शुभंकर पुराणातून वसुंधरेचा महिमा... (भाग २)

    04-Feb-2024
Total Views |


vasundhara
‘शुभंकर पुराणातून वसुंधरेचा महिमा’ या लेखाच्या पहिल्या भागात आपण मोजक्याच पंचमहाभूतांवर आधारित देशांतर्गत शुभंकर पाहिले. आता विदेशवारी करत, पंचमहाभूतांवर आधारित अशाच आणखीन काही ‘ऑलिम्पिक’शुभंकरांची या भागात ओळख करून घेऊ.
 
‘ऑली’ एक शुभंकर
ओडिशाचे मुख्यमंत्री व हॉकीप्रेमी नवीन पटनायक यांनी २०१८ नंतर पुन्हा एकदा २०२३ मध्ये ‘हॉकी विश्वचषक’ आयोजित केला होता आणि त्या स्पर्धांचा ’शुभंकर’ (मास्कॉट) होता-’ऑली’ नावाचे एक कासव. हिंदू आख्यायिकांनुसार, कासव हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. भारतात मंदिरामध्ये देवतेपुढे असलेले कासव महत्त्वाचे मानले जाते. कासवांचे अनेक प्रकार असतात. त्यातील एक कासव ‘हॉकी विश्वचषक’ २०२३चा ‘शुभंकर’ म्हणून निवडण्यात आला होता. त्याचे नाव ‘ऑली’ असे ठेवण्यात आले आहे. हे ऑली समुद्री कासव म्हणून परिचित आहे. समुद्रतळ स्वच्छ राखून, समुद्री पर्यावरणाचा समतोल राखणारी कासवे ओडिशासारख्या अन्य समुद्रांत आढळतात. ओडिशात ‘हॉकी महोत्सवा’च्या काळात तेथे कासवाचे महत्त्व जगभरातील क्रीडाप्रेमींच्या आवडीचा विषय झाला होता. तसाच आवडीचा एक विषय गेल्या वर्षीपासून जानेवारीच्या काळात रत्नागिरी येथे ‘समुद्री कासव महोत्सव’ साजरा केला जात आहे. त्यावेळी कासवांची माहिती आणि ऑलिव्ह रिडले कासवाच्या पिलांच्या जन्माचा व त्यांचा समुद्राकडे जाण्याचा सोहळा पाहण्याची संधी असते.
 
’अम्मू’ हॉर्नबिल
केरळमधील तिरुअनंतपूरममध्ये मागे ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या. त्याचा शुभंकर ’अम्मू’ नावाचा केरळचा राष्ट्रीय पक्षी असलेला हॉर्नबिल हा होता. हा अम्मू म्हणजे त्याची मोठी व गायीच्या शिंगाच्या आकाराची चोच. या चोचीवरूनच त्याला इंग्रजीत ‘हॉर्नबिल’ हे नाव पडले आहे. केरळच्या या राष्ट्रीय पक्ष्याच्या म्हणजे आपण त्याला ‘धनेश’ म्हणून संबोधतो, त्याच्या तीन प्रजाती आपल्या सिंधुदुर्ग परिसरात आढळतात. गोवा-महाराष्ट्र सीमेवरील दोडामार्ग तालुक्यातील वानोशी नावाच्या वाडीत आढळणारा ‘ग्रेट हॉर्नबिल’ अर्थात ‘राजधनेश’चा संदर्भ दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये ’वसुंधरा’अंतर्गत प्रसिद्ध झालेल्या निनाद गोसावी यांच्या ’वानोशीचे पक्षी वैभव’ या लेखातदेखील आढळतो.
 
‘छावा’ बनला शुभंकर...
२०२३ मध्ये गुजरातमध्ये ३६व्या ‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा’ झाल्या होत्या, तो शुभंकर सावज नावाचा होता. गुजरातीत त्याचा अर्थ होता ‘शावक.’ आपण त्याला ’छावा’ म्हणतो.
 
