प्रकटे युगपरिर्वनाची ब्रह्मवाणी

    03-Feb-2024
Total Views |
Swami Govinddev Girji Maharaj

प. पू. स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांच्या दि. ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत, अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन, श्री क्षेत्र आळंदी, पुणे येथे करण्यात आले आहे. षट्तिला एकादशी, ६ फेब्रुवारी हा प. पू. स्वामींचा वाढदिवस. या पुण्यपर्वात प. पू. स्वामींच्या कृपेने आणि अनुमतीने, प. पू. स्वामींचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य अर्थात त्यांचे विभूतिमत्व दर्शन घडावे असा संकल्प करून, ‘मोरया प्रकाशन’चे संचालक दिलीप महाजन, अनिल सहस्रबुद्धे लिखित ‘राष्ट्रयोगी’ या ग्रंथाचे प्रकाशन करीत आहेत. यानिमित्ताने अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यात प. पू. किशोरजी अर्थात गोविंददेव गिरिजी महाराजांच्या मुखाने युगप्रवर्तनाची ब्रह्मवाणी प्रकटली होती. त्यांच्या विचारगर्भ भाषणावर आधारित या ग्रंथातील शेवटचे प्रकरण यानिमित्ताने प्रसिद्ध करीत आहोत.

पौष शुद्ध द्वादशीचे पुण्यपर्व! दि. २२ जानेवारी २०२४ दिनी अवघे विश्व सनातन सांस्कृतिक रामराष्ट्राच्या पुनर्जागरणाचा अमृतानुभव अनुभवत होते. अयोध्यानगरीत कारसेवकांच्या भावोर्मिंच्या शलाकांतून साकारलेल्या भव्य मंदिरात रामलला श्री बालकराम प्रतिष्ठित झाले होते. प्राणप्रतिष्ठा विधीचे मुख्य यजमान होते-सनातन सांस्कृतिक भारतीय राष्ट्राच्या पुनरुत्थानाचे, भारतीयांचे स्वप्न साकारण्यासाठी, अहोरात्र तपस्या करणारे, तपस्वी, योगी, राष्ट्रीय स्वयंसेवक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी!

प्रतिष्ठापनेनंतरची सांगता मंत्राक्षद अभिनंदन सभा मंदिराच्या प्रांगणात सुरू झाली. भारतातील अवघे रामभक्त, अवघी गात्रे एकवटून, या संजीवन क्षणाचा स्वानुभव साक्षी होण्यासाठी समाधीमग्न झाले होते. विश्वातील रामभक्तांचे नेत्र या क्षणाचे साक्षी होत होते. अभिनंदन सभामंचावर यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी मुग्ध प्रसन्न, संकल्पसिद्ध मुद्रेने विराजमान होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत तृप्तमनस्क मुद्रेने सहभागी होते. राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री राष्ट्रयोगी योगी आदित्यनाथ आणि न्यासाचे विश्वस्त हा आनंदोत्सव संपन्न करीत होते.

न्यासाचे कोषाध्यक्ष, राष्ट्रयोगी प. पू. स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज संबोधनासाठी उभे राहिले. भावविभोर मुद्रा! ५०० वर्षांचा संघर्ष, कारसेवकांचे बलिदान आणि भारतीय अस्मितेच्या प्रतिष्ठापनेसाठीची भारतीयांची जिद्द, या विषयीच्या विलक्षण क्लेष आणि विलक्षण संतोष देणार्‍या उर्मींनी अंतःकरणात दाटी केली होती. न्यासाच्या स्थापनेपासून अथक श्रमानंदात मग्न झालेले प. पू. स्वामी बोलत होते. ”यह केवल एक मंदिर मे एक मूर्ती की प्रतिष्ठा नही हैं। यह इस देश की अस्मिता, इस देश का स्वाभिमान, इस देश का आत्मविश्वास, इसकी प्रतिष्ठा हैं। वाणी प्रकट होत होती. कारण तो अनेक होते हैं; लेकीन अनेक कारण मिलते मिलते आखिर वे एक विशिष्ट स्तर तक पहुंच जातें हैं। उस स्तर पर कोई महापुरूष हमे उपलब्ध होता हैं। उस विभूति कारण युग परिवर्तित हो जाता हैं। इस प्रकार का परिवर्तन लाने के लिये आपने जीवन को साधना पडता हैं। इस प्रकार जीवन साधने वाले हमारे इस देश की परंपरा के अनेक महान रत्नो में आज, हमे, लोगों को समय की आवश्यकता, युग की आवश्यकता, सनातन के अंतःकरण की आवश्यकता के रूप में हमारे सन्माननीय प्रधानमंत्रीजी प्राप्त हुए हैं। यह केवल इस देश का नही, संपूर्ण विश्व का सौभाग्य हैं की एक ऐसा राजर्षी हमें प्राप्त हुआ।”

