आऊटर रिंगरोड नागपूरसाठी 'लाईफलाईन' ठरणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

"फोर लेन आऊटर रिंग रोड/बायपास" प्रकल्पाचे केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते उद्धाटन

    05-Feb-2024
Total Views |

Devendra Fadanvis


नागपूर : सध्या नागपूरचा विकास झपाट्याने होत आहे. अशा स्थितीत आऊटर रिंगरोड हा नागपूरच्या वाढत्या वाहतूक व्यवस्थेसाठी 'लाइफलाइन' ठरणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. रविवारी नागपुरातील बहुप्रतिक्षित 'फोर लेन आऊटर रिंग रोड/बायपास' प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्धाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर याबाबतच पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, "जामठा आणि फेटरी दरम्यानचा हा ३३.५० किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ८५६.७४ कोटी रुपये खर्चून बांधला आहे. लांब असलेल्या जागतिक दर्जाच्या रिंगरोड प्रकल्पात २ मोठे आणि २५ छोटे पूल, १ आरओबी, ३ उड्डाणपूल, सर्व्हिस रोड, बस बे/निवारा आणि सुरक्षिततेसाठी बांबू क्रॅश बॅरियर आहेत."


Fadanvis & Gadkari
 
"सध्या नागपूरचा विकास झपाट्याने होत आहे. अशा स्थितीत शहरातील वाढती वाहतूक सुरळीत करणे आणि नागपूरचा अन्य शहरांशी संपर्क साधणे अत्यंत गरजेचे आहे. या रिंगरोडमुळे नागपुरात बाहेरून येणाऱ्या वाहनांची संख्या, रस्ते अपघात, वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्यांमध्ये घट होणार असून वेळ व इंधनाची बचत होणार आहे. हा रिंगरोड नागपूरच्या वाढत्या वाहतूक व्यवस्थेसाठी 'लाइफलाइन' ठरणार आहे," असे ते म्हणाले.
 
पुढे ते म्हणाले की, "या रिंगरोडमुळे आर्थिक घडामोडींनाही चालना मिळणार आहे. या रिंगरोडमध्ये १ लाख कोटींची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता आहे. तसेच ८० कि.मी. लांबीच्या या रिंगरोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या आधुनिक विचारसरणीचे फलित म्हणजे हायटेक आणि आधुनिक पायाभूत सुविधा आणि मजबूत कनेक्टिव्हिटीमुळे नागपूर विकास आणि समृद्धीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. त्यामुळे नागपूरची गणना आता देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये होत आहे," असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, आमदार मोहन मते, डॉ. परिणय फुके, अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.