ललित कला केंद्राचे पाप

    04-Feb-2024
Total Views |
lalit kala kendra
 
पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत, रामायणावर आक्षेपार्ह नाट्य सादर करण्याचा निर्लज्जपणा केला. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी तो रोखण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला, तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावलेल्या, यापुढे खपवून घेतल्या जाणार नाहीत, हे कलाकारांनी लक्षात घ्यायला हवे. 
 
पुणे विद्यापीठातील ललित केंद्राने ‘जब वुई मेट’ नावाखाली सादर केलेले नाट्य हे हिंदू धर्मियांच्या सहनशक्तीचा अंत पाहणारे ठरले. रामायणावर आधारित या नाटकात भगवान श्रीराम तसेच सीता यांच्या पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद तसेच दृश्ये दाखवण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने त्याला आक्षेप घेतला असता, परिषदेच्या कार्यकर्त्यांना ललित केंद्राच्या विद्यार्थ्यांनी मारहाण केली, अशीही माहिती आहे. पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी संबंधितांवर भारतीय दंड संहिता ‘कलम २९५ ए’नुसार गुन्हा दाखल केला आहे. आता पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र, हिडीस नाट्यप्रयोग म्हणजे अभिव्यक्ती नाही, हे नव्याने अधोरेखित करण्याची गरज तीव्र झाली आहे. तसेच हिंदूंना यापुढे गृहीत धरू नका. हिंदू देवदेवतांचा अवमान आता सहन केला जाणार नाही, हे कलाकारांनी लक्षात घ्यायला हवे. घटनेने जसे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे; तसेच हिंदूंनाही त्यांच्या धार्मिक भावना जपण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.
 
पुण्यातील ललित केंद्राच्या घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य तसेच समाजातील कलेची भूमिका याविषयी वादंगाला नव्याने तोंड फोडले आहे. तथाकथित कलावंतांनी अभाविपच्या भूमिकेचा निषेध केला आहे. तसेच त्यांनी नाट्यप्रयोग पूर्ण होऊ द्यायला हवा होता, अशी भावनाही व्यक्त केली आहे. दुर्दैवाने, हिंदू रंगकर्मीच झाल्या घटनेचे खापर अभाविपच्या माथी फोडताना दिसून येत आहेत. अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होऊन, ते दर्शनासाठी खुले झाल्यानंतर, काही दिवसांतच पुन्हा एकदा रामायणावर आधारित आक्षेपार्ह संवाद सादर केले जात असतील, तर ते हेतूतः केलेले कृत्य आहे, असेच म्हणावे लागेल.
 
१९९६ मध्ये ‘फायर’ नावाचा चित्रपट दीपा मेहताने दिग्दर्शित केला होता. त्यातील दोन प्रमुख स्त्री कलाकारांची नावे सीता आणि राधा अशी दाखवण्यात आली होती. शबाना आझमी तसेच नंदिता दास यांनी ती साकारली होती. म्हणूनच या चित्रपटाच्या विरोधातही भूमिका घेण्यात आली होती. मात्र, हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला होता. प्रत्यक्षात ज्या पुस्तकावर हा चित्रपट आधारलेला होता, त्यात ही हिंदू कुटुंबाची नव्हे तर मुस्लीम कुटुंबाची कहाणी होती. त्यातील पात्रेही मुस्लीम होती. मात्र, हिंदू हा सहनशील असल्यानेच, तसेच तो ‘सॉफ्ट टार्गेट’ असल्याने, दीपा मेहताने बिनदिक्कतपणे येथे हिंदू कुटुंब दाखवले. तसेच ती तिथेच थांबली नाही. तिने हिंदूंच्या आस्थेचा भाग असलेली दोन नावे सीता आणि राधा यांचा वापर त्यासाठी केला. सर्वोच्च न्यायालयाने याला असलेला आक्षेप विचारात न घेता, तो प्रदर्शित करण्याची परवानगी दिली.
 
२०१२ मध्ये मुंबईत ‘औरत’ नावाच्या नाटकाचे प्रदर्शन रद्द करण्यात आले होते. मुस्लिमांनी त्याला विरोध केला होता. २०१५ मध्ये ‘अग्नेस ऑफ गॉड’ ख्रिश्चनांनी विरोध दर्शवल्याने रद्द करण्यात आले. याची चर्चाही कुठे झाली नाही. त्यावेळी देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्याबद्दल कोणी निषेध नोंदवला नाही. कोणत्याही रंगकर्मीने त्याबद्दल अवाक्षरी उच्चारले नाही. मुस्लिमांच्या भावना दुखावल्या म्हणून विरोध झाला, तर ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची झालेली गळचेपी नसते. त्यावेळी कोणाच्या भावनांना धक्का पोहोचला म्हणून त्यांचे खेळ बंड पाडण्यात आले? याचे उत्तर कधीही मिळणार नाही. विशेषतः मुस्लीम समाज आपल्या धर्माबद्दल जितका सजग आहे, तितका हिंदू दुर्दैवाने नाही, असेच म्हणावे लागेल.
 