प. पू. स्वामींच्या मुखातून अमृतवाणी प्रकट होत होती. ‘’अंतःकरण कृतज्ञता से भरा हुआ हैं। अंतःकरण गदगद होने की अनुभूति होती हैं। मुझे आश्चर्य हुवा, मुझे २० दिन पूर्व समाचार मिला, माननीय प्रधानमंत्रीजी को इस प्रतिष्ठा के लिये स्वयं अपने लिये क्या-क्या अनुष्ठान करना चाहिये, वह नियमावली मिले। खुद को सिद्ध करने की भावना इस राजऋषी मे थी। वे कर्मणा, मनसा, वाचा व शुद्ध तथा सिद्ध होना चाहते थे। उसका मार्ग तपस्या हैं। हम लोगो ने महापुरुषोंसे परामर्श किया। मैने नियमावली भेजी थी। इस नियमावली से अधिक व्रतस्तता उन्होंने निभाई। तीन दिन के व्रतस्तता निभाने के बजाय ग्यारा दिनका अनशन किया। विदेश प्रवास टालने को कहा था। यह भी निभाया। ऐसा तपस्वी कोई राष्ट्रीय नेता प्राप्त होना, कोई सामान्य बात नही हैं। उन्होंने नासिक से रामेश्वरम तक जा के दिव्य परमाणु प्राप्त करके, पूरी भारतमाता के सभी स्थानो जाके दिव्य आत्माओंकी इस कार्यक्रम के लिये निमंत्रण देकर कहा, आईये, अयोध्या पधारे और राष्ट्र को महान बनाने का आशीर्वाद दे।”
 
प. पू. स्वामीजी प्रभू रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार्‍या यजमानांच्या भाववृत्तीचे वर्णन करीत होते. परम आदरणीय, पूजनीय पंतप्रधान मोदींना प्रभू रामललांच्या प्रतिष्ठापनेसाठी सिद्ध व्हायचे होते. संवैधानिक भारतीय राज्याच्या शास्त्याला, विश्वशास्ता रामललांची प्रतिष्ठापना करण्यासाठी यजमानपद सांभाळायचे होते. भारतीय सनातन परंपरेचा अनुसार करणार्‍या या राजऋषींनी प. पू. स्वामी गोविंददेव गिरिजी महाराजांकडून परामर्श घ्यावयाचे ठरविले.

राम मंदिर न्यासाची स्थापना करतानाच, प. पू. गोविंददेव गिरिजी महाराजांच्या ’राष्ट्रयोगी’ म्हणून सिद्ध प्रतिभेचा अधिकार लक्षात घेऊन; त्यांची अति महत्त्वाच्या अशा कोषाध्यक्षपदी नियुक्ती पंतप्रधान मोदींनी केली होती. आरंभापासून रामलला विराजमान रामजन्मभूमी आंदोलनात हिरिरीने सहभागी होऊन; रामराष्ट्राच्या पुनरुत्थान कार्यात तपस्यारत झालेल्या, प. पू. स्वामींनी सनातन धर्माचे राष्ट्रमंदिर उभारण्यात स्वतःला वाहून घेतले होते. भारतभ्रमण करीत, या राष्ट्रमंदिरासाठी निधी संकलनाच्या निमित्ताने, सनातन भारतीय रामराष्ट्राचे जागरण प. पू. स्वामी करीत होते. सर्वार्थ सिद्ध अशा राष्ट्रयोगी प. पू. गोविंददेव गिरिजी महाराजांकडे स्वाभाविकपणेच सांगता मंत्राक्षद अभिनंदन सभेमध्ये ११ दिवसांच्या उपवासासह कठोर व्रतस्थ राहून, स्वतःला यजमानपदी सिद्ध करण्याची तपश्चर्या करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्रताची सांगता करविण्याचे दायित्व आले. नरेंद्रजींच्या व्रताची सांगता करताना, प. पू. गोविंददेव गिरिजींच्या अंतःकरणात, युगांच्या प्रतीक्षेचा गहिवर दाटला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करीत, महाराजांच्या मुखातून शब्द प्रकटले की, ”आज हम लोगों को उसी प्रकार के एक महापुरूष प्राप्त हुये हैं जिनको भगवती जगदम्बाने हिमालय से लौटाते हुए कहा, जावो, तुम्हे भारतमाता की सेवा करनी हैं।” टाळ्यांच्या कडकडाटात जनसागरातून ’जय श्रीराम’ जयघोष उमटला. प. पू. स्वामींच्या मुखातून स्वामी समर्थांनी छत्रपतींच्या गौरवासाठी वापरलेले शब्द उमटले ‘निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितिचा निर्धारू श्रीमंत योगी! श्रीमंत योगी!’ महाराजांचा ऊर अभिमानाने भरून आला.
प. पू. स्वामींनी आपल्यावर सोपविलेल्या कामाचा उल्लेख करीत विचारले, ”आज मै यहाँ केवल इसलिये खडा हूँ इतने सारे तपस्या के पश्चात, इन सारे महात्माओं की अनुमती लेकर के और उनके आशीर्वाद लेकर के उनका ये तप पूर्ण करने के लिये, उसके सांगता करने के लिये, उनको चरणामृत दिया जा रहा हैं, आपकी सहमती हो तो आप सब ॐकार का घोष करके मुझे सहमती दे।” लोकसागरातून ॐकार घोष निनादला. प. पू. स्वामींनी प. पू. पंतप्रधानांना चरणतीर्थ देण्यासाठी हात ओढवला. पंतप्रधान मोदींनी चरणतीर्थ त्यांच्या मुखी प्रेषित करण्याची विनंती केली. प. पू. स्वामींना गलबलले. त्यांच्या ठायी अवघ्या अवकाशमायेचे मातृत्व संचारले. एखाद्या लहानग्या पक्षी पिलाने आपली चोच विकसित करीत, माऊलीच्या चोचीतून दाणापाणी घेत, पंखात बळ देण्याचे वरदान मागावे, तसे नरेंद्रजींनी मुख ओढवले. प. पू. स्वामी त्यांच्या मुखी माऊलीच्या अपार मायेने प्रभूराम चरणतीर्थ प्रेषित करीत होते.