वसुंधरेशी जडले नाते...
‘वसुधैव कुटुम्बकम्’च्या संकल्पनेतून ‘ऑलिम्पिक’नेही वसुंधरेला, पंचमहाभूतातील घटकांना नवीन स्वरुपात आणले. आजचे ‘ऑलिम्पिक’ वसुंधरेचे शुभंकरच्या माध्यमातून कसे आपल्यासमोर सादर होत गेले, हे आपण बघू. आपली स्वतःची स्वतंत्र ओळख असावी, असं ज्याप्रमाणे प्रत्येकास वाटतं, तसंच ‘ऑलिम्पिक समिती’लाही वाटू लागलं होतं आणि त्यातून त्यांनी दि. २३ जून १९४७ रोजी ‘ऑलिम्पिक’ क्रीडा स्पर्धांची ओळख इतरांपुढे शुभंकरच्या रुपाने आणण्यासाठी पावले उचलली.
 
शुभंकरचा ‘ऑलिम्पिक’ प्रवेश
ग्रेनोब्ल येथे १९६८ साली एका क्रीडा स्पर्धांच्या महाकुभांमध्ये प्रेक्षकांना शुभंकर बघायला मिळाला होता. त्यावेळच्या ‘ऑलिम्पिक’पासून विविध रंगरुपांचे व आकारांचे शुभंकर हे एक आकर्षण बनून राहिले आहेत. याद्वारे क्रीडा भावना अलंकृत अर्थात प्रकाशमान करण्यात मदत केली जाते आणि क्रीडा स्पर्धांमध्ये चैतन्य, उत्साह आणि जोश निर्माण होण्यास मदत होते.
दि. १४ नोव्हेंबरला पॅरिस २०२४ ‘ऑलिम्पिक’च्या सादरीकरणाच्या कार्यक्रमाआधी या अगोदरच्या ’ऑलिम्पिक’ क्रीडा स्पर्धांसाठी बनवलेल्या लोकप्रिय झालेल्या विविध ’शुभंकर’ची कहाणी आपण येथे थोडक्यात वाचू.
 
मिशा
मेजर ध्यानचंद व बलबीर सिंग (ज्येष्ठ) यांच्या कालखंडानंतर १९८०च्या मॉस्को ’ऑलिम्पिक’मध्ये भारताने हॉकीचे सुवर्णपदक मिळवलं होते. त्याचा शुभंकर होता-’मिशा’ नावाचं एक अस्वल की जे जगात घरोघरी प्रसिद्ध झालं होतं. ‘मिखाइल पोटापिच टॉप्टीगिन’ हे तिचे नाव होते. मिशाचे जनक होते-व्हिक्टर चिजिकोव. या शुभंकरमधला मिशा हा तर जून १९७८ मध्ये ‘सॅल्युट सीक्स’ या अंतराळयात्रेत अंतराळवीरांबरोबर ‘सोयुज’ नावाच्या अंतराळयानातून जाणारा खास निमंत्रित म्हणून जाऊन आला होता.
 
पांडा
असाच लोकप्रिय शुभंकर होता, २०२२च्या बीजिंग हिवाळी ’ऑलिम्पिक’चा ‘बिंग ड्वेन ड्वेन’ की जो बर्फाने झाकला गेलेला पांडा म्हणून ओळखला जाणारा, बर्फाच्छादित क्षेत्रातला एक अस्वल. तेव्हा सगळ्यांचेच तो आकर्षण होता. पांडा हा चीनचा राष्ट्रीय प्राणी. चीनच्या मंदारीन या भाषेत ‘बिंग’ म्हणजे ‘बर्फ.’ ‘बिंग’ हे पवित्रता आणि शक्तीचे द्योतकच.‘ड्वेन ड्वेन’ म्हणजे मजबुती आणि जीवंतपणा असून ते वाढीतल्या युवकांचं प्रतिनिधित्व करते. या अस्वलासारख्याच अजून अनेक शुभंकरांनी ’ऑलिम्पिक’विषयीच्या आपल्या भावना लोकांसमोर मांडलेल्या आपल्याला आढळतील.
 