हिंदू सजग नाही, तसेच तो फारसा विरोध करत नाही, म्हणूनच बॉलीवूडने इतकी वर्षे त्यांच्या चित्रपटातील पंडित हा अत्याचारी दाखवला. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालणारा, कपाळावर गंध, भस्म लावणारा खलनायक त्यांनी वर्षानुवर्षे रंगवला. कुठल्याही हिंदूला ते आक्षेपार्ह वाटले नाही. चित्रपटातील ‘रहीम चाचा’ हा नेहमीच नेकदिल. अडल्यानडल्यांना मदत करणारा राहिला. फर्नांडिस आंटी उदार अंतःकरणाची, हिंदू आई-वडिलांनी त्याग केलेल्या मुलांचा आपलेपणाने सांभाळ करणारी. पंडित, ब्राह्मण हे मात्र गरजूंना लुटणारे, त्यांचे शोषण करणारे. अंगभर भगवे कपडे घालून, हिंदी चित्रपटात अत्याचार केलेले सर्वाधिक संख्येने हिंदू प्रेक्षकांनीच पाहिले. म्हणूनच या कलाकारांचे फावले. हिंदूंना गृहीत धरले गेले.
 
अलीकडच्या काही वर्षांत हिंदू हा जागरूक होताना दिसून येतो. म्हणूनच ‘खानावळी’चे चित्रपट तो बघत नाही. त्यावर अघोषित बहिष्कार घालण्यात आला आहे. देशात असुरक्षित वाटते म्हणून ‘अॅवॉर्ड वापसी’ करणारी गँग आता कोणत्याही घटनेवर लगेचच भाष्य करण्याचे टाळते. ‘खानावळी’सारखे आपलेही खायचे वांधे होतील, याची भीती त्यांना वाटू लागली आहे. तशातच दाक्षिणात्य चित्रपटातून हिंदू प्रतीकांचा सन्मानाने करण्यात येत असलेला वापर हा स्वागतार्ह असाच आहे. ‘पुष्पा’, ‘आरआरआर’ यांनी हिंदुत्वाची प्रतीके अंगाखांद्यावर अभिमानाने मिरवली. त्यात त्यांना कोणताही कमीपणा वाटला नाही. म्हणूनच ‘पुष्पा’ने मिळवलेले यश हे विक्रमी होते. ‘आरआरआर’ने ‘ऑस्कर’ पुरस्कार आपल्या नावावर केला.
 
अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा जगभरातील औत्सुक्याचा होता. कोट्यवधी भाविकांनी तो पाहिला. मंदिर खुले झाल्यापासून, तेथे लक्षावधी भाविक रोज दर्शन घेत आहेत. त्याचवेळी काशी येथील ‘ज्ञानवापी’तील तळघर खुले झाले. तेथे पूजापाठ होऊ लागला आहे. मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीवर औरंग्याने जी वास्तू उभी केली आहे, त्याचेही सर्वेक्षण करण्याचा निर्णय न्यायालयात प्रलंबित आहे. श्रीराम, श्रीकृष्ण तसेच भगवान शिव हे हिंदूंची अस्मितेची तसेच आस्थेची स्थाने आहेत. त्यांची श्रद्धास्थाने आहेत. म्हणूनच विरोधक त्यावर हल्ला करत आहेत. मात्र, हा नवा भारत आहे, हे ते विसरत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही वाटेल, ते तुम्हाला हवे तसे दाखवायचा प्रयत्न केला, तर तो हाणून पाडला जाईल. कलाकृतीच्या नावाखाली केली जाणारी मोडतोड आता खपवून घेतली जाणार नाही. पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राने केलेला प्रकार अभाविपच्या जागरूकतेने हाणून पाडला गेला आहे. आता भाजपविरोधात राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर बोलण्यासाठी विरोधी पक्ष हिरिरीने पुढे येतील. मात्र, झाल्या प्रकाराबद्दल कोणी अवाक्षरही उच्चारणार नाही. म्हणूनच ललित कला केंद्राने केलेले पाप आपणच चारचौघात मांडले पाहिजे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.