"उद्धव ठाकरेंना आधी शहाणपण सुचलं असतं तर सत्ता गेली नसती"

    05-Feb-2024
Total Views |

Uddhav Thackeray


बुलढाणा :
उद्धव ठाकरेंना आधी शहाणपण सुचलं असतं तर हातातली सत्ता गेली नसती, असा घणाघात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. बुलढाणा येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'आमचं हिंदुत्व घरातली चुल पेटवणारं आणि तुमचं हिंदुत्व घरं पेटवणारं,' अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. यावर आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
 
चित्रा वाघ म्हणाल्या की, "उद्धव ठाकरेंना घरात जाऊन चुल पेटवण्याची आठवण फार उशीरा आली. त्यावेळी ज्यांच्यासोबत घरोबा केला होता त्यांच्या पाठीत वार करताना त्यांना घराच्या चुलीची आठवण आली नाही. त्यामुळे त्यांनी जे केलं आहे त्याचा परिणाम ते आता भोगत आहेत. त्यामुळे आता उद्वीग्नतेतून येणाऱ्या त्यांच्या वाक्यांना आपण फार मनावर घेण्याची गरज नाही, असं मला वाटतं."
 
त्या पुढे म्हणाल्या की, "एकदा तुमच्या हातात राज्य आल्यानंतर तुम्ही कधी घरातून बाहेर पडत नव्हते, हे लोकांनी पाहिलं आहे. आता लोकांमध्ये जाणं आणि त्यांच्याशी बोलणं हे तुम्हाला नंतर उशीरा सुचलेलं शहाणपण आहे. आतापर्यंत तुम्ही फेसबुकवरच होतात. हे सरकार फेसबुकवरचं नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या चेहऱ्यावर स्माईल आणणारं सरकार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना शहाणपण आधी सुचलं असतं तर हातातली सत्ता गेली नसती," असा टोलाही चित्रा वाघ यांनी ठाकरेंना लगावला आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.