ऑलिम्पिक’मध्ये धावले रंगीत श्वान
‘वाल्डी’ नामक पहिला अधिकृत ’ऑलिम्पिक’ शुभंकर होता, जो १९७२च्या म्युनिक येथील उन्हाळी ‘ऑलिम्पिक’साठी तयार करण्यात आला होता. तो डचशंड होता, जर्मनीतील कुत्र्यांची ती एक लोकप्रिय जात म्हणून ओळखली जाते. जनतेला त्या श्वानाची माहिती दाखवण्यासाठी, मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गांवरून त्या रंगीत शुभंकरला पळवण्यात आले होते. धैर्य, मेहनत आणि चपळपणा अंगी असलेले हे श्वान. हा शुभंकर एलेना विंसचर्मन यांनी साकारताना, कलात्मकरित्या त्याचे शरीर तयार केले होते. त्या श्वानाच्या डोक्याकडील भागात आणि शेपटात निळाई होती, उर्वरित शरीरावर ’ऑलिम्पिक’शी संबंधित तीन सहा पट्टे रंगवले होते.
 
अमिक
’ऑलिम्पिक’ क्रीडा प्रकारातला ‘जिम्नॅस्टिक्स’ हा कसरतीचा असा खेळ आहे की, ज्यात खेळाडूची लवचिकता, ताकद आणि तोल यांची परीक्षा लागते. अशा क्रीडा प्रकारातील नादीया कोमानिसा हीने पैकीच्या पैकी गुण मिळवून इतिहास रचला होता. त्या १९७६च्या माँट्रियल ’ऑलिम्पिक’चा शुभंकर होत, एक मार्जरी जातीत मोडणारं उदमांजर सदृश प्राणी की ज्याला कॅनडात ’अमिक’ असे संबोधतात.
 
रॅकून
१९८० हिवाळी ’ऑलिम्पिक’ स्पर्धांची १३वी आवृत्ती अमेरिकेतील लेक प्लॅसिड गावात खेळवण्यात आली होती. रॉनी हा तेथील शालेय मुलांनी रॅकून नावाच्या थंड प्रदेशातील प्राण्याला शुभंकर म्हणून सूचवलं होतं.
 
लांडगा व गरूडही बनले शुभंकर
हिवाळी ’ऑलिम्पिक’च्या १९८४चा शुभंकर होता, एक ‘वुस्को’ नावाचा लांडगा, तर लॉस एंजेलसच्या उन्हाळी ’ऑलिम्पिक’मध्ये ’सैम’ या शुभंकरने गरूडझेप घेतली होती आणि त्यावेळेस जुआन एंटोनियो समरंच ’आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’चे अध्यक्ष झाले होते.
 
होडोरी व कोबी
’होडोरी’ नावाने ओळखला गेलेला वाघ सेऊलच्या १९८८चा शुभंकर होता. त्यानंतर १९९२च्या बार्सिलोना ’ऑलिम्पिक’चा शुभंकर होण्याचा मान पर्वतरांगेतल्या ’कोबी’ नावाच्या श्वानाला मिळाला होता. तब्बल २४ विविध दूरचित्रवाणींवर त्याच्यावर द कोबी ट्रूप नावाची २६ भागांची हास्यचित्रपट मालिका प्रसारित झाली होती. 
 
२००० सालचे त्रिकूट
ऑस्ट्रेलियात झालेल्या २०००च्या ’ऑलिम्पिक’साठी ’सिड’, ’ऑली’, ’मिली’ हे शुभंकरचे त्रिकूट होतं. (डूवपशू, जश्रश्रू र्आी चळश्रश्रळश) हे त्रिकूट अनुक्रमे आपल्या पंचमहाभूतातील वायू, जल आणि पृथ्वी यांचे प्रतिनिधित्व करतात. इंग्रजीमधील ‘जश्रूाळिली‘ मधलं ‘ेश्रश्रू‘ हे वर्णाक्षर हे औदार्याची भावना प्रकट करते. सिडनीमधील ’डूव‘ हे इंग्रजी वर्णाक्षर ऑस्ट्रेलियन बदक असून, ते पर्यावरण आणि ऑस्ट्रेलियन समाजजीवनाचा आरसा असणार्‍या ऊर्जा व क्रियाशीलतेचं द्योतकच आहे. काटेरी सस्तन प्राणी ज्याला तोटीप्रमाणे पुढे आलेलं नाक असतं व त्याची नखं तीक्ष्ण व दात असलेला निशाचर. तो माणसासारखा तंत्रज्ञान व सांख्यिकीय विश्लेषण करू शकणारा डोकेबाज असतो. त्या त्रिकूटासमवेतच २०००च्या ’पॅरालिम्पिक’चादेखील एक शुभंकर त्यांनी जगासमोर सादर केला होता आणि त्याचे नाव होतं-’लिझी’ भौगोलिक आकारातील ऑस्ट्रेलियाचे चित्र दाखवणारा, गेरूसारखा पिवळसर तपकिरी रंगाशी साधर्म्य असलेला शुभंकर. यातून ’पॅरालिम्पिक’च वैशिष्ट्य प्रदर्शित करण्यात आले होते. जीवनात तग धरून येणार्‍या संकटांशी दोन हात करत, जीवंत राहायचं कसं, हे दाखवण्यात आलं आहे.
 
‘फ्रीज’ शुभंकर
पॅरिस ‘ऑलिम्पिक’चा शुभंकर थोडा वेगळा आहे. प्राणी, पक्षी यांच्यावर आधारित यावेळचा शुभंकर नाही. फ्रिगियन टोपी शुभंकर असेल. फ्रान्सच्या प्रजासत्ताकाचे मजबूत प्रतीक त्या टोपीतून दर्शवण्यात आले आहे. स्वातंत्र्याचे प्रतीक लोकांसमोर असावे, म्हणून ती वस्तू आहे. टोप्यांचा वापर करत, सादर करण्यात येणारा हा शुभंकर ‘पॅरालिम्पिक’ आणि सामान्य ’ऑलिम्पिक’ अशा दोन्ही क्रीडा स्पर्धांचे शुभंकर असेल. पॅरिस २०२४ ‘ऑलिम्पिक’ आणि ’पॅरालिम्पिक’ गेम्सचे शुभंकर असलेले फ्रिगियन कॅप्स! हे दोन लाल शुभंकर ज्याला ‘फ्रायगेस’ म्हणतात आणि ते स्वातंत्र्य आणि क्रांतीचे प्रतीक आहेत आणि पॅरिस २०२४ गेम्समध्ये ते लोकांसोबत असतील.
 
दोन फ्रिगेस एक ’ऑलिम्पिक’ आणि दुसरा ’पॅरालिम्पिक’ भिन्न परंतु पूरक पात्रांसह, त्यांचे एक समान ध्येय आहे. फ्रेंच आणि सर्वसमावेशक भावनेने खेळाला प्रोत्साहन देणे आणि मूर्त स्वरूप देणे, हा त्यामागील उद्देश आहे. ‘फ्रायजेस ऑफ पॅरिस २०२४’ सह खेळाच्या माध्यमातून क्रांती सुरू आहे! असे ‘पॅरिस ऑलिम्पिक संघटना’ सांगते. असे ’ऑलिम्पिक’ (साधे व पॅरा) आणि ’ऑलिम्पिक’ व्यतिरिक्त स्पर्धा तसेच क्रीडेव्यतिरिक्त आपल्या जीवनातील सगळ्या गोष्टींत महत्त्वाचे असणारे शुभंकर आपण थोडक्यात बघून घेण्याचा प्रयत्न केला. तसे म्हटले तर हे शुभंकरपुराण अजून कथन करता आले असते. पण, आपण इथेच थांबू आणि शुभ गोष्ट किंवा भाग्य आणणारे असे शुभंकर आपल्या सगळ्यांच्याच जीवनात चिरायू राहो, ही आपण सारे भगवंताचरणी प्रार्थना करु.
 
-श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत,
जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.