अवघा आसमंत भारावला होता. युगायुगांच्या अरिष्टांचा प्रलय होत आहे, असे वाटत होते. दुरितांचा तिमिर नाहीसा होत होता. महान तपस्वी राजऋषी नवयुग परिवर्तनासाठी जणू आपल्या बाहूत विश्वंभराचे बळ प्रकटविण्याची विनंती करीत होता. प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणतीर्थरुपी अमृताचे आश्वासन युगप्रवर्तक पंतप्रधान मोदींच्या ठायी प्रेषित होत होते. हे केवळ तीर्थ नव्हते. परवशतेचे कातळी मेघ भेदून उद्ध्वस्त करण्यासाठी दिव्य अस्त्रेच जणू, महर्षी अगस्तिमुनी प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांच्या रुपाने, प्रभू रामललांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने युगप्रवर्तकाच्या ठायी प्रकटवित होते. गत हजारो वर्षांची निःसाहाय्यता, हतबलता, दुर्बलता, परवशता, न्यूनता मनामनातून नाहीशी करण्याचे सामर्थ्य त्या व्रत सांगता विधीमध्ये, विधात्याने अवगुंठित केले होते. पंतप्रधान नरेंद्रांचा जणू कायापालट होऊन, नवयुगसूर्याचा दिव्य प्रकाश प्रसारित करणारा, राजऋषी पुन्हा नव्याने प्रकट होत होता!
 
प. पू. गोविंददेव गिरिजी महाराजांचे प्राकट्य, खचितच याच नवयुग प्रवर्तनाची प्रेरणा देण्यासाठीच झाले असावे! अमृतवाहिनी प्रवरेच्या धारा अधिक तेजाने झळाळत उचंबळून प्रवाहित होत होत्या. महर्षी अगस्ति मुनी कौतुकाने हा सोहळा पाहत होते. बिल्वतीर्थातून साधूवाद निनादत होते. कारुण्यमूर्ती केशवगोविंदांच्या नयनांतून आनंदोन्मिलित अश्रूधारा वाहत होत्या. शिव-विष्णूंच्या साक्षीने प. पू. किशोरजी अर्थात गोविंददेव गिरिजी महाराजांच्या मुखाने युगप्रवर्तनाची ब्रह्मवाणी प्रकटली होती!

लोकसागरातून अवघ्या आसमंतात शब्द घुमत होते, जय श्रीराम! जय जय श्रीराम! उल्हसित, समाधानी आणि कृतज्ञतापूर्णतेने राष्ट्रयोगी प. पू. गोविंददेव गिरिजी महाराज जनसागराच्या आश्वासक भावफुलांचा वर्षाव मंचावरील युगप्रवर्तकांवर होत असल्याचा अनुभव घेत होते.
डॉ. अनिल सहस्रबुद्धे
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.