक महिला नकार देते! देशविरोधी, देशविघातक शक्ती त्या राज्यात विषारी बीजे कशी पेरत आहेत, त्याची कल्पना यावरून येते. पण, अशा विषवल्लीच्या विरुद्ध राष्ट्रवादी शक्ती त्या राज्यात पाय घट्ट रोवून उभ्या राहत आहेत, भारतविरोधी शक्तींना समर्थपणे तोंड देत आहेत. एक ना एक दिवस ही विषवल्ली राष्ट्रवादी शक्ती उखडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाहीत!

 
युवक काँग्रेस नेत्याविरुद्ध संघाची कायदेशीर कारवाई

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेली खोटी विधाने मागे घ्यावीत आणि अशी विधाने केल्याबद्दल बिनशर्त माफी मागावी, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केरळ राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल मान्कुत्ताथिल आणि तमिळ लेखक सलामा यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. युवक काँग्रेसच्यावतीने केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यात ‘अ‍ॅन्टी फॅसिस्ट समागम’ या सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये संघाचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच या संघविरोधी सार्वजनिक कार्यक्रमाच्या आधी आक्षेपार्ह भित्तीपत्रके लावल्याबद्दल मल्लपुरम युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरीस मुथूर आणि अन्य तिघा पदाधिकार्‍यांविरुद्ध नोटीस बजाविण्यात आली आहे. रा. स्व. संघाबद्दल अपप्रचार करून संघाची प्रतिमा मलीन केल्याबद्दल आणि अल्पसंख्याक समाजामध्ये भय निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल, या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. आपणच केवळ अल्पसंख्याक समाजाचे कैवारी असल्याचा, आभास निर्माण करून, मतपेढीचे राजकारण युवक काँग्रेसकडून खेळले जात आहे, अशी टीका त्या संघटनेवर केली जात आहे. संघाबद्दल अपप्रचार करणार्‍यांच्या विरुद्ध ठाम भूमिका घेऊन, अशी बदनामी करणार्‍या संघटनांना कायदेशीर नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केल्याबद्दल, कायदेशीर कारवाई केल्यानंतर अनेक भल्या-भल्या नेत्यांना सपशेल माफी मागावी लागल्याची उदाहरणे या आधी घडली आहेत. या प्रकरणातही यापेक्षा वेगळे काही घडणार नाही!

व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड

आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील तेजपूर या शहरामध्ये व्हिसा नियमांचे उल्लंघन करून, धर्मप्रसाराचे काम करीत असलेल्या दोघा विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली. हे दोघे विदेशी नागरिक पर्यटक व्हिसा घेऊन भारतात आले होते. पण, ते धार्मिक कार्यक्रमात सहभागी होते असल्याचे आढळून आल्याने, त्यांना अटक करण्यात आली. मॅथ्यू बोन आणि मायकेल जेम्स अशी त्या दोघांची नावे असून, ते अमेरिकेचे नागरिक आहेत. चर्च संघटनांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात हे दोघे भाषणे देत असल्याचे आढळून आले. या दोघा अमेरिकी नागरिकांना 500 डॉलर दंड ठोठाविण्यात आला. परराष्ट्र खात्याच्या निदर्शनास ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर, त्या दोघांना कडक शब्दांत समज देण्यात आली. दि. 29 ऑक्टोबर 2022 या दिवशी आसाममधील काझीरंगा भागात व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल, सात जर्मन धर्मप्रसारकांना अटक करण्यात आली होती. अलीकडेच दिब्रुगढ येथून तीन स्वीडिश धर्मप्रसारकांना देश सोडून जाण्यास सांगण्यात आले होते. विविध मार्गांचा वापर करून, भारतात धर्मप्रसाराचे कार्य कशा पद्धतीने केले जात आहे, त्याची कल्पना यावरून यावी.

दत्ता पंचवाघ

